अग्रलेखताज्या बातम्यादेश - विदेशसंपादकीय

आ चंद्र सूर्य नांदो

काल आपण स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापनदिन साजरा केला. यानिमित्त गेल्या ७६ वर्षांच्या कालखंडाचे सिंहावलोकन करणे गरजेचे आहे. केवळ घोषणाबाजी न करता आरोग्य, संरक्षण, न्यायव्यवस्था यासारख्या बाबींबरोबरच दर्जेदार, सर्वत्र समान आणि परवडणारे शिक्षण सगळ्यांना मिळेल तरच देशाचे स्वातंत्र्य चंद्र-सूर्य असेपर्यंत नक्कीच अबाधित राहील.

अवघा देश, प्रत्येक भारतीय हा स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापनदिन साजरा करीत आहे. आमच्या तमाम वाचक, हितचिंतकांना स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनाच्या मनापासून शुभेच्छा. स्वातंत्र्य प्राप्त होऊन ७६ वर्षे पूर्ण झाली. गेल्यावर्षीपासून आपण सगळे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहोत. देशाच्या स्वातंत्र्याचा, सार्वभौमत्वाचा अनन्यसाधारण अमूल्य ठेवा आपल्याला अनेक ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी सोपवला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातल्या सर्व घटकांना सोबत घेऊन स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतवले. स्वराज्याची, त्याचबरोबर स्वराज्याच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या पायाची पहिली वीटही केवळ त्यांनी ठेवली नाही तर आपल्या कृतीने अधिक समृद्ध केली. हा वारसा पुढे पिढ्यानपिढ्या येत राहिला. स्वराज्य, स्वातंत्र्य, सुराज्य या संकल्पना समता, बंधुतेच्या मजबूत अस्तरांनी स्वातंत्र्याला जोडल्या गेल्यात. थोडक्यात या त्रिवेणी संगमातून सुराज्य निर्माण व्हावे अशी छत्रपती शिवाजी महाराजांपासून स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणाऱ्या प्रत्येकाची इच्छा होती. स्वातंत्र्य, समता, बंधुतेच्या तत्त्वांसाठी लोकशाही मूल्याधिष्ठित मार्गावरून वाटचाल करण्याचे ठरवण्यात आले. आज आपली त्याच मार्गावरून वाटचाल होताना दिसत आहे.

देशाच्या इतिहासाच्या कालखंडात ७५ वर्षांचा कालावधी फार मोठा नाही. हजारो वर्षांचा इतिहास विचारात घेताना स्वातंत्र्यानंतरची ७५ वर्षे मात्र नक्कीच विचारात घ्यावी लागतील. आज स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनानिमित्त आपल्याला आपल्या देदीप्यमान ७५ वर्षांच्या इतिहासाचे सिंहावलोकन नक्कीच करायला पाहिजे. चुका दुरुस्त केल्या पाहिजेत. खरेतर, इतिहास आपली पुनरावृत्ती नक्कीच करीत असतो असे म्हणतात. त्याचबरोबर, इतिहासातून भविष्यात पुन्हा त्याच चुका घडू नयेत यासाठी त्याचा अभ्यास करायचा असतो, असेही सांगितले जाते. त्यानिमित्ताने आपण आपल्या प्रभावित क्षेत्रांचा अभ्यास करीत असतोच.

त्याचबरोबर जिथे यश मिळाले नाही, कमी मिळाले आहे, त्याचाही अभ्यास करणे व त्यावर उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. देशाने अनेक क्षेत्रांत प्रगती केली आहे. तंत्रज्ञान, औषधे, संरक्षण क्षेत्रातली यंत्रसामग्री, आकाश संशोधन, महामार्ग विकास, हवाई वाहतूक क्षेत्र, सेवाक्षेत्र अशा ७५ वर्षांच्या तुलनेत नव्या क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे. जागतिक पातळीवर देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करण्याचे वचन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच लोकसभेत दिले. ते त्यांनी मनापासून पाळावे. सत्यात हे वचन उतरवावे. देश तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल म्हणतो याचा अर्थ, केवळ मोजके उद्योगपती जागतिक श्रीमंतीच्या पहिल्या रांगेत आणि मोठ्या प्रमाणात जनता दारिद्र्यरेषेच्या खाली असा विरोधाभास नसावा.

एकूण उत्पन्न वाढलेले दाखवले जाते. मात्र दरडोई उत्पन्न वास्तवात वाढते का हा गंभीर प्रश्न सोडवायला पाहिजे. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अतोनात प्रयत्न केले गेले पाहिजेत. केवळ श्रीमंतांसाठी सध्या शिक्षण उपलब्ध आहे. दर्जा, गुणवत्ता, संशोधन यावर प्रयत्नपूर्वक कष्ट घेतले पाहिजेत. यात एकजिनसीपणा व मोठ्या मानवी व आर्थिक खर्चाची अपेक्षा आहे. असाच मुद्दा लोकसंख्या आटोक्यात ठेवायचा आहे. भविष्यकाळात बुलेट ट्रेन धावतील, मात्र करोडो सर्वसामान्यांना परवडतील अशी वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध करणे आवश्यक आहे. श्रीमंतांकडे वाहतुकीचे पर्याय उपलब्ध असतात, मात्र मध्यमवर्गीय व गरिबांकडे ते उपलब्ध नाहीत. याचा विचार पंतप्रधानांनी करावा. गॅस परवडत नाही व रॉकेल मिळत नाही ही जमिनीवरची वस्तुस्थिती विचारात घ्यावी.

जी वस्तुस्थिती सर्वच क्षेत्रात थोड्याफार फरकाने समान आहे. आरोग्य व्यवस्था, न्यायव्यवस्था, संरक्षण, शिक्षण हे एकमेकांवर अवलंबून आहे. शिक्षणाचा पाया मजबूत करणे, सर्वत्र समान गुणवत्तेचे सगळ्यांना परवडेल असे शिक्षण उपलब्ध केले तर देश अजून प्रगती करेल. चांद्रयान मोहीम यशाच्या अगदी उंबरठ्यावर आहे. त्यात आपल्याला यश नक्कीच मिळणार आहे. चंद्रमोहीम यशस्वी करणारे आपण जगात चौथ्या क्रमांकाचा देश होणार आहोत. मात्र प्रामाणिकपणा, शिक्षण, आरोग्याचा पाया भक्कम ठेवला तर भारताचे स्वातंत्र्य आ चंद्र सूर्य नांदेल यात किंचितही शंका नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये