देश - विदेशरणधुमाळीसंडे फिचर

एक कदम जुड जाये वतन

कन्याकुमारी ते काश्मीर अशी साडेतीन हजार किलोमीटरहून अधिक राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा दोन दिवसांत महाराष्ट्रामध्ये येत आहे. मराठवाड्यातील देगलूरमधून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व म्हणून चालणारी यात्रा या राज्यातील काँग्रेसची मरगळ दूर करून त्यांना एक नवा उत्साही आशेचा किरण दाखवण्यासाठी उपयुक्त ठरणारी आहे. केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर सध्या देशभरामध्ये या भारत जोडो यात्राची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. गेल्या दोन पंचवार्षिकपासून नरेंद्र मोदी यांच्या अतिभव्य प्रभावाखाली या देशभरात चालणारी मीडिया सोशल मीडिया खरे-खोटे वास्तवदर्शी आणि भ्रामक कल्पनेतील घोषणाबाजी आणि त्याचा भव्य दिव्य होणारा प्रचार या सर्वांना छेद देणे ही खरी काँग्रेसची या पाठीमागची रणनीती आहे.

रणनीतीमध्ये राहुल गांधी कितपत यशस्वी होतात ते लवकरच येणाऱ्या गुजरातच्या निवडणुकीमध्ये दिसून येणार आहे. गुजरातच्या निवडणुकीत काँग्रेस फार देदीप्यमान कामगिरी करेल असे नाही; परंतु सत्ता केंद्राच्या विरोधातील एक सूर मोठ्या प्रमाणामध्ये उंचावण्यात याचा प्रभाव निश्चितपणे मिळणार आहे आणि तेथे आम आदमीला त्याचा फायदा होईल, असा कयास आहे.

नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये आवाज उंचावण्याकरता ही भारत जोडो यात्रा असली, तरीदेखील मुख्यत्वे करून महागाईच्या विरोधामध्ये देशबांधणीवर आम्ही जोर देत आहोत हा विचार सर्वसामान्य लोकांना पटणारा आणि त्यांच्या मनाला भावणारा आहे. जरी आज बहुसंख्य वर्ग हा मोदींच्या विरोधात काहीही ऐकण्यास तयार नसला, तरी महागाईच्या विरोधामध्ये सर्वांचेच कंबरडे मोडले आहे, तो सामान्य माणूस काँग्रेसच्या या अभियानामध्ये मनापासून त्यांच्यासोबत असेल यामध्ये संदेह नाही.

यात्रेला कितीही तुच्छ मानून मोदी आणि त्यांच्या पाठीराख्यांनी त्याची हेटाळणी चालवली असली, तरी राज्यभरामध्ये त्याला वाढणारा प्रतिसाद आणि सहभागी होणारे कार्यकर्ते पाहून याचा जलवा सत्ताधाऱ्यांना नक्कीच विचार करायला लावणार आहे. खरे तर प्रत्येक पदयात्रेच्या मध्ये केवळ तीनशेच लोकांनी चालावे अशी मर्यादित संख्या असूनदेखील या पद्धतीने हा ‘कारवा’ निघाला आहे आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. त्यावरूनच काँग्रेसला नवचैतन्य मिळून भाजपविरोधी वातावरण तयार होण्याला निश्चितच काही प्रमाणात का होईना हातभार लागणार आहे.

कारण सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील भूगोल किंवा मोदींचा द्वेष हा या यात्रेचा मुख्य अजेंडा नाही, तर महागाईच्या विरोधामध्ये देशाच्या एकसंघतेला आव्हान देण्यासाठी ती यात्रा असल्याचे वारंवार बोलले जात आहे आणि महागाईने खचलेला, पिचलेला सामान्य माणूस पदयात्रेत सहभागी होताना दिसत आहे. कितीही उदात्त आणि महान देशाची संकल्पना बांधली जात असली, तरीदेखील बेरोजगारी आणि महागाई हे कळीचे मुद्दे आहेत. आणि त्यातून सामान्यांचे घर असेल, तर हे वास्तव नाकारता येणार नाही.

