धीरेंद्र शास्त्रींच्या मुंबईतील कार्यक्रमाला नाना पटोलेंचा विरोध; म्हणाले, “अशा मानसिकतेच्या लोकांना…”
मुंबई | Nana Patole – काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) यांच्या मुंबईतील कार्यक्रमाला विरोध केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहिलं आहे. “धीरेंद्र शास्त्री यांच्या मुंबईतल्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नका”, अशी विनंती या पत्रात नाना पटोलेंनी एकनाथ शिंदेंकडे केली आहे. धीरेंद्र शास्त्रींचा कार्यक्रम 18 आणि 19 मार्च रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे.
नाना पटोलेंनी पत्रात लिहिलं आहे की, “महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून अंधश्रद्धा पसरवणाऱ्या लोकांसाठी या राज्यात जागा नाही. प्रवचनकार धीरेंद्र शास्त्रींनी जगतगुरू संत तुकाराम महाराजांचा अपमान केला आहे. तसंच संपूर्ण वारकरी संप्रदायाचा अपमान त्यांनी केला आहे. त्यांनी लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेला धक्का पोहोचवला आहे. संत तुकारामांचा अपमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रीच्या कार्यक्रमाला राज्यात परवानगी देणं म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासारखं आहे. म्हणूनच धीरेंद्र शास्त्रीच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये.”
यासंदर्भात माध्यमांनी विचारलं असता नाना पटोले म्हणाले की, “सरकारनं बागेश्वरसारख्या मानसिकतेच्या लोकांना लगाम लावला पाहिजे. अशा लोकांना सरकार स्वतःच पाठिंबा देऊन राज्यातलं वातावरण बिघडवत असेल तर ही गोष्ट राज्यासाठी चांगली नाही.”