लेखसंडे फिचर

‘तो’ असतोच आपल्या पाठीशी

असंच… सहज…| अश्विनी धायगुडे – कोळेकर

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असे प्रसंग येतातच. जेव्हा त्याला वाटतं की, ‘ आता आपल्या जगण्यात अर्थ नाही’, आपण जगायच्या लायकीचे नाहीत, आपण इतके मूर्ख नि बावळट कसे आहोत, वगैरे वगैरे. हे असं वाटणं अगदी खरंच आहे बरं का. यात अजिबात कसलाही खोटेपणा नाही!

आयुष्याच्या एका टप्प्यावर हे सगळ्यांच्याच बाबतीत होतं. फक्त प्रत्येकाचा टप्पा वेगळा असतो. यावेळी आपण कमालीचे डिप्रेशनमध्ये जातो. आपलं अख्खं आयुष्य नकारात्मकतेने व्यापून जातं.

अशावेळी एकच गोष्ट लक्षात ठेवायची असते की ” तो ” असतोच कुठेतरी. आता तो म्हणजे ‘देव’, ‘अल्लाह’, ‘ येशू’ आहे असंच काही नाही. कुणासाठी तो ‘देव’ असतो, कुणासाठी ‘अल्लाह’, कुणासाठी ‘ येशू’, कोणासाठी निसर्गाची अशी शक्ती जी तुम्हा-आम्हाला चालवते तर कुणासाठी तो अजून काही असू शकतो. पण मला अगदी प्रामाणिकपणे वाटते कित्येकदा ‘तो’ म्हणजे जगातला चांगुलपणा, माणसांमधली माणुसकी, नात्यांमधला विश्वास, साथीदारावरचे प्रेम आणि जिवलग मित्रांची मैत्रीरुपी साथ.
‘कठीण प्रसंग येता कोण कामास येतो’ असं सर्रास म्हटलं जातं. पण प्रत्येकालाच तुमच्या पडत्या काळात तुम्हाला हात देणं शक्य नसतं. कित्येकदा इच्छा असतानाही ते हतबल असतात. पण, याचा अर्थ ते ‘आपले नाहीतच’ असा नाही होत ना? कदाचित ते स्वतः देखील अशाच कोणत्या तरी अडचणींचा सामना करीत असतील.

त्यांची परिस्थिती आपल्यापेक्षा वेगळी आणि कठीण असू शकते. पण त्या क्षणाला आपल्या डोक्यात असा कोणताच विचार येत नाही. आपण पूर्णतः नाकारतांक गोष्टींकडे झुकले जातो. उलट पक्षी जरी ते मदतीसाठी उभे राहू शकले नसतील तरी कदाचित त्यांनी तुमच्यासाठी केलेल्या प्रार्थनांमुळे, शुभेच्छांमुळे, त्यांच्या सकारात्मक ताकदीमुळेच त्या कठीण प्रसंगामधून तुम्ही तारले गेलेले असू शकता. पण, आपण मात्र त्याकडे नकारात्मक पद्धतीनेच पाहतो. आपल्याला वाटायला लागतं ‘ आज माझ्यावर अशी वेळ आली म्हणून… ‘

खरंतर अशा कठीण प्रसंगानंतर कैकदा आपण पुन्हा या लोकांचे तोंडही बघत नाही, संवाद वगैरे तर फार दूरची गोष्ट आहे. अशामुळे चांगली नाती देखील संपून जातात. पण आपण हे विसरून जातो की , या नात्यांनी देखील आपल्याला सांभाळलेले असते. आपल्या आयुष्यातील भावनिक , मानसिक पातळीवरही कित्येक जागा या नात्यांनी व्यापलेल्या असतात. त्यामुळे ही नाती सांभाळली जावीत यासाठी कायमचा प्रत्येकाने प्रयत्नशील असणे गरजेचे असते.

शेवटी एक स्वतंत्र आणि सक्षम व्यक्ती म्हणून जर विचार केला तर ही अशी आलेली परीक्षेची कठीण वेळच आपल्याला खूप स्ट्रॉंग बनवते. आपल्याला स्वतःचा शोध लागतो. आपण किती ताकदीचे आहोत याचा अंदाज अशा परिस्थितीमधून गेल्याशिवाय येत नाही. आपला आपल्यावरचाच विश्वास कित्येक पटींनी वाढतो. आपण ‘हे विष’ देखील अगदी सहज पचवू शकतो हे आपल्यालाच नव्याने उमगते.

या सगळ्यांत काही भक्कम हात असतातही आपल्या सोबत बरं का ! कधी मित्र तर कधी सखा म्हणून, कधी हितचिंतक तर कधी शुभचिंतक म्हणून. पण असतात अशी माणसं आपल्या आजूबाजूला जी आपल्याला प्रेरणा देतात. काही माणसं तर आपल्या दृष्टीने नसतातच जणू. आपण त्यांना खिजगणतीत देखील धरत नाही. पण ही माणसं त्या वेळी अगदी चमत्कार व्हावा तशी आपल्यासाठी धावत येतात. हा आपल्यात असलेला चांगुलपणा असतो. जो इतरांना देखील चांगलं वागायला भाग पडतॊ. त्यामुळे आपल्यामधला चांगुलपणा जपत आपण इतरांमधला चांगुलपणा ही फक्त उघड्या डोळ्यांनी
पाहायला हवा.

कदाचित आपण डोळसपणे पाहिलं तर लक्षात येईल की ही माणसंच आपल्यासाठी ‘ तो ‘ देवरूपी माणूस आहेत.
शोधाल ना मग तुमचा ‘ तो ‘ देवरूपी माणूस? शोधा नक्की… सापडेल।

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये