रेड लाईट डायरीसंडे फिचर

फिल्मी मुजर्‍यांची दुःखद दास्तान…

हिंदी सिनेमाला कुठल्या विषयाचे वावडे नसते असाच आजवरचा इतिहास सांगतो. त्यातही रोमान्स, ड्रामा आणि भावनाप्रधान विषयांची रेलचेल आढळते. विविध विषयांवरचे सिनेमे असले तरी नाचगाणं हे सिनेमाचं एक अंग बनून गेलंय. भिन्न नृत्यप्रकारांपैकी मुजरा नृत्ये आजही भाव खाऊन आहेत. पैकी काही सिनेमांत नायिकाच मुजरेवाली होती. काही निवडक मुजरेवाल्या नायिकांमागची खरी दास्तान अत्यंत वेदनादायी अशीच आहे. त्याचा छोटासा धांडोळा…

मुकद्दर का सिकंदर मधली जोहराबाई कामाठीपुर्‍यातल्या मुजरा गल्लीत होऊन गेली तो काळ स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यपश्चातच्या नव्या भारताचा होता. १९५० चं दशक असेल ते. ऐंशीच्या दशकानंतर मुजरा नर्तिकांच्या आयुष्याचे धिंडवडे निघाले आणि त्या धंद्याला लागल्या. १९५० च्या आसपास ग्रँटरोडमधील बच्चूच्या वाडीत जोहराबाईचं नाचगाणं चालायचं. जोहराबाईकडे येणार्‍या लोकांत ब्रिटिशांच्या सेवेत असणारे भारतीय पोलिस शिपाईही असत आणि चोरमवालीही असत! एके दिवशी अंगावर धड कपडे नसलेल्या आणि ओठांवर कोवळी मिसरूड फुटलेल्या पोरानं तिचं नाचगाणं पाहिलं, तिच्या अदा पाहिल्या. झोपडीवजा घरी गेल्यानंतर जोहराबाई त्याच्या डोक्यातून जात नव्हती. त्याच्या विचारात वासनेचा लवलेश नव्हता, कारण त्यानं आपल्या आईला जोहराबाईच्या जागी पाहिलं आणि त्याच्या मनात भावनांचा हलकल्लोळ माजला. त्याच्या आयुष्यावर परिणाम करून गेलेल्या घटनांपैकी ही एक मुख्य घटना ठरली.

त्या मुलाचा जन्म २२ ऑक्टोबर १९३७ चा. अफगाणिस्तानच्या काबूलमधला. कर्मठ पश्तून काकड जमातीचे हे कुटुंब. फाळणीनंतर या जमातीचे अनेक लोक राजस्थानात स्थलांतरित झाले. त्याचे वडील अब्दुल रहमान कंदहारचे, तर आई इक्बाल बेगम आताच्या पाकिस्तानातील बलुच प्रांतातील पस्शीनची. त्याच्या मात्यापित्याच्या पोटी त्याच्या आधी तीन अपत्ये जन्मली होती, पण जन्मानंतर काही काळातच ती दगावली. दरम्यान, त्याच्या मातेला असं वाटू लागलं की, इथलं वातावरणच आपल्याला मानवत नाहीये, तेव्हा आपण जागा बदलून दुसरीकडे जाऊ. नाहीतर हा चौथा मुलगादेखील मरण पावेल. इक्बाल बेगमच्या हट्टापुढे कोणाचे काही चालले नाही. सगळा बाडबिस्तरा घेऊन हे कुटुंब भारतात आले. बरीच भटकंती करून ते मुंबईत आले. ग्रांटरोडच्या झोपडपट्टीतल्या एका झोपडीत त्यांना छप्पर मिळालं. तिथल्या गटार कचर्‍याच्या गलिच्छ वातावरणात ते राहू लागले. दारूअड्डे, जुगार अड्डे, वेश्यावस्ती आणि कत्तलखाने यांचा त्या कोवळ्या मनाच्या मुलावर खोल आघात झाला. अनंत हालअपेष्टा आणि उपेक्षा सहन करून तो मुलगा पुढे मोठा लेखक झाला. त्याच्यातल्या संवेदनशील मनाने जोहराबाईला शब्दबद्ध केलं, त्यात थोडा फिल्मी मसाला घातला. चित्रपट सुपरडुपर हिट झाला. तो लेखक कादरखान होता!

अशीच गोष्ट ’अमरप्रेम’मधल्या पुष्पाची आहे. पुष्पा आणि जोहराबाई यांच्या कालखंडात चार दशकांचे अंतर असावे. पुष्पा कोलकात्यातल्या शोभाबाजारमधल्या गल्लीत राहायची. आताच्या सोनागाची या रेडलाइट एरियात हा भाग येतो. एकोणिसाव्या शतकात इथं दोन प्रकारच्या वेश्या होत्या, एक देहविक्रय करणार्‍या आणि दुसर्‍या कोठेवाल्या. पुष्पा कोठेवाली होती. ती दिसायला कमालीची सुंदर, कमनीय तर होतीच, पण तिच्या आवाजात अत्यंत गोडवा होता. जोहराबाईवर कादरखान यांनी मुकद्दर का सिकंदर लिहिला. तेव्हा सिकंदर आणि विशाल ही काल्पनिक पात्रे लिहिताना सिकंदरमध्ये स्वतःचं बालपण अत्यंत खुबीनं मिसळलं होतं. ’अमरप्रेम’च्या पुष्पाचं तसं नव्हतं. तिच्याकडे येणारा आनंदबाबू वास्तवात होऊन गेला होता.

