मुख्यमंत्र्यांचं एकाच वेळी चार पक्षांना खिंडार, मुंबईत ४० नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश
परभणी : (Entry of Shiv Sainiks into Shinde group in Parbhani) मागील तीस वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राष्ट्रवादीची सर्वाधिक ताकद असलेल्या परभणीमध्ये शिंदे गटाने चारही पक्षांना खिंडार पडलं आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या चार पक्षांना मोठा धक्का बसला आहे. पंचायत समितीच्या सभापतीसह चाळीस सरपंच, उपसरपंच यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणीत बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये एखादा मोठा नेता गेला नसला, तरी आता हळूहळू बाळासाहेबांची शिवसेना परभणीमध्ये आपले हातपाय पसरताना दिसत आहे. परभणीच्या पाथरी येथील बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते सईद खान यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पाथरी आणि मानवत तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची 16, राष्ट्रवादी काँग्रेसचे 15, काँग्रेस 4 , अपक्ष 4 , वंचित बहुजन आघाडी एक अशा एकूण 40 जणांचा प्रवेश सोहळा पार पडला.
या अगोदर देखील सहित खान यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यासह इतर पक्षातील काही आजी-माजी नगरसेवकांनी मुंबईमध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. परभणीमध्ये मोठा चेहरा अद्यापपर्यंत बाळासाहेबांच्या शिवसेनेत नसला तरी हळूहळू आता बाळासाहेबांचे शिवसेना परभणी मध्ये आपले पाय पसरत आहे.