झोळंबीचा बहार फुलांचा…
![झोळंबीचा बहार फुलांचा... zolambi](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/07/zolambi--780x470.jpg)
दृष्टीक्षेप | श्रीनिवास वारुंजीकर |
निसर्गानं मुक्त हस्तानं केलेली रंगीबेरंगी फुलांची उधळण पाहण्यासाठी कास पठाराच्या झुंबड गर्दीत घुसण्याची आता गरज नाही. कारण चांदोलीच्या राष्ट्रीय अभयारण्यातील झोळंबीच्या पठारावरचा कास पठाराच्या तोडीचा पुष्पवर्षाव पर्यटकांसाठी खुला होणार आहे.
झोळंबी इथल्या हिरव्यागार गालिच्यावर असंख्य रंगांची उधळण करणारी शेकडो प्रकारची रानफुले ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये डोलू लागतात. तो फुलोत्सव पाहण्यासाठी या वर्षीपासून पर्यटकांना अभयारण्यात प्रवेश दिला जाणार आहे. त्यानिमित्ताने भर पावसाळ्यात पहिल्यांदाच चांदोली अभयारण्य खुले होणार आहे. चांदोली राष्ट्रीय अभयारण्यात धरणापासून साधारण वीस किलोमीटर आतमध्ये झोळंबीचे पठार आहे.
गेल्या काही वर्षांत या पठारावर फुलांचे ताटवे फुलायला लागले आहेत. त्यात पांढरी, लाल, निळी, जांभळी, पिवळी अबोली; सीतेची आसवे, लाल तेरडा, पांढरा झेंडू, निचुर्डी, अबोलीमा, दीपकांडी, चवर, गौरी, रानहळद, आभाळी, नभाळी, सापकांदा, शेषगिरी अशा साठहून अधिक जातींची फुले सह्याद्रीच्या कुशीतून आभाळाकडे डोकावू लागतात. चांदोलीची श्रीमंती वाढवणारे हे सौंदर्य आतापर्यंत जाणीवपूर्वक लपवून ठेवण्यात आले होते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे संरक्षणाच्या कारणास्तव तेथे सामान्य लोकांना प्रवेश बंदी होती.
वास्तविक, फुलांचा हंगाम ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत अधिक बहरतो. या काळात चांदोलीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. रस्ते निसरडे झालेले असतात. त्यामुळे पर्यटनासाठी झोळंबी पठार खुले करावे, याबाबत विचार झाला नव्हता. त्यावर यंदा पहिल्यांदा विचार झाला. या काळात कास पठाराचा मोठा गवगवा झाला. पर्यटकांचा तिकडे ओघ वाढला. या पार्श्वभूमीवर झोळंबीचे पठार खुले करण्याविषयी अधिकार्यांनी चर्चा घडवून आणली. नुकतीच नॅशनल टायगर कंझोरेशन कमिटीने या भागाला भेट दिली.
पठारापर्यंतचा कच्चा, निसरडा रस्ताही दुरुस्त केला जात आहे. पाऊस कमी असेल तर पठाराच्या जवळपर्यंत चारचाकी वाहने जाऊ शकतील; अन्यथा पर्यटकांना काही अंतर पायी चालून जावे लागेल. त्याचवेळी कोल्हापूर जिल्ह्यातून निवळ्यापर्यंत म्हणजे जंगलात दहा किलोमीटर आतपर्यंत पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. या मार्गावर पर्यटकांना गवे, डुक्कर, भेकर, सांबरासह काहीवेळा बिबट्यांचेही दर्शन होऊ शकते.
असंख्य कीटक आणि सप्टेंबरच्या अखेरीस फुलपाखरे पाहता येणार आहेत. या पठारावर किंवा जवळपास मनुष्यवस्ती नाही. त्यामुळे तेथे राहण्याची, जेवणाची सोय असणार नाही. ती मणदूरला गारमेंटरीच्या दहा खाटांच्या रेस्ट हाऊसमध्ये होऊ शकेल. पेठनाक्यावर पाटबंधारे विभागाचे विश्रामगृह आहे; शिवाय खासगी ठिकाणी पर्यटक उतरू शकतील. पर्यटकांचा ओघ कसा राहतो, यावर अन्य सुविधांचा विचार केला जाईल. तूर्त एक दिवसाची रमणीय सहल आणि निसर्गाची रंगीबेरंगी उधळण पाहण्याची संधी मिळणार आहे.