जाहिरातींची वरात…

जाहिराती या लहानांपासून मोठ्यांपर्यंत पाहिल्या जातात. त्याचा परिणाम सर्वच वयोगटातील मंडळींवर होत असतो. अशावेळी परिणाम करणार्या माध्यमाने खूप जपून आणि जाणीवपूर्वक, तसेच जबाबदारीने त्याचे सादरीकरण करणे गरजेचे आहे.
सिनेअभिनेता अक्षयकुमार याची विमल इलायची ही जाहिरात प्रसिद्ध झाली आणि समाजमाध्यमांवर अक्षयकुमार ट्रोल झाला. त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली आणि त्याला माफी मागावी लागली. खरेतर या उत्पादनाच्या जाहिरातीशी यापूर्वी अजय देवगण आणि शाहरूख खान या दोघांचे नाव जोडले गेले होते. त्यांनी या उत्पादनाच्या जाहिराती केलेल्या होत्या. मात्र त्यांना प्रेक्षकांनी किंवा त्यांच्या चाहत्यांनी त्यांना फारसे गांभीर्याने घेतले नव्हते. या जाहिराती करूनही ते ट्रोल झाले नव्हते.
मात्र अक्षयकुमारच्या बाबतीत हे झाले याचे कारण, अक्षयकुमार याने गेल्या काही वर्षांत आपली प्रतिमा निर्माण केली आहे. अनेक सरकारी योजनांमध्ये त्याचा चेहरा वापरला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत तो घेतो. त्यामुळे जनमानसात त्याच्याबद्दल काही विचार, भावना आहेत. तसेच स्वतः अक्षयकुमार यांनी आपण तंबाखू उत्पादनांची जाहिरात करणार नाही, असेही स्पष्ट केले होते. त्यामुळे या जाहिरातीत त्याचा चेहरा पाहून तो ट्रोल झाला. त्याने यासंदर्भात माफी मागितली आणि करारामुळे काही काळ जाहिरात दिसली तरी त्याचे उत्पन्न तो दान करणार आहे.
स्वतःसाठी वापरणार नाही, असेही त्याने सांगितले. मोठमोठ्या अभिनेत्यांकडून समाजाच्या अपेक्षा असतात. रजतपटावरील त्यांचे व्यक्तिमत्त्व हे प्रत्यक्षात तसेच असते किंवा असावे अशी त्यांची अपेक्षा असते. त्याला तडा जाऊ नये याची काळजी घेण्याचे बंधन कलाकारांवर येत असते. कलाकार यात चुकला तर चुकीला माफी नाही. चित्रपट निर्मिती ही ५० ते ६० वर्षांपूर्वी कार्यशाळा असायची. व्ही. शांताराम, दामले, फत्तेलाल किंवा यासारखे दिग्गज चित्रपटाची सर्व अंगे कलाकारांना समजावून सांगायचे. अभिनय शिकवायचे आणि चित्रपट तयार करायचे. त्यावेळी बहुतेक चित्रपट धार्मिक किंवा ऐतिहासिक असायचे. रामायणावर आधारित एका चित्रपटात एक लोकप्रिय अभिनेत्री काम करीत होती. सीतेच्या वेशात ती असली की, चित्रीकरण पाहायला येणारी मंडळी तिला नमस्कार करायची.
एकदा ती धूम्रपान करीत असताना दिग्दर्शकांना दिसली तेव्हा त्यांनी त्या अभिनेत्रीला सज्जड दम देत यापुढे चित्रीकरणाच्या आवारात तुम्ही धूम्रपान करताना दिसता कामा नये असे बजावले होते. आज चित्रीकरण होत असताना अनेक अभिनेते, अभिनेत्री चित्रीकरणाच्या मधल्या वेळात बिनदिक्कतपणे धूम्रपान करताना पाहायला मिळतात. यातील अनेक मंडळी चेन स्मोकर आहेत आणि त्याचे त्यांना काही वाटत नाही. एकूणच चित्रपटसृष्टी व्यसनांच्या अधीन झाल्याचे सुशांतसिंग राजपूत याच्या प्रकरणावरून सामोरे आले आहे. प्रचंड प्रमाणात मिळणारे पैसे आणि त्याच प्रमाणात असणारी असुरक्षिततेची भावना यामुळे विविध व्यसनांच्या आहारी, तसेच व्यसनांची उत्पादने असणार्या कंपन्यांच्या जाळ्यात ही मंडळी अडकतात.
