भूलोकीचा शिवगंधर्व

शिव-हरी आले. अनेक बहारदार गाणी त्यांनी केली. देखा एक ख्वाबमध्ये शूटिंग हॉलंड, अॅमस्टरडॅममधील जगातील सर्वात सुंदर अशा बागेत झाले आहे. रेखा आणि अमिताभ बहरात होते, पण काही झाले तरी ती चालच आपल्या जेहेनमध्ये फिट अशी बसली आहे. त्यातील रबाबचा वापर अतिशय सुखद धक्का आहे.
१० मे २०२२, टळटळीत ऊन आणि भरदुपारी आपापल्या कामात वेल्डर्स आणि गवंडी मग्न होते. सूचनांबरहुकूम काम चालू आहे, अशी खात्री झाली, म्हणून मी एक साईटवरची पाठमोडकी खुर्ची ओढली आणि तशरीफ ठेवली. शंभरेक व्हॉट्स अॅप unread पडले होते. त्यात फार काही ठळक नव्हते. फोन बंद करूया म्हणेपर्यंत मोबाइलमधून पाण्याच्या पडणार्या थेंबाचा आवाज आला. बुळुक…wapp चा टोन… म्हटले आता कोण बाबा… तेवढ्यात तेजस बुरसेचा अजून एक मेसेज आला. शिवकुमार गेले. बुळूक… दुसरा थेंब पडला… मग खात्री झाली… मोबाईल ओला होतो की काय इतके थेंब धडाधड मोबाइलमध्ये पडले. बातमी तीच… शिवजी गेले… लोकांचे अफाट प्रेम लाभलेला सर्वोच्च कोटीचा कलाकार आपल्यातून देवाकडे गेला.
लताबाई देवासमोर गात असतील, मध्येच म्हणाल्या असतील इथे फिलर म्हणून संतूर हवी देवा… त्याशिवाय माझे गाणे अपूर्ण राहील. देवाने ऐकले यमाचा रेडा शिवजींच्या किडनीतून हृदयाकडे रेसच्या घोड्यासारख्या वेगाने आला आणि सौदामिनीच्या वेगाने गेलासुद्धा! कल्लोळरुपी तेज आसमंतात नाहीसे होते ना तिचे, तसेच झाले आहे आज. धक्के दे रे देवा पण किती आणि सतत नको रे. मूलतः पृथ्वीवरच्या स्वर्गलोकीच्या जम्मू भागात शिवकुमार सांगीतिक कुटुंबात जन्माला आले. तेही अलौकिक दैवी देणगी घेऊन. बनारस घराण्याचे प्रसिद्ध गायक पंडित उमादत्त शर्मा यांच्या पोटी त्यांनी कश्यपऋषींच्या दैवी भूमीत जम्मू-काश्मीरमध्ये जन्म घ्यावा, हे सर्व जणू देवानेच घडवून आणले होते.
अवघ्या पाचव्या वर्षी गायन व तबला दोन्हींची विधिवत तालीम वडिलांकडे त्यांची सुरू झाली. पण कालौघात एकदा वडील मूळ काश्मिरी असलेले संतूर, जे स्टँडवर ठेवून वाजवले जायचे ते घेऊन आले आणि म्हणाले, हे वाद्य तू शिक, मी सांगतो तुला कसे वाजवायचे ते. शिवजी दचकले, आकाशवाणीवर एव्हाना उच्च श्रेणी मिळवलेली असल्याने तबला आणि गायन ह्यातच पुढे जायचे त्यांनी ठरवले होते, पण वडिलांची ख्वाहिश त्यांनी ऐतराम केली. अखंड रियाझ केला आणि वयाच्या विशीतच गज, मिजराब, प्लेक्ट्रम काहीच सारंगी, सरोद, सतार या तंतुवाद्यासारखी साधने नाहीत, पण अक्रोडच्या झाडाची दोन काडीवजा “कलम” दोन्ही हाती घेतले, ते शेवटच्या श्वासापर्यंत.
