संडे मॅटिनीसंडे फिचर

‘भट्ट कॅम्प’चा त्रिकोणी फरेब

काही काही पिक्चर हे कधीच रिमेक होऊ नये असे असतात आणि काही काही पिक्चर हे प्रत्येक काळाच्या वळणावर परत बनवून बघावे असे वाटणारे. याचा अर्थ असा नाही की, ते तेव्हा जमले नव्हते. याचा अर्थ इतकाच की, ते अशा टेम्प्लेटमध्ये बनले आहेत की, मानवी स्वभावाच्या बेसिक अंत:प्रेरणांची ती कथा बदलत्या सामाजिक संदर्भात नव्या शक्यतांसह पुन्हा एकदा पाहावी.

प्रेमाचा त्रिकोण बॉलिवूडला परवलीचाच. अंदाज ते दिवाना, साजन, जीत, हम दिल दे चुके सनम. किती नावं घ्यावीत? दोन हीरो आणि त्यांच्या प्रेमाच्या कचाट्यात अडकलेली नायिका. मग एका नायकाचा मृत्यू किंवा त्याग. मजा म्हणजे हे टेम्प्लेट इतकं घिसंपिटं असूनही आपण ते तितक्याच आवडीने बघतो. बरेली की बर्फी, तनु वेड्स मनू सारख्या देसी पटांमधूनसुद्धा.
यात एक वेगळी शेड म्हणजे दोन नायकांपैकी एकाने थोडं सायको असणं किंवा नायिकेनंसुद्धा.

मात्र याच टेम्प्लेटची एक खतरनाक व्हेरीएशन सगळ्यांवर प्रचंड भारी ठरते. त्यात असतो दुसरा नायक किंवा खलनायक हा नायकापेक्षा शक्तिशाली. त्याच्यात असते नायिकेला भुलवायची, जिंकायची ताकद. आणि अशावेळी आपलं हृदय त्या बिचार्‍या गरीब नायकासाठी धडधडू लागतं.

हॉलिवूडच्या इंडीसेंट प्रपोजल ते मराठीतल्या शापितमध्ये जिथे जिथे ही कहाणी येते तिथे तिथे आपला कँडी फ्लॉस रोमान्स आपण बासनात गुंडाळून ठेवतो आणि मनावर दडपण घेऊन असे चित्रपट बघतो. कारण साधं आहे. विशेषतः पुरुषांच्या बाबत. तो स्वतःला नायक म्हणून पाहात असला तरी त्याच्या मनातला खलनायक वरचढ ठरत असतो बर्‍याचदा असे सिनेमे बघताना.
१९९६ चा भट्ट कॅम्पचा फरेब या प्रकारातला एक उत्कृष्ट चित्रपट आहे. विक्रम भट्ट या माणसाची एक गंमत आहे. चित्रपट हॉलिवूड किंवा इतर कुठून उचलला असेल तर याची प्रतिभा बहरास येते. पहा – गुलाम, आवारा पागल दिवाना वगैरे. फरेब सुद्धा १९९२ च्या अनलॉफुल एंट्री या जबरदस्त सिनेमाची कॉपी होता. पण मूळ सूत्र तेच. एक सामर्थ्यवान पुरुष एका परस्त्रीला (विवाहितेला) जिंकू पाहतो इत्यादी.

डॉ. रोहन आणि सुमन हे दांपत्य दोन वर्षांपूर्वी मुंबईला आलेलं आहे. रोहनला इथे बंगला, गाडी वगैरे ऑफर असल्याने. (हा सगळा टिपिकल बॉलिवूड विनोद आहे. मॉरिशसमधल्या जागा मुंबई म्हणून खपवणं तर उच्च कोटीचा कल्पनाविष्कार आहे.) असो. तर इथे आल्यानंतर त्यांच्या बंगल्यात चोरीचा एक निष्फळ प्रयत्न होतो. ज्यामुळे त्यांची ओळख इन्स्पेक्टर इंदरशी होते. इंदर आणि रोहन, सुमन समवयस्क असल्याने त्यांची चांगली मैत्री होते. पण अल्पावधीतच रोहनला इंदरच्या डोळ्यात सुमनची आसक्ती दिसते. रोहन त्याच्याशी मैत्री तोडतो. मात्र सुमनला इंदरचा सरळ स्वभाव आणि त्याचं एकटं असणं दिसत असतं. ती इंदरशी मैत्री तोडत नाही. इकडे रोहन सुमनला इंदरपासून दूर ठेवण्यासाठी, तर तिकडे इंदर सुमनला प्राप्त करण्यासाठी जंग जंग पछाडत असतात आणि ही गोष्ट पडद्यावर रचण्यात विक्रम भट्ट आणि टीम अत्यंत यशस्वी ठरली आहे.