याशिवाय शक्तिवर्धक उत्पादने, त्वचा उजळ करणारी उत्पादने, विविध क्रीम्स किंवा शरीराला घटक असणार्या खाद्यपदार्थांच्या जाहिराती केल्या जातात. त्यामुळे अनेक अभिनेत्यांना टीकेला सामोरे जावे लागले आहे. यामध्ये गोविंदा, अमिताभ बच्चन, तसेच शाहरूख खान यांचा समावेश आहे. चित्रपटांपेक्षा क्रिकेटपटू आणि अभिनेते यांना जाहिरातीमधून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असते. त्यामुळे साहजिकच चित्रपटांपेक्षा जाहिराती मिळविण्याचा आणि त्या वारंवार प्रेक्षकांपुढे आणायचा प्रयत्न केला जातो. समाजमनामध्ये अभिनेते, क्रिकेटपटू यांची उदात्त प्रतिमा असल्यामुळे उत्पादन खपावर चांगला परिणाम होत असल्याने या उत्पादनांच्या कंपन्या अशा मंडळींना जाहिरातीसाठी वापरत असतात आणि आपल्या वापराचे चोख मूल्य ही मंडळी वसूल करीत असतात.
जाहिराती करीत असताना किमान ताळतंत्र सांभाळले पाहिजे याचे भानही ठेवले जात नाही. त्याचबरोबर ज्या उत्पादनांची थेट जाहिरात कंपनीला करता येत नाही आणि अभिनेत्यांना लाजेकाजेस्तव अशा जाहिरातींमध्ये थेट भाग घेता येत नाही; त्या जाहिराती वेगळ्या पद्धतीने प्रसारित केल्या जातात. मद्याची जाहिरात सोड्याची जाहिरात म्हणून दाखविली जाते. तंबाखूची जाहिरात पान मसाला म्हणून प्रसारित केली जाते. या जाहिराती दाखविण्यामागचा आशय त्या उत्पादनांच्या विक्रीवर न होता तंबाखू व दारू यांची विक्री व्हावी हाच असतो.
तसेच जाहिरातीचे सादरीकरण हा मुद्दासुद्धा विचारात घेतला जात नाही. मिलिंद सोमण आणि मधू यांनी केलेल्या जाहिरातींवरून मोठा गदारोळ झाला होता. जाहिराती या लहानांपासून मोठ्यांपर्यंत पाहिल्या जातात. त्याचा परिणाम सर्वच वयोगटातील मंडळींवर होत असतो. अशावेळी परिणाम करणार्या माध्यमाने खूप जपून आणि जाणीवपूर्वक, तसेच जबाबदारीने त्याचे सादरीकरण करणे गरजेचे असते; परंतु नावीन्य आणि लोकांची आवड गृहीत धरून स्वतःच्याच बुद्धीने सवंग जाहिराती करण्याचा सपाटा लावलेला दिसतो. अर्थात अशा जाहिरातींमुळे उत्पादन विक्रीमध्ये किती वाढ होते हे त्या कंपन्यांनाच माहीत; परंतु अशा जाहिराती करणार्या अभिनेते, अभिनेत्रींच्या प्रतिमेबाबत मात्र नक्कीच प्रश्नचिन्ह लागते हे नक्की. तेव्हा अशा जाहिरातींची वरात आवरली पाहिजे.