१९२० ते १९३० च्या दशकात आनंदबाबूचं पुष्पाकडे येणंजाणं होतं, त्याच काळात एक अत्यंत भणंग अवस्थेतला उदासवाण्या चेहर्‍याचा तरुण आपल्या मित्रासोबत तिथं यायचा. किशोरवयात त्या तरुणाचं लग्न झालं होतं आणि लग्नानंतर अवघ्या काही वर्षांत त्याची पत्नी निवर्तली तेव्हा त्याचं वय होतं केवळ १९ वर्षे ! तो तरुण पुष्पाला डोळे भरून बघायचा आणि पहाटेस निघून जायचा! तसं तर त्याच्याकडे काहीच नव्हतं, एकदम कफल्लक आणि डिप्रेस्ड होता तो! काही वर्षांनी त्याच्या मनानं उभारी घेतली तेव्हा त्यानं हाती लेखणी घेतली. आधी मानवी नात्यांच्या कथा लिहिल्या, मानवी मनाची उकल निगुतीनं मांडली. त्याच्या काळजाच्या एका कोपर्‍यात ठाण मांडून बसलेला आनंदबाबू आणि पुष्पादेखील शब्दबद्ध झाले. त्यानं त्यांच्यावर कथा लिहिली, तिचं नाव होतं ’हिंगेर कचोरी’! ते साल असावं १९३० च्या आसपासचं. त्या तरुणाचा १९५० च्या सुमारास मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर १९ वर्षांनी अरविंद मुखर्जी यांनी ’निशी पद्मा’ हा बंगाली सिनेमा बनवला. त्याला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. १९७२ मध्ये शक्ती सामंत यांनी याच सिनेमावर आधारित ’अमर प्रेम’ बनवला. यातला राजेश खन्नाने साकारलेला आनंदबाबू आणि शर्मिला टागोरने साकारलेली पुष्पा विसरणं अशक्य गोष्ट आहे. पुष्पाला अजरामर करून गेलेला तो महान प्रतिभाशाली लेखक होता विभूतीभूषण बंदोपाध्याय!

विभूतीभूषण बंदोपाध्याय यांच्या आयुष्यात इतके चढउतार आणि हलाखीचे दिवस येऊन गेले की, त्यांच्यावरच एक सिनेमा निघायला हवा. त्यांची पहिली पत्नी लग्नानंतर एका वर्षात निवर्तली. तेव्हा त्यांचे वय होते १९ वर्षे. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी दुसरे लग्न केले. त्यांना तारादास नावाचा एक मुलगा झाला. मुलाच्या जन्मानंतर ४ वर्षांनी आताच्या झारखंडमधील पूर्वी सिंहभूम जिल्ह्यातील घाटशिला येथे त्यांचे १९५१ साली निधन झाले. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर जवळजवळ २७ वर्षे ते विधुर म्हणून एकांताचे आणि अनेक हालअपेष्टांचे जिणे जगले. याच काळात त्यांनी जी दुनिया बघितली त्यावर आधारित अनुभवांना ते शब्दबद्ध करीत गेले. त्यांनी १६ कादंबर्‍या लिहिल्या. त्यांच्या कथांवर अनेक महान चित्रपटांची निर्मिती झाली आहे. मुजरेवाल्या बायकांच्या कथा बॉलिवूडला नेहमीच भुरळ घालत आल्यात. मुजर्‍याचा इतिहासच मुळात रंजक आहे. त्यावर लिहीत गेलं की, लेखणीला घुंगरू फुटतील, पण शाईच्या ऐवजी रक्त पाझरेल हे नक्की!

पुष्पा आणि जोहराबाई यांचं कथात्मक स्वरूप पाहताना लेखकांच्या जडणघडणीचा प्रभाव स्पष्ट जाणवतो. आयुष्यभर हालअपेष्टा सोसलेल्या कादरखानने जोहराबाईला तिचं प्रेम मिळवता येत नसल्याचं दाखवत ती आत्महत्या करते असं चित्र रंगवलं होतं, तर विभूतीभूषण बंदोपाध्याय यांनी पुष्पाच्या आयुष्यात अनेक काटेरी वळणं आणत दुर्गेशी निगडित साम्य दाखवत सुखांत केला होता, मात्र त्या दरम्यान पुष्पाच्या आयुष्याची लक्तरे वेशीवर टांगली जातात. जोहराबाई श्रीमंत आणि भव्य वाटते तर पुष्पा सालस, सोज्वळ वाटते! माणसाचा त्या त्या काळातला जगण्याचा दृष्टिकोन आणि त्याला आलेले अनुभव यातून तो जगाबद्दलची मते ठरवत असतो !

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये