‘पत्रकारांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे’
पिंपरी : महाराष्ट्रातील पत्रकारांच्या उन्नतीसाठी राज्य सरकारने कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे, असे आवाहन राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भोसले यांनी केले. पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका पत्रकार कक्षामध्ये दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे मुख्य सल्लागार व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अॅड. संजय माने, पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, अध्यक्ष दादाराव आढाव, वरिष्ठ उपाध्यक्ष संतलाल यादव, सरचिटणीस सुनील कांबळे, पत्रकार सायली कुलकर्णी इत्यादी मान्यवर व अनेक पत्रकार मंडळी उपस्थित होते.
यशवंत भोसले म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात विविध क्षेत्रातील घटकांसाठी राज्य सरकारच्या वतीने महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. ज्याद्वारे त्या समाजातील लोकांना न्याय मिळत आहे. पत्रकार हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. समाजातील शोषित, वंचित, पीडित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार सातत्याने त्यांच्या लेखणीतून ही बाब प्रशासन व सरकारपर्यंत पोहोचवण्याचे महत्वाचे काम करतात. अनेक पत्रकार मानधनावर आणि कंत्राटी पद्धतीने काम करतात. त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. संघटित आणि असंघटित पत्रकारांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्याद्वारे पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हिताच्या विविध योजना राबवाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडे प्रस्तावाव्दारे अखिल मराठी पत्रकार संस्था व राष्ट्रीय कामगार आघाडीच्या वतीने लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगून ते म्हणाले की, पत्रकारांच्या कुटुंबीयांना शासकीय व खासगी रुग्णालयात मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशीही मागणी करणार असल्याचे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष व नॅशनल फ्रंट ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे (एनफिटू) वरिष्ठ उपाध्यक्ष यशवंत भोसले यांनी केली आहे.
पत्रकार संघातर्फे आयोजित ‘‘दिवाळी फराळ’’ कार्यक्रमासाठी महापालिकेचे साफसफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षक, शिपाई,आणि लिफ्टमन इत्यादींना निमंत्रित करण्यात आले होते. पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महेश मंगवडे, संजय बोरा, चिटणीस श्रद्धा कोतावडेकर कोषाध्यक्ष जितेंद्र गवळी, सदस्य विनय लोंढे, संतोष जराड, गणेश शिंदे, कलिंदर शेख, अमोल डंबाळे, प्रितम शहा, नंदू रानडे, मुकुंद कदम, विश्वास शिंदे आदी पत्रकार यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष दादाराव आढाव यांनी केले तर आभार सायली कुलकर्णी यांनी मानले.