लेखक इक्बाल दुर्राणी यांनी (धन्यवाद म्हटलं पाहिजे खरंतर) भारतीय कॉपी आणताना उगाच फार देसी प्रकरण केलेलं नाही. सव्वीस वर्षांपूर्वी या प्रकारचं पाश्चात्त्य जीवनशैलीचं भारतीय मध्यमवर्गीय दांपत्य सामाजिक जीवनात आणि पडद्यावरही विरळ होतं. त्यावर्षीचे इतर हिट्स पाहा. जीत, राजा हिंदुस्तानी, घातक. इकडे नायिका विवाहित असूनही ना साडीत वावरते ना मंगळसूत्र, बिंदी वगैरे. नवर्‍याबरोबर इतरांसमोर आणि सह दारू पिते, नवर्‍याने एखाद्याला भेटू नकोस सांगितलं तरीही स्वतःच्या धारणांवर विश्वास ठेवून निर्णय घेते. चित्रपट गल्ल्यावर यशस्वी झालेला असला तरी हे एक धाडसच म्हणायला हवं. कुठल्या बेसिसवर भट्ट कॅम्पला हा चित्रपट याचा अंग्रेज आत्मा ठेवून हिंदीत करावासा वाटला असेल हा प्रश्न एकदा महेश किंवा विक्रम या भटांना विचारायला हवा.

बहरहाल पश्चातबुद्धीने बघितलं तर एक जोरकस कारण मिळत ते म्हणजे फरेबचा खलनायक इंदर. १९९३ च्या शाहरुखच्या डरने एक नवा anti hero आणला होता जो पझेसिव्ह लवरच्या पाच पावलं पुढे असलेला सायको होता, त्याचंच एक सोफिस्टिकेटेड रूप होतं फरेबचा इन्स्पेक्टर इंदर.

इंदर खरंतर रांगडा फौजदार गडी आहे. शाहरुखच्या प्रेमिकासारखा दोन गु्द्यांत खाली पडेल असा नाहीच, उलट एका ठोशात समोरच्याला गारद करेल असा आहे. सिनेमात इंदरची ही अजस्त्र ताकद एक-दोन प्रसंगात बघायला मिळते. डोक्यानेही तो फारसा तरल वगैरे नाहीये. दुनियेचे काळे आणि पांढरे भागच त्याला माहिती आहेत. मग तो सोफिस्टिकेटेड कसा?
तुलना करायची म्हणून नाही तर अपरिहार्यपणे येते म्हणून बघुया. डरचा सुनील, चित्रपटात किरणला आपली करायला जे काही करतो ते तद्दन उथळ आहे. किरणच्याच घरातून फोन करणं वगैरे. पण इथे इंदर जे काही स्किमिंग करतो किंवा करत नसेल, पण योगायोगाने तो तिथे असतो, हे अत्यंत डोकेबाज पद्धतीने येतं. अर्थात लेखक दिग्दर्शकाची कमाल.

उदाहरणार्थ रोहन आणि सुमनच्या घराची वीज खंडित होणे किंवा महत्त्वाच्या प्रसंगी रोहनला सरकारी कामात अडकून राहावं लागणं. यात इंदर कुठेही यामागे आहे हे दिसत नाही. उलट यातून रोहन सुमनला मदत करायला तोच पुढे असतो. यामुळे इतरांचं मत इंदरबद्दल चांगलं बनत असतं आणि रोहन एकटा पडल्यासारखा होत असतो.

हा इंदर जो आहे तो फरेब हिट होण्याचं (चित्रपटाच्या गाण्यांबरोबर) एक मोठं कारण आहे. ही व्यक्तिरेखा म्हणजे आधी म्हटल्याप्रमाणे पोरगेला प्रेमवीर नाही. हा अत्यंत शातीर असा कायदा खांद्यावर वागवणारा तगडा माणूस आहे. अधिकांश पुरुष वरकरणी जरी रोहन असले तरी मनातून ते इंदर होण्याचं चोरटं सुख उपभोगत असतात.

चित्रपटात एका (हॉलिवूडच्या ओरिजनलमध्ये अधिक उत्कटने असलेल्या) प्रसंगात, प्रणयक्रीडेत मग्न असलेल्या रोहन आणि सुमनवर त्यांच्या नकळत घरात शिरलेला इन्स्पेक्टर इंदर थोडा वेळ ते दृश्य बघून मग टॉर्च मारतो, तेव्हा त्या काळात थेटरमध्ये हशा आणि शिट्ट्या आल्या होत्या. Pervert असणं आपण उघड मान्य करत नसलो तरी ते असं कुठून तरी बाहेर पडतं. आपणही कधी कुठेतरी इंदर असतो आणि आपल्या आवडत्या स्त्रीला तिचा कायदेशीर पुरुष भोगत असल्याची सल अशी विनोद नाही तर उपहासातून बाहेर पडते. निव्वळ हेच नाही तर इंदरची अशी इतर कृत्यं प्रेक्षकांना म्हणजे पुरुषांना चेकाळून सोडणारी आहेत. इंदरच्या दृष्टीने सुमन अतृप्त आहे. हे अजून एक लोकप्रिय आणि गृहीत धरलं जाणारं मिथक. लग्नानंतर मूल नसणं म्हणजे बाई असमाधानी आणि पुरुष नामर्द. हे उल्लेख इंदरच्या बोलण्यात अनेकदा येतात रोहनला कमीपणा दाखवायला. विक्रम भट्टच्या किंवा विशेष फिल्म्सच्या चित्रपटात व्यक्तिरेखा रचना मेहनतीने किंवा एक विचार घेऊन बनवल्या असतात. त्यांचे चित्रपट जरी डार्क, noir + pop पंथातले असले तरी पात्रांना एक खोली असते. इकडे इंदरला सशक्त बनवताना रोहनला उगाच बावळट केलेलं नाहीये. तो निरागस आहे, घाबरणारा आहे कारण सुमनवर त्याचं अत्यंत प्रेम आहे. तो हुशार आहे आणि म्हणूनच इंदरचा खुनशी, विकृत स्वभाव त्याला लगेच कळतो.

