एक तरी ओवी अनुभवावी

कोणत्याही विषयाचे ग्रहण करण्यासाठी वैचारिक स्थिरतेची गरज आहे. एकाग्रतेसाठी स्थैर्यपूरक असते.
वत्सावरुनि धेनुचे।स्नेह राना न वचे।
नव्हती भोग सतियेचे।प्रेमभंग।।४८६।।
कां लोभिया दूर जाये।परि जीव ठेवाचि ठाये। तैसा देहो चाळिता नव्हे।
चळु चित्ता।।४८७।।
जातया अभ्रासवे।जैसे आकाश न धांवे।
भ्रमणचक्रीं न भंवे।ध्रुव जैसा।।४८८।।
पांथिकाचिया येरझारा।सवे पंथु न वचे धनुर्धरा। कां नाही तरुवरां।येणे जाणे।।४८९।।
तैसा चळणवळणात्मकीं।असोनि पंचभौतिकीं।भूतोर्मीं एकी।चळिजेना।।४९०।।
वाहुटळीचेनि बळें।पृथ्वी जैसे न ढळे।
तैसा उपद्रव्उमाळें।न लोटे जो।।४९१।।
दैन्यदु:खीं न तपे।भयशोकीं न कंपे।
देहमृत्यु न वासिपे।पातलेनि।।४९२।।
आशापाशापडिभरें।वयव्याधीगजरे।
उजू असता पाठिमोरें।नव्हे चित्त।।४९३।।
निंदा निस्तेज दंडी।कामलोभा वरपडी।
परी रोमा नव्हे वांकुडी।मानसाची।।४९४।।
आकाश हे वोसरों।पृथ्वी वरि विरो।
परी नेणे मोहरों।हृदयवृत्ती।। ४९५।।
माऊलींनी निरोपिलेल्या ओ. क्र. ४८६ ते ५००
आपण पाहूया स्थिरता कथन करणाऱ्या ओव्या आहेत. ४८६) गायरानात चरायला जाते पण गोठ्यात बांधलेल्या वासराकडे तिचे लक्ष असते. त्याप्रमाणे आध्यात्मिक विचारांवर स्थिर असणारा साधक कोणतेही कर्म करीत असला तरी त्याचे मानसिक स्थैर्य जात नाही. ४८७) पैशाला सर्वस्व मानणारा कुठेही गेला तरी घरातील तिजोरीवर त्याचे लक्ष असते. तसे देहाचे विविध कर्मे सुरू असतात. ध्येयापासून तो चळत नाही. ४८८) आकाशातील ढगांची सतत हालचाल होत असते. आकाश धावपळ करीत नाही. कुंभाराचे चक्र फिरते, पण आस हालत नाही. ४८९) रस्त्यावर प्रवास करतात. रस्ते चालत नाहीत. रस्त्याबाजूचे वृक्ष स्थिर असतात. ४९०) पंचमहाभूतांच्या हालचाली सुरू असतात. म्हणून पंचमहाभौतिक देह हलत नाही. ४९१) पृथ्वीवरील वावटळीने पृथ्वी हलत नाही. त्याप्रमाणे स्थिर बुद्धी माणूस वैचारिक स्थिरता गमावत नाही. मानसिक उपद्रवापासून तो मुक्त असतो. ४९२) श्रीमंती-गरिबी, भीती-दु:ख, देहाचे मरण या विचारांनी तो घाबरत नाही. ४९३) इच्छा, आशा या बंधनकारक पाशात तो अडकत नाही. वय आणि आजारपण हे येणारच म्हणून तो पारमार्थिक विचारांचा आधार घेतो. ४९४) आपली निंदा कोणी केली तरी तो वाईट वाटून घेत नाही. वासना, मोह असल्या विचारांनी त्याच्या डोक्याचा केससुद्धा हलत नाही. ४९५) मस्तकावरील आकाश नाहीसे झाले. पृथ्वीच विरून गेली, तरी त्याचे मनोधैर्य सरत नाही. ।।वैष्णव जन तो तेने कहिये जो पीड परायी जाणे रे । परदु:खे करे कोयी मन अभिमान न आणे रे।। हाती हाला फुलीं।पासवणा जेवी न घाली। तैसे न लोटे दुर्वाक्यशेलीं।सेळिला सांता।।४९६।। क्षीरार्णवाचां कल्लोळी।कंपु नाहीं मंदराचळी। कां आकाश न ढळे चळे जाळी।वणवियाचां।।४९७।।
तैशा आल्या गेल्या उर्मीं।नव्हे गजबज मनोधर्मि। किंबहुना धिरु क्षमीं।कल्पातीही।।४९८।।
पै स्थैर्य ऐशी भाख।बोलिले जे सविशेष।
ते हे दशा गा देख।देखणेया।।४९९।।
हे स्थैर्य निधडे।जेथ आंगे जीवे जोडे।
ते ज्ञानाचे उघडे।निधान साचे।।५००।।
४९६) हत्तीवर त्याचे पुढे येणे रोखण्यासाठी कोणी फुलांचा मारा केला तर हत्ती पुढे येणे थांबवीत नाही. तसे कोणी शिवीगाळ केली, तरी तो त्याचे सत्कर्म करण्याचे कार्य थांबवीत नाही. ४९७) क्षीरसागरातील लाटांनी मंदार पर्वत हलत नाही. जमिनीवरील वणव्यांनी आकाशाला आग लागत नाही. ४९८) मानसिक गोंधळ, गडबड यापासून त्याचे आत्मतत्त्व वेगळे शांत असते. ज्ञानी साधकाचे मनातील धैर्य, क्षमाशीलता संपत नाही. ४९९) या अनेक गोष्टींमधून आपण धैर्यासंबंधी विचार केला आहे. ५००) धैर्य मनात आणि मग शरीर क्रियेतून प्रकट होते. हे केवळ शब्दांचे ज्ञान नव्हे. ज्ञानी साधकांकडे सद्गुणांचा खजिनाच असतो.