लेखसंडे फिचर

ती

केदार सादळे | kedarsadhale@gmail.com |

माणसाला कितीही अडचणी आल्या, दुःख झालं तरी त्यांनी त्या सगळ्यांना खंबीरपणे सामोरं जावं असं म्हणतात. पण सगळ्यांना ते जमतंच असं नाही. मीदेखील एका कलाकाराला भेटलो, जिच्या आयुष्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर तिने आपला जीवनसाथी गमावला, तरीदेखील ती डगमगली नाही. मोठं दुःख पचवून पुन्हा कामाला लागली. तिच्या घराचं काम करताना तिच्या व्यक्तिमत्त्वावरून खूप काही शिकलो, त्या काही अनुभवांची ही शिदोरी…

माणसाला कितीही अडचणी आल्या, दुःख झालं तरी त्यानी त्या सगळ्यांना खंबीरपणे सामोरं जावं असं म्हणतात. पण सगळ्यांना ते जमतंच असं नाही. मीदेखील एका कलाकाराला भेटलो, जिच्या आयुष्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर तिने आपला जीवनसाथी गमावला, तरीदेखील ती डगमगली नाही. मोठं दुःख पचवून पुन्हा कामाला लागली. तिच्या घराचं काम करताना तिच्या व्यक्तिमत्त्वावरून खूप काही शिकलो, त्या काही अनुभवांची ही शिदोरी.

ग्रॅन्टरोडच्या एका टुमदार वसाहतीत तिचं घर होतं. त्यादिवशी सुधीर भटांबरोबर तिच्या घरी गेलो, मला काही सांगितलं नाही की कोणाकडे जायचंय वगैरे, पण म्हणाले चल जरा जाऊन येऊ बाईक काढ तुझी. कारण त्यांच्या ऑफिसवरून तिचं घर जवळच होतं. आम्ही दुसऱ्या मजल्यावर तिच्या घराची बेल वाजवली, तिच्या आईने दार उघडलं. आमच्याकडे बघून एक छानशी स्माईल दिली आणि आम्हाला आत बसायला सांगून किचनकडे गेल्या. जाता जाता तिच्या रूममध्ये तिला हाक मारून “सुधीर आलाय गं” असं सांगितलं. तिचं नाव ऐकलं आणि माझे डोळे चमकले.

माझी अत्यंत लाडकी अभिनेत्री जिने रंगभूमीवर आपल्या दमदार अभिनयाने आपली छाप पाडली, पुढे चित्रपटसृष्टीतदेखील स्मिता पाटील, शबाना आझमी ह्यांच्यासारख्या मातब्बर अभिनेत्रींच्या तोडीस तोड काम केलं. ती नेहमीच एक उत्तम अभिनेत्री होती, कधीच स्टार बनली नाही आणि आज मी साक्षात्‌ तिला भेटणार होतो. ती आतून बाहेर आली आणि माझ्याकडे बघून हसून म्हणाली तू केदार ना ? सुधीर म्हणाला होता, “मी हो म्हटलं, भट तर नेहमीप्रमाणे तिला सांगायला लागले ए चल पटपट सांग तुला काय काय करायचंय हा मापं घेईल आणि ड्रॉईंग दाखवेल तुला, तीपण लगेच म्हणाली” काय रे सुधीर तुझी नेहमीची घाई, बस जरा आल्यासारखा, आई पोहे करतेय थांब” मग तिने मला काय काय काम करायचंय ते दाखवलं, त्यांना फक्त किचन आणि बाथरूम पूर्ण नवीन करायचे होते आणि पूर्ण घराचं फ्लोरिंग बदलायचं होतं, मी माप घेतलं, सुधीर भटांनी तिला साधारण बजेट सांगितलं, ती तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण ती म्हणाली, चालू कर रे तू काम, तेवढ्यात आई आतून पोहे घेऊन आल्या. तिने आईलादेखील सांगितलं, की मी हे हे करायला सांगतेय, आई काहीच म्हणाल्या नाहीत, होकार दिला, फक्त त्यांची एक महत्त्वाची मागणी होती ती म्हणजे, किचन काउंटरची, त्यांना नेहमीपेक्षा त्याची उंची जरा कमी हवी होती, कारण ती आणि तिची आई दोघींची उंची जरा बेताचीच होती.