गल्लीमध्ये मिळणाऱ्या वाण्याच्या दुकानातील तेलाचे भाव वाढण्यापासून ते आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय चलनाचे अध:पतन होईपर्यंत सगळीकडे निराशाजनक वातावरण आहे. मोदींची इव्हेंट, मोदींची भव्यदिव्यता, त्यांचे प्रभावी प्रचार दौरे, त्याला होणारी गर्दी हे सगळं सगळं जरी खरं मानलं, तरी आज मला घरामध्ये विकत आणावा लागणारा किराणा माल हा परवडणारा नाही. आणि माझ्या घरटी असलेला अर्धबेकार किंवा बेकार माणूस हा मला सहन होण्याच्या पलीकडचा आहे. हे वास्तव कुठलाही सामान्य नागरिक विसरू शकत नाही.

बेरोजगारीची कमाल मर्यादा ओलांडून गेल्यानंतर अक्षरशः आर्थिक उत्पन्नाच्या अभावी मध्यमवर्गीय आणि लहानवर्गीय नागरिकांची प्रचंड ससेहोलपट होत आहे. त्याला फुंकर घालण्यास कुठे तरी मोदी सरकार कमी पडले हे वास्तव आहे. हे वास्तव कदाचित मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या काही धुरिणांना दिसत नसले, तरी त्याच्या धगीला मात्र सर्वांना सामोरे जावे लागत आहे. राहुल गांधी यांचा हा आवाज याच धगीवर कुठे तरी माणुसकीची फुंकर घालणारा ठरेल यात संदेह नाही.

भाजपच्या एकचालकानुवर्तित्वाच्या अनुषंगाने कुठे तरी संविधानाने लोकशाहीच्या विरोधामध्ये काही तरी कृती होते आहे, ही खदखद प्रत्येकाच्या मनात आहे. त्यामुळे संविधान वाचवा हीदेखील ठोकलेली आरोळी एकप्रकारे बहुसंख्याक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दैवत मानणाऱ्या लोकांना अपील करणारे आहे. सुरक्षा यंत्रणांचा आणि तपास यंत्रणांचा गैरवापर करून अनेक मोठे दिग्गज आपल्या बाजूने वळविणाऱ्या मोदी सरकारचे किंवा एकूणच भाजपशासित प्रादेशिक सत्ताधाऱ्यांचे मनसुबे लपून राहिलेले नाहीत.

त्यामुळे येथेदेखील ‘नफरत छोडो’ ही राहुल गांधी यांनी दिलेली हाक याला पूरक अशी आहे. राजकारणाशी संबंध नसणाऱ्या सामान्य माणसाला देखील आज ज्या पद्धतीने कारवाया सुरू आहेत किंवा धाडी सुरू आहेत आणि त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या व्यक्तींना ज्या पद्धतीने संरक्षण मिळते आहे, हे उघड्या डोळ्याने दिसत आहे; त्यामुळे भाजप सरकार या संपूर्ण व्यवस्थेचा गैरवापर करत आहे आणि हे लोकशाहीच्या आणि संविधानाच्या विरोधी आहे हे पटवून देण्यात राहुल गांधी यांची यात्रा काकणभर का होईना यशस्वी होत आहे.

मोदी हे प्रभावी नेते आहेत. कदाचित ते प्रामाणिकही असतील. उपकारकही असतील; परंतु ते देव नाहीत. त्यांचेही चूक असू शकते आणि त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या केंद्रीय आणि राज्य सत्ताधाऱ्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात चुकांचे प्रसारण होत आहे याची जाणीव आता सामान्य माणसांना झाली आहे. हीच जाणीव राहुल गांधी यांच्या सभेनंतर अत्यंत प्रगल्भ होईल, यात संदेह नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये