टेकडीफोड करुन अनधिकृत बांधकामांचे ‘इमल्यावर इमले’…!
![टेकडीफोड करुन अनधिकृत बांधकामांचे ‘इमल्यावर इमले’…! Hill Area](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2024/12/Hill_Area-780x470.jpg)
राष्ट्र संचार न्यूज नेटवर्क
पुणे : बीडीपी आरक्षणावर शिक्कामोर्तब होण्यासाठी जवळपास १० वर्षे लागली. परंतु बीडीपीतील (BDP) खासगी जागा ताब्यात घेण्यासाठी मोबदला किती द्यायचा हे निश्चित झालेले नाही. त्यामुळे अखेर जागामालकांनी जमेल त्या पद्धतीने त्यावर बांधकामे सुरू केली आहेत. राजकीय नेत्यांकडून स्थानिक कार्यकर्त्यांना हाताशी धरून टेकड्यांवर अनधिकृत टेकडीफोड करून त्यावर बेकायदेशीर झोपडपट्ट्या उभारण्याचे काम सुरू झाले आहे.
महापालिकेकडून जैवविविधता उद्यान (बायो डायव्हर्सिटी पार्क- बीडीपी) (BDP) म्हणून घोषित केलेल्या भांबुर्डे टेकडीवर हिलटॉप, हिलस्लोपवर खोदकाम सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हायटेन्शन टॉवर आणि वायरखालील जमिनीचे सपाटीकरण करून जागेची विक्री सुरू आहे. त्या ठिकाणी उत्खनन केल्यामुळे शेकडो मेट्रिक टन गौणखनिज स्थलांतरित करून जिल्हा प्रशासनाचा महसूल बुडवण्यात आला आहे. गंभीर बाब म्हणजे पुणे महापालिका प्रशासन आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तक्रार करूनही कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने महापालिकेत समाविष्ट २३ गावांसह जुन्या हद्दीतील टेकड्यांवर बीडीपीचे आरक्षण टाकण्यात आले. त्यावर राज्य सरकारकडून शिक्कामोर्तबही करण्यात आले. त्यामुळे टेकड्यांच्या १०० मीटर परिसरात बांधकामाला बंदी घालण्याचा शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे. मात्र पुणे महापालिका (PMC) आणि पुणे जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बीडीपीच्या जागेत बेकायदेशीर प्रकार सुरू आहेत. सर्व टेकड्यांचे एकूण ९०० हेक्टर क्षेत्र बीडीपी म्हणून आरक्षित आहे. त्यापैकी ६०० हेक्टर क्षेत्रावर अनधिकृत बांधकामे झालेली आहेत. त्यामुळे अशा अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी आणि टेकड्या वाचवाव्यात यासाठी स्वयंसेवी संस्था (NGO)आणि नागरिकांकडून अनेक आंदोलनेदेखील करण्यात आली होती.
सुतारदरा येथील भांबुर्डे टेकडी फोडून प्लॉटिंग सुरू झाले आहे. २० ते २५ लाख प्रतिगुंठा दराने विक्री सुरू झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. शहरातील टेकड्यांची अशाप्रकारे तोडफोड सुरू असताना पुणे महापालिकेची यंत्रणा मात्र सुस्त झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते हर्षवर्धन दीपक मानकर (Harshwardhan Deepak Mankar) म्हणाले, सुतारदरा येथील टेकडी बीडीपीसाठी आरक्षित आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून हिलस्लोप, हिलटॉपवर बेकायदेशीरपणे खोदकाम केले जात आहे.
प्लॉटिंग करून गुंठे विकले जात आहेत. सध्या हायटेन्शन टॉवर आणि वायरींच्या खाली प्लॉटिंग केले जात आहे. त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे झोपड्या तयार केल्या जाण्याची शक्यता आहे. नागरिकांची आर्थिक लूट केली जाऊ शकते. साधारण एक ते दोन एकर जागेचे सपाटीकरण सुरू आहे. पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देऊन कारवाईची मागणी करणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. वर्षअखेर (Year End) आणि सलग सुट्ट्यांमुळे पुणे महापालिकेचे अधिकारी रजेवर गेले आहेत. त्यामुळे यावर नेमकी कोण कारवाई करणार, असा संतप्त सवालदेखील त्यांनी उपस्थित केला. महापालिका प्रशासन आणि राज्य शासन ‘ बीडीपी’च्या संदर्भात योग्य तो निर्णय घेत नसल्याने अनाधिकृत बांधकामांना अभय मिळत आहे, त्याशिवाय पर्यावरणवादीही चुकीचा हट्ट धरत असल्याने झोपडपट्ट्या वाढत आहे. त्याचा नाहक त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे, ही बाब लक्षात घेऊन राज्य शासन आणि महापालिका प्रशासनाने याबाबत तातडीने योग्य तो निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, असे भाजपा प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर म्हणाले.