आम्ही काम संपवून तिथून निघालो, पण सतत डोळ्यासमोर तिचीच छबी होती, तिचा तो प्रसन्न चेहरा, समोरच्याला अगदी कम्फर्टेबल करेल असं व्यक्तिमत्त्व, मी कोणी मोठी कलाकार आहे, असे काही भाव तिच्या चेहऱ्यावर नव्हते, खरंतर अंधेरीला तिचा खूप मोठा फ्लॅट होता, तिचा नवरादेखील हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये एक आघाडीचा अभिनेता होता, मात्र अचानक त्याचे निधन झाले आणि तेव्हापासून ती आईबरोबर तिच्या ग्रॅन्टरोडच्या घरी राहायला लागली. या वयात जोडीदार गमावण्याचे दुःख मोठं असतं, पण तिने ते पचवलं होतं, आलेल्या परिस्थितीला खंबीर सामोरी जाऊन ती पुन्हा जिद्दीने उभी राहिली होती. आम्ही टाईल्स सिलेक्शनला एकत्र गेलो, आमचा नेहमीचाच दुकानदार होता, तोदेखील एवढ्या मोठ्या कलाकाराला बघून खूश झाला होता, तिने सिलेक्शन केलं आणि आमची आवड बऱ्यापैकी जुळत होती, जाताना त्याला म्हणाली की नॉर्मल गिऱ्हाईकाला देता तेवढीच सूट द्या मला, मी ॲक्टर आहे म्हणून काहीही फेवर करू नका, ती म्हणालेली गोष्ट खूप मोठी होती, आजकाल लोक पानाच्या गाडीवरपण डिस्काउंट मागतात आणि चित्रपटसृष्टी तर ह्यासाठी प्रसिद्धच आहे. तिच्या घरी काम सुरू झाल्यावरदेखील तिने स्पष्ट सांगितलं की सोसायटीचे सर्व नियम पाळून काम करा, कलाकार आहे ह्याचा कुठेच फायदा घेतला नाही तिने.

एकदा दुपारी, मी सहज तिच्या कामावर चक्कर मारायला गेलो आणि आत बघतो तर काय ही सगळ्या कामगारांना जमवून, सुधीर भटांची, माझी, एवढंच काय आमचा एक नरसू म्हणून बिगारी आहे त्याची नक्कल करून दाखवत होती, ती एक महान कलाकार तर होतीच, पण एक अत्यंत उत्तम माणूस होती, ह्याचा प्रत्यय तिने वेळोवेळी दिला, तिचं काम झालं. आई आणि ती दोघी खूप खूश झाल्या, त्या कामाला काही वर्षं लोटली, अधूनमधून एखाद्या नाटकाला ती भेटायची, आवर्जून मला हाक मारून बोलवायची, गप्पा मारायची एक दिवस सकाळ सकाळ भटांचा फोन आला, मी अर्धवट झोपेतच होतो, समोरून ते रडत रडत म्हणाले, केदार “ती” गेली, पुण्यावरून येताना एक्स्प्रेस वेवर तिच्या गाडीचा अपघात झाला, ती जागीच गेली होती, दुपारी शिवाजी मंदिरला तिचं अंत्यदर्शन होतं, तिच्या अचेतन देहाकडे बघून अश्रू अनावर झाले, असं वाटत होतं की आता ती उठेल आणि परत आमच्या सगळ्यांच्या नकला करेल, पण ती काही उठली नाही. तिचा माझ्या मनातला वावर मात्र अजूनही तसाच आहे, सदैव उत्साही आणि चिरतरुण.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये