लेख

यज्ञ-धार्मिक अंधश्रद्धा; पुरोहितांची लूटमार की प्रगत तंत्रज्ञान?

गेल्या लेखात आपण यज्ञासंबंधी तांत्रिक माहिती घेतली आणि यज्ञासंबंधीचे पहिले वैज्ञानिक परीक्षण डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनात भोपाळ येथे करण्यात आले, त्याची थोडक्यात माहिती घेतली. या लेखात सोमयाग या एका महत्त्वाच्या यज्ञाविषयी माहिती घेऊ. तत्पूर्वी, कृत्रिमरीतीने पाऊस पाडण्यासाठी आतापर्यंत झालेल्या वैज्ञानिक प्रयोगांविषयी थोडी माहिती घेऊ. कृत्रिम पावसाचे प्रयोग करण्यासाठी त्या परिसरात ७०% आर्द्रता असणे आवश्यक असते. अशा वेळी ढगांची निवड करून त्यांच्यावर मीठ किंवा सोडियम आयोडाईडच्या द्रावणाचा विमानातून फवारा मारला जातो. यामुळे या मिठाच्या कणांभोवती बाष्प जमा होऊन मोठे थेंब तयार होतात आणि थोडासा का होईना, पाऊस पडतो.

पण जगभरात झालेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगांना आतापर्यंत फक्त ३०% यश लाभले आहे. सोडियम आयोडाईड हे एक विषारी रसायन असल्यामुळे पर्यावरणावर आणि माणूस, प्राणी आणि वनस्पती यांच्यावर घातक परिणाम होतो. या कारणासाठी ऑस्ट्रेलिया या देशाने कृत्रिम पावसाच्या प्रयोगांना कायद्याने बंदी घातली आहे. आपल्या देशात या शतकाच्या आरंभापासून या प्रयोगांना सुरुवात झाली आहे. कर्नाटकात २००३ मध्ये, आंध्र प्रदेशात २००४ मध्ये, महाराष्ट्रात २००३, २००४ आणि २००९ ते २०११ पर्यंत आणि परत २०१९ मध्ये कृत्रिम पावसाचे प्रयोग करण्यात आले. हे सर्व प्रयोग एका अमेरिकन कंपनीमार्फत आणि त्यांनी आयात केलेल्या एका खास विमानाद्वारे केले जातात. मात्र हे सर्व प्रयोग अयशस्वी ठरले, असे प्रा. किरणकुमार जोहिरे या निवृत्त हवामानशास्त्रज्ञाने म्हटले आहे.

तसेच अगदीच अगतिकता असेल, तरच या प्रयोगांचा विचार व्हावा, असं मत ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनीही व्यक्त केले आहे. तसेच सोलापूर तथा मराठवाडा हा प्रदेश पर्जन्यछायेचा म्हणून ओळखला जातो. तिथे या प्रयोगासाठी अनुकूल ढग मिळतील किंवा नाही हे सांगता येत नाही, असेही डॉ. चितळे यांनी स्पष्ट केले आहे. एका वृत्तानुसार कृत्रिम पावसाच्या प्रयोगांसाठी महाराष्ट्र सरकारने २०१९ मध्ये ३० कोटी रुपयांची तरतूद केली होती. प्रत्यक्षात किती खर्च झाला, हे माहीत नाही. पण यश बाकी फारसे मिळाले नाही. कृत्रिम पावसाचा प्रयोग हा एका दृष्टीने कृत्रिमरीत्या निसर्गचक्र बदलण्याचा प्रकार आहे आणि वातावरणावर एक प्रकारची जबरदस्ती केली जाते. हे तंत्रज्ञान सध्या तरी अतिशय खर्चिक असून यशाची खात्री नसलेले आहे.
या पार्श्वभूमीवर आता आपण वेदांमध्ये बहुचर्चित अशा सोमयागाची माहिती घेऊ. सोमयाग हा निसर्गचक्राची विस्कळीत झालेली स्थिती मूळ पदावर आणण्याचे तंत्रज्ञान आहे. मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गचक्र हे वर्षानुवर्षे बिघडत चाललेले आहे. त्याचे दुष्परिणाम आपल्याला देशाच्या काही भागात कधी अवर्षण, तर कधी अतिवृष्टी, तसेच अवकाळी वृष्टी अशा तर्‍हेने भोगावे लागत आहेत. यामुळे सततच प्राणहानी आणि वित्तहानीही होत असते. अशी परिस्थिती भारतात प्राचीन काळातही जेव्हा जेव्हा उद्भवली तेव्हा त्या काळातील राज्यकर्त्यांनी ठिकठिकाणी सोमयाग करून परिस्थिती मूळ पदावर आणण्याचे यशस्वी प्रयत्न केल्याच्या नोंदी आपल्याला वैदिक वाङ्मयात सापडतात. काही नोंदी अशा –

१. सर्व देवांनी प्रजापतीचे आसन स्थिर करण्यासाठी केलेला सोमयाग. (तैतरीय ब्राह्मण ग्रंथ ५.४.१२).
२. अंगिरस ऋषींनी दुष्काळावर मात करण्यासाठी श्रौतयज्ञ (सोमयाग) केला. ३. ऋषी नचिकेत यांच्या वडिलांनी विश्वजित यज्ञ (ज्यामध्ये सोमयागाचा अंतर्भाव असतो.) केला. (कंठोपनिषद) ४. बळीराजा, प्रभू श्रीराम, राजा हरिश्चंद्र, धर्मराजा यांनी हा यज्ञ केला. ५. अर्वाचीन काळात सम्राट पुष्यमित्र, सम्राट समुद्रगुप्त, कनौजचा राजा जयेंद्र यांनी अशा तर्‍हेने प्रजेच्या कल्याणासाठी यज्ञ केलेत.

सोमयागात केलेल्या कृतींमुळे निसर्गाच्या पंचमहाभूतांमध्ये (पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश) एक प्रकारचे संतुलन निर्माण होते, ज्यामुळे निसर्गचक्र सुरळीत चालू राहते, हे सोमयागामागचे वैज्ञानिक तत्त्व आहे. अर्थात, आधुनिक विज्ञानाच्या आधारे हे सिद्ध करणे आजतरी शक्य नाही. याचा अर्थ, तसे करता येणे अशक्य आहे हा नसून, तसा प्रयत्नच आतापर्यंत कोणी केला नाही हा आहे. कुठल्याही वैज्ञानिकदृष्ठ्या सिद्ध न झालेल्या घटनेचे वैज्ञानिक विश्लेषण करायचे झाल्यास प्रथम त्या घटनेची पुनरावृत्ती शक्य आहे का, हे पाहिले पाहिजे. शक्य असल्यास ती घटना मूळ वर्णनाप्रमाणे करून बघितली पाहिजे. तसेच, वैज्ञानिक पद्धतीने तिची निरीक्षणे नोंदवून ठेवायला हवीत. तसेच पुन्हा पुन्हा त्या घटनेची प्रात्यक्षिके करायला हवीत आणि पुन्हा पुन्हा नोंदी करायला हवीत. इतके सर्व केल्यानंतर त्या घटनेमागे विज्ञान काय असेल, याचा विचार करावा लागेल. आपल्या देशात ह्या दृष्टीने यज्ञाचा अभ्यास वैज्ञानिकांना आजपर्यंत करावासा वाटला नाही. यापेक्षा यशाची खात्री नसलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगावर कोट्यवधी पैसे दरवर्षी खर्च करणे, हे त्यांना आणि सरकारलाही योग्य वाटते.

समाजातील बुद्धिवादी आणि पुरोगामी गटाने यज्ञ ह्या धर्म, जातीयता आणि वैज्ञानिकांची उदासीनता यांमध्ये अडकून विवादास्पद झालेल्या विषयाकडे पाठ फिरविली असली तरी धार्मिक क्षेत्रात आजही सगळ्या देशात मोठ्या प्रमाणात छोटे आणि मोठेही यज्ञ केले जात आहेत. पण वैज्ञानिक संशोधनाअभावी त्यातील सत्य डोळ्यासमोर येत नाही. असे असले तरी काही मंडळी ही वैयक्तिक आणि संस्थांच्या माध्यमातून त्यांच्या क्षमतेनुसार या क्षेत्रात संशोधनाचे महत्त्वाचे काम करीत असतात आणि संपूर्ण देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये असे प्रयोग होत असतात. यापैकीच एक आदरणीय नाव म्हणजे, ज्यांचे अलिकडे दोन-तीन वर्षांपूर्वी निधन झाले, ते बार्शीचे नानाजी काळे.

शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेले ते नावाजलेले याज्ञिक होते. त्यांच्या परीने यज्ञाचे वैज्ञानिक परीक्षण करण्यासाठी त्यांनी बार्शीला “श्रीयोगिराज वेद विज्ञान आश्रम”ची स्थापना केली. १९८१ ते २००३ या काळात त्यांनी १९ मोठे, ११ नित्य आणि २५ नैमित्तिक पर्जन्ययागांचे आयोजन केले आणि हे यज्ञकर्म देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आयोजिले होते. या यागांना अनुसरून पावसाच्या नोंदीही केल्या. या अनुभवांवर आधारित एक प्रबंधही त्यांनी तयार केला. हा प्रबंध विज्ञानविषयक कोठल्याही नियतकालिकाने स्वीकारला नसता, हे माहीत असल्याने, २००४ मध्ये बंगलोरला झालेल्या वैदिक विज्ञानावरील एका संमेलनात त्यांनी हा प्रबंध सादर केला. नानाजींच्या म्हणण्यानुसार त्यांना या प्रयोगांमध्ये सुमारे ८०% यश मिळाले. यानंतरही त्यांनी २००४ आणि २००५ मध्ये १३ आणि १४ पर्जन्ययाग देशाच्या विविध भागांत आयोजिले. या सर्व कार्यासाठी विविध ठिकाणच्या अनेक धार्मिक वृत्तीच्या धनिकांनी त्यांना अर्थसहाय्य केले. या सर्व यागांच्या आणि पर्जन्यातील बदलांच्या त्यांनी व्यवस्थित नोंदी ठेवल्या आहेत.

श्री. नानाजी काळे यांची कीर्ती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. शिवराजसिंह चौहान यांच्यापर्यंत पोहोचली आणि फेब्रुवारी, २००८ मध्ये मुख्यमंत्र्यांनी नानाजींना भोपाळला येण्याचे निमंत्रण दिले. कारण त्यावेळी मप्र.मध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. विशेषत: बुंदेलखंडातील तीन जिल्हे तीन वर्षांपासून अवर्षणग्रस्त झाले होते. याचवेळी नानाजींच्या पाहण्यात एक प्रबंध आला. हा प्रबंध १९५६ मध्ये पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी जेव्हा मप्र.मधील पंचमढीला भेट दिली होती, त्यावेळी श्री. पालीवाल नावाच्या माध्यमिक शाळेतील एका शिक्षकाने राष्ट्रपतींकडे सोपविला होता. या प्रबंधानुसार, भारतातील बारा ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी सोमयागाच्या माध्यमातून आशिया खंडातील मोसमी पर्जन्यचक्राला उत्तेजित (अ‍ॅक्टिवेट) करता येते आणि त्याचा प्रभाव हा संपूर्ण भारतवर्ष, दक्षिण आशिया, आग्नेय आशिया, तसेच पूर्व आफ्रिका आणि वेस्ट इंडिज येथपर्यंत जाणवतो. याप्रमाणे २००८, २००९ आणि २०१० या तीन वर्षांमध्ये बारा ज्योतिर्लिंग स्थाने धरून एकूण ३१ ठिकाणी सोमयागाचे आयोजन करण्यात आले. यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी संकल्प सोडून यजमानपद स्वीकारले होते. मप्र. सरकारच्या हवामानखात्याने या तिन्ही वर्षातील सगळ्या जिल्ह्यातील पर्जन्याच्या नोंदी ठेवल्या. सगळे निष्कर्ष इथे देणे शक्य नाही. तरीसुद्धा इतके निश्चित सांगता येईल, की अवर्षणग्रस्त जिल्ह्यांतील पर्जन्य प्रमाणात समाधानकारक सुधारणा झाली आणि त्यानंतरही संपूर्ण मप्र.मध्ये अवर्षणाचे प्रमाणातही सकारात्मक सुधारणा झाली.

अर्थात, कोणीही वैज्ञानिक या निष्कर्षावर लगेच विश्वास ठेवणार नाही आणि तसा तो ठेवूही नये. पण इतके निश्चितपणे सांगता येईल, की या अनोख्या संशोधनाची ही पहिली यशस्वी पायरी होती. नानाजींचे देहावसान झाले असले तरी त्यांच्या सहकार्‍यांनी हे संशोधनकार्य पुढे चालू ठेवले आहे. आता तर डॉ. विद्याधर वैद्य या गुजरातमधील आनंद युनिव्हर्सिटीमध्ये अ‍ॅग्रोमिटीरिऑलॉजी विभागात प्राध्यापक असणार्‍या आणि याच विषयात नुकतीच डॉक्टरेट मिळविलेल्या संशोधक प्राध्यापकाची साथ त्यांना मिळाली आहे. शेवटी, महाराष्ट्र सरकारने कोट्यवधी रुपये कृत्रिम पावसाच्या प्रयोगावर खर्च करीत असताना अत्यंत अल्प खर्चाच्या या प्रयोगांनाही प्रोत्साहन दिले, तर विज्ञानाची एक नवीन शाखा स्थिर होईल आणि अल्पखर्चाचे एक नवीन स्वदेशी तंत्रज्ञान आपल्या
हाती येईल.
(क्रमशः)

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये