‘बाळासाहेब ठाकरेंचं स्मृतीस्थळ ताब्यात घ्या’, प्रसाद लाड यांच्या मागणीवर फडणवीसांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “खासगी बैठकांसाठी…”

मुंबई | Devendra Fadnavis – आज (17 नोव्हेंबर) शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा स्मृतीदिन आहे. या स्मृतीदिनानिमित्तानं ठाकरे गट आणि शिंदे गट-भाजप आमने सामने आले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ सरकारनं ताब्यात घेतलं पाहिजे, अशी मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रसाद लाड यांनी शिवसेनाप्रमुखांचं स्मारक राज्य सरकारनं ताब्यात घ्यावं, अशी मागणी केली आहे. “बाळासाहेबांचं स्मारक कुणाच्या वैयक्तिक कुटुंबाचं नाही. ते स्मारक महाराष्ट्राचा स्वाभिमान व्हावं यासाठी राज्य सरकारनं ते ताब्यात घेऊन त्याची नीट देखभाल करावी. स्मारकाच्या देखभालीसाठी एखादी समिती स्थापन करून ठाकरे कुटुंबातील एखाद्या सदस्याची तिथे नेमणूक करावी”, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी बुधवारी स्मारकाचा आढावा घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रसाद लाड यांच्या मागणीवर भाष्य केलं. “पक्षाची अशी कोणतीही मागणी नाहीये. वैयक्तिकदृष्ट्या कोणालाही असं वाटत असेल तर ते शक्य आहे. पण, भाजपनं अशी कोणतीही मागणी केलेली नाही. बाळासाहेबांचं स्मारक जनतेचं असून त्यांचंच राहणार आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “खासगी बैठकांसाठी या स्मारकाचा वापर होऊ नये अशी सर्वांचीच आशा आहे. एखादं राष्ट्रीय स्मारक उभं राहिल्यानंतर काही नियम असतात, त्यांचं पालन होईल अशी अपेक्षा आहे”, असंही फडणवीस म्हणाले.