सुमन ही सुंदर, खरंतर मादक पण अजिबात कसलेही नखरे नसलेली साधी मुलगी आहे. तिच्या व्यक्तिरेखेला फारसे कंगोरे नसले तरी तिच्या मनातली रोहन बद्दलची अढी ही बर्‍याचश्या स्त्रियांची प्रातिनिधिक मनोवस्था वाटते. केवळ नवरा आहे म्हणून त्याने दिलेला घाव निःशब्द झेलत राहायचा, त्याला न दुखावता असं सुमनचं आयुष्य चाललेलं आहे. आणि इन्स्पेक्टर इंदरचं आयुष्यात येणं तिच्यासाठी सुद्धा एक बदल आहे.

संपताना फरेब येणेप्रमाणे हिंदी चित्रपटाचं वळण घेतो. बाकी भट्ट फिल्म्स मध्ये असतात ते कलाकार, नायकाचे मित्र, खुनशी आणि सायको खलनायक हे जरुरीचे घटक आहेतच. पण भट्ट कॅम्प मध्ये नंतर फारसे न दिसलेले जतिन ललित इकडे धमाल करून जातात. त्यांनी एक से बढकर एक गाणी दिली. आंखो से दिल में उतर कर, ओ हमसफर दिल के नगर, यार का मिलना ही गाणी आज ही कालबाह्य वाटणार नाहीत. आणि चेरी ऑन टॉप म्हणजे त्या वर्षी काही महिने पहली पायदान पे असणारं ये तेरी आंखे झुकी झुकी या चित्रपटाने मिलिंद गुणाजी स्टार झाले. खरंतर इंदरचं पात्र नाना पाटेकरला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं जाणवतं. मिलिंद गुणाजींच्या त्या विचित्र ऑकवर्ड स्वॅगने आणि त्यांच्या रुबाबदार देखण्या व्यक्तिमत्त्वाने हा इंदर सक्सेना आयकॉनिक झाला. त्यांच्या खलनायकी संवादांनंतर छान हसण्याने आणि कुठेही फार आरडाओरडा न करता कूल वावरण्याने हा खलनायक अतिशय टफ होऊन गेला. इकडे फराझ खान ने सुद्धा सिधासाधा रोहन रंगवताना तोडीस तोड काम केलंय.

सत्तरी मधल्या अमिताभच्या चित्रपटात दिसणार्‍या विलन झेबिस्कोचा हा मुलगा. सुनील शेट्टीच्या पृथ्वी मध्ये सुद्धा बरं काम केलंय. २०२० मध्ये अवघ्या ५०व्या वर्षी गेला. फरेबने वर आणलेले तिन्ही स्टार्स भट्ट कॅम्पच्या परंपरेला जागत हळूहळू मागे पडले. सुमनची भूमिका करणारी सुमन रंगनाथ ही कर्नाटकची मॉडेल, अभिनेत्री ही आद्य बिपाशा, लारा, मल्लिका वगैरे म्हणता येईल अशी सेक्स सिम्बॉल झाली होती. गंमत म्हणजे बिपाशा, मल्लिका आणि आजच्या नायिका करतात त्याच्या निम्म्यानेही अंग प्रदर्शन न करता फक्त तिच्या लूक्स मुळे सुमन रंगनाथ पब्लिकच्या जीवाला त्रास देती झाली होती. हळूहळू खल व्यक्तिरेखा ते आयटेम नंबर असा तिचा प्रवास झालेला आहे. पब्लिक मेमरी इज वेरी शॉर्ट. म्हणून सुरुवातीलाच म्हटलं की कधीही रिमेक होऊ शकेल असा हा सिनेमा आहे. आताच्या सोशल मीडियाच्या काळात फरेब सारखा सिनेमा इतका वस्तुस्थितीला धरून असेल. कारण असे शेकड्याने रोहन व सुमन आपल्याला सोशल मीडियावर दिसतात.

मात्र असून दिसत नाहीत ते… बडी किस्मतवाला हैं वो प्यार तेरा जिसे मिला म्हणणारे इंदर.

_गुरुदत्त सोनसूरकर

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये