विटामिन बी ३ च्या कमतरतेमुळे होऊ शकतो अर्धशिशी आजार

आज व्यक्तीच्या आरोग्यावर अनेक आजारांनी आक्रमण केले आहे. त्यातून बाहेर पडायचे असेल तर योग्य आहार आणि आरोग्याची काळची घेणे खूप महत्त्वाचे आहे. अर्धशिशी आजार म्हणजे असू शकते विटामिन बी ३ ची कमतरता. जिभेवर थर साचणे, तोंड चरबट होणे, चिडचिड होणे, उदास वाटणे, त्वचाविकार होणे, जुलाब, विस्मरण, निद्रानाश, डोकेदुखी, अपचन, रक्तक्षय ही आहेत विटामिन बी ३ अभावाची लक्षणे.
प्रदीर्घ काळ अभाव असेल तर रक्तवाहिन्यांची दुर्बलता, मानसिक असंतुलन, हताश वाटणे, उदास वाटणे आणि भोवतालच्या, परिस्थितीची जाणीव नसणे अशी गंभीर लक्षणे दिसतात. विटामिन बी ३ आपल्या शरीरामध्ये खूप महत्त्वपूर्ण कार्य करत असते. जसे की, रक्तवाहिन्यांचे काम सुरळीत चालू ठेवणे, पचनसंस्थेचे आणि पोषणाचे काम योग्य पद्धतीने करणे, विशेषतः कार्बोदके आणि प्रथिने यांचे पचन नीट करणे, त्वचेखालच्या सूक्ष्म वाहिन्यांचा घेर मोठा करणे, त्यामुळे त्वचेला रक्तपुरवठा जास्त प्रमाणात होतो व निरोगी राहते, लैंगिक हार्मोन्सचा निर्मितीसाठी विटामिन बी ३ (नियासिनची )गरज असते. उदाहरणार्थ इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन टेस्टोस्टेरॉन, कोर्टीझोन, थायरोक्सिन, इन्शुलीन तयार करण्यासाठीसुद्धा विटामिन बी ३ ची गरज असते.
कशातून मिळते- भाज्यांपेक्षा मांस आणि मासे यामध्ये नियासिन जास्त प्रमाणात असते. गाईच्या दुधात भरपूर असते. तांदळाचा भरडा, तांदूळ, गहू, शेंगदाणे, सनफ्लॉवर बिया, बदाम आणि हिरव्या पालेभाज्या यामध्ये भरपूर प्रमाणात आढळते आणि धान्याचा कोंडा यामध्येदेखील आढळते. गव्हातील कोंडा आपण फेकून देतो त्यासोबत नियासिनसुद्धा फेकली जाते आपण हे लक्षात घेतले पाहिजे.
हृदयविकार, मेंदूमधील रक्तवाहिनी फुटून रक्तस्राव होणे तसेच अशा रोगांमध्ये नियासिन देऊन रक्तामध्ये होणार्या गाठी कमी करता येतात हे शास्त्रज्ञांनी दाखवून दिले आहे. रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी नियासिन मुळे फायदा होतो. कुपोषणामुळे अनेक वेळा जुलाब होतात, तेव्हा योग्य प्रमाणात दिल्यास जुलाब थांबतात.
विटामिन बी ३ (नियासीन) युक्त आहार : गहू, ज्वारी, तांदूळ, पोहे, जव, नाचणी, बाजरी, मका, कडधान्ये, डाळी, बटाटे आणि अक्रोड, काजू, खोबरे, बदाम, मोहरी, सूर्यफूल बिया, शेंगदाणे भाजलेले, आंबा, पिकलेला खजूर, जर्दाळू, बेलफळ, सीताफळ, कोळंबी, दूध व दुग्धजन्य पदार्थ. यासारख्या पदार्थाचा आपल्या आहारात समावेश असणे आवश्यक आहे.