संतूरमध्ये मिंड डेव्हलप केली आणि ती शततंत्री वीणा त्यांच्या शरीराचा एक अविभाज्य अंग झाली. कारण त्यात अनेक इंजिनिअरिंग बाजू त्यांनी अभ्यासून बदल केले होते. स्टँडवरची संतूर मांडीवर आली. ती त्या अफलातून तांत्रिक बदलांमुळे. ऐन कोवळ्या वयातील एका शास्त्रीय मैफलीत त्यांना संतूर वाजवताना ऐकून उस्ताद बडे गुलामअली खाँसाहेब, थिरकवा खाँसाहेब, आमिरखाँसाहेब आदी बरेच दिग्गज कलावंत अवाक् झाले होते… संतूरचा लोकसंगीताकडून शास्त्रीय संगीताकडे होणारा प्रवास पाहून…
१९५५ मध्ये झनक झनक पायल बाजेनामक सिनेमात बॅकग्राऊंड स्कोअरमध्ये पंडित शिवकुमार शर्मा यांनी प्रथम संगीतकार वसंत देसाई यांच्या विनंतीखातर संतूरचे काही मधुर पिसेस वाजवले आणि फिल्मी जगात खळबळ उडाली. नवे शहर मुंबई फारसे रुचले नाही. पुन्हा त्यांनी काश्मीर गाठले. पण वडील म्हणाले, हे ५०० रुपये घे, संतूर घे आणि पुन्हा मुंबई गाठ त्यातच तुझे भले आहे. सूर, ताल, लय तिन्ही गोष्टींची साथ “अमूल्य” होती, हजारो, लाखो रुपये असल्यासारखे आणि ते पुन्हा मुंबईत आले. विशेष कला प्रभुत्व आणि वेगळे वाद्य यामुळे त्यांना थोडे थोडे कामही मिळत गेले. तरुण बासरीवादक “हरी”प्रसाद चौरसिया त्याच काळात स्ट्रगल करीत होता.
त्याच्याशी मैत्र जुळले ते कायमचेच… Call of the valley हा अल्बम त्यांच्या कलाप्रवासातील एक महत्त्वाचा मैलाचा टप्पा. अनेक संगीतकारांकडे त्यांनी आपल्या कलेची जादू दाखवली आणि ती शेकडो गाणी अमर झाली. त्यांची गाण्यातली सजावट असो किंवा बॅकग्राउंड स्कोअरमधील वातावरणनिर्मिती असो, दोन्ही बेस्टच असायचे. यशराज फिल्म्सवाल्यांना सिलसिला सिनेमासाठी त्यांची जोडी सुचली आणि आम्हा रसिकांचे नशीब फळफळले ! वेगळ्या चाली व वेगळे विचार घेऊन शिव-हरी आले. अनेक बहारदार गाणी त्यांनी केली. देखा एक ख्वाबमध्ये शूटिंग हॉलंड, अॅमस्टरडॅममधील जगातील सर्वात सुंदर अशा बागेत झाले आहे. रेखा आणि अमिताभ बहरात होते, पण काही झाले तरी ती चालच आपल्या जेहेनमध्ये फिट अशी बसली आहे. त्यातील रबाबचा वापर अतिशय सुखद धक्का आहे.
पहाडी रागावर विशेष प्रेम करणारे हे दोघे विद्वानोत्तम कलाकार. पण फार काळ चित्रपटक्षेत्रात संगीतकार म्हणून रमले नाहीत. लम्हे, फासले, चाँदनी, डर असा प्रवास करीत त्यांनी संगीतकार म्हणून होणारी घुसमट थांबवली. मराठीतील साठच्या दशकातील अनेक गाणी त्यांच्या सुरांनी सजली आहेत. खळेकाका, हृदयनाथजी अशा अनेक दिग्गजांनी शिवकुमार यांना न्योता दिला आणि काय गाणी खुलली आहेत ती… अहाहा… श्रावणात घननिळा ऐकले की कान तृप्त होतात… खय्यामसाहेब एक ऐतिहासिक चित्रपट करीत होते तेव्हा पर्शियन संतूर त्यांनी वापरली आहे… ऐ दिले नादान…मध्ये…!
रूपक तालाच्या सात मात्रांमध्ये खेळत अनेक सम-विषम तालांची लयकारी करीत सम गाठण्याची त्यांची अद्भुत कला मला आयडियलच्या मैदानावर अनुभवता आली, हे माझे परमभाग्य होते. भारतीय शास्त्रीय संगीत आणि संतूर जगाच्या कानाकोपर्यात पोहोचवली ती त्यांनीच. लोकाभिमुख वादन करण्याची अद्भुत शैली त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करती झाली. पं. उल्हास बापट , राहुल शर्मा, पं. सतीश व्यास अशी अनेक उत्तम शिष्यपरंपरा घडवणारेसुद्धा तेच गुरू… थोर संगीतसूर्य. मनाला चटका लावणारी त्यांची एक्झीट आपण सर्वांनी देवावर रुसावे, अशीच फिलिंग देणारी ठरली. ते नसले तरी त्यांची संतूररुपी कला घेऊन पुढे कित्येक पिढ्या उत्तम आयुष्य जगेल, याची खात्री वाटते. आता इंद्रदरबार सुखावला असेल ते अजून एकाच्या येण्याने… शंभर तारा असलेले दुर्मिळ वाद्य तोही ऐकेल आणि म्हणेल, यार तूने तो कमाल किया, क्या साज छेडा है… मजा आ गया…
शैलेश बुरसे