भाषणांचा अन्वयार्थ…
भाजप आणि काँग्रेस हेच दोन पक्ष कायम ठेवण्याच्या दृष्टीने जनतासुद्धा प्रयत्न करेल, असे सांगत होते. काँग्रेसची अवस्था कितीही हलाखीची असली तरी तो पक्ष जिवंत राहणार. भारतीय जनता पक्ष त्यांच्या ताकदीमुळे जिवंत राहणार आणि हे दोन पक्ष ज्यांच्या डोक्यावर हात ठेवतील तो प्रादेशिक पक्ष अस्तित्व टिकविणारा. आज राज ठाकरे आपल्या अस्तित्वासाठी भारतीय जनता पक्षासोबत आहेत. पूर्वी शरद पवार काँग्रेससोबत होते. हाच या भाषणांचा अन्वयार्थ आहे.
गुढीपाडव्याला शिवाजी पार्क येथून राज ठाकरे यांनी एकूणच आगामी सर्व निवडणुकांबाबत रणशिंग फुंकले होते. २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची ही पूर्वतयारी म्हणावी लागेल. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ही तयारी १० सभांपुरतीच मर्यादित ठेवली होती. राज ठाकरे यांनी प्रचाराच्यादरम्यान भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात १० सभा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सहकार्य होईल, अशी भूमिका घेतली होती. त्यांच्या सभेचे या दोन पक्षांना मतांमध्ये रूपांतर किती झाले, हा संशोधनाचा विषय आहे. परंतु २०१९ मध्ये आणि सध्या त्यांची जी भाषणे सुरू आहेत ती भाषणे समाजाच्या मनात जी खदखद आहे, ती व्यक्त करणारी असतात हे नक्की.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बोलणारे राज ठाकरे होते. त्यांनी त्यांच्या जाहीर सभांमधून नरेंद्र मोदींच्या धोरणावर आणि व्यक्तिमत्त्वावर थेट प्रहार केले होते. त्यानंतर ईडी प्रकरण, त्यानंतर त्यांनी माघार घेऊन आता भारतीय जनता पक्षाचे गुणगान करायला सुरुवात केली असली तरी, गेल्या निवडणुकीत देशात थेटपणे मोदीविरोध करणारे राज ठाकरे एकमेव नेते होते, हे मान्य करावेच लागेल. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, तसेच राष्ट्रवादीच्या बहुतेक सर्व नेत्यांवर कडाडून हल्ला करणारे आणि जनतेच्या मनात जे प्रश्न खदखदत आहेत, ते जाहीरपणे विचारणे पुन्हा एकदा राज ठाकरेच आहेत. राज ठाकरे यांना विधानसभेत जागा मिळत नसतील. महापालिका, नगरपालिका यांमध्ये त्यांचे अस्तित्व लक्षवेधी नाही.
त्यांच्याकडे समांतर दुसरी फळी नाही. सबकुछ राज ठाकरे एवढाच त्यांच्या पक्षाचा नेता आणि विचार आहे. असे असले तरी त्यांना गृहीत धरल्याशिवाय महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना बोलता येत नाही, हेही वास्तव आहे. सर्वसामान्य मतदारांचा बुद्धिभेद करण्याचे कौशल्य राज ठाकरे यांच्या भाषणांमध्ये आहे. ते रंजक करण्याकरिता ते नकलांचा वापर करतात. या नकला, या नकलांचा आस्वाद घेणारा त्यांचा विशिष्ट पाठीराखा वर्ग आहे. हा वर्ग गावागावात अल्प प्रमाणात का होईना आहे आणि ती त्यांची ताकदही आहे. त्यांच्या सभेला जमणारी मंडळी भले मनोरंजन म्हणून तिथे जात असतील, पण बाकी राजकीय नेत्यांच्या भाषणातून मनोरंजनसुद्धा होत नाही, हे दुर्दैव आहे. त्यांच्या भाषणावर दुसर्या दिवशी टीका करणारी मंडळी विधानसभा, लोकसभेमध्ये जनहिताची किती कामे करतात, यांचा लेखाजोखा मांडला तर आणि त्यांची राज्यातील, देशातील ताकद यांचा विचार केला तर, त्या तुलनेत राज ठाकरे काही नसताना निदान बरेच काही बोलतात, हे मान्य करावे लागेल.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे माझ्या हातात सत्ता द्या, बघा मी काय करतो असे म्हणाले आणि त्यांनी मनोहर जोशींसारखा संयमी, विवेकी माणूस मुख्यमंत्रिपदी नेमून काम करून दाखविले. मात्र राज ठाकरे यांच्या हातात नाशिकची महापालिका दिल्यावर जे अपेक्षित होते तेवढेही काम झाले नाही, अशी टीका त्यांच्यावर होते. एखाद्या महापालिकेच्या यशापयशावरून त्यांच्या कारकिर्दीचे मूल्यमापन होणार नाही. परंतु, राज ठाकरे यांनी सत्ता मिळविण्यापेक्षा विरोधकांची भूमिका बजावणेच सध्या तरी योग्य राहील. मुंबई महापालिकेतील कामकाजापासून केंद्र सरकारच्या कामापर्यंत सर्वच विषयांवर त्यांनी बोलले पाहिजे आणि त्यांच्या प्रश्नांना नेत्यांनी उत्तर दिले पाहिजे. राज्यातील सर्वसामान्य व्यक्तींच्या, मतदारांच्या प्रश्नांना शासन, प्रशासन जबाबदार आहे. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे अनिवार्य आहे. ही मंडळी जनतेचा संशय सोडविण्यासाठी इथे बसविली गेली आहेत.
साहजिकच कुठल्याही एका व्यक्तीच्या प्रश्न, शंका किंवा विचारांना उत्तर देणे हे क्रमप्राप्त असताना राज ठाकरे यांच्याही प्रश्नांना उत्तरे दिली गेली पाहिजेत. त्यांना राज ठाकरे यांच्या विचारांना हलक्यात घेऊन चेष्टा करणे आणि खिल्ली उडविणे याचा अर्थ ठाकरे यांनी केलेले आरोप आणि विचारलेले प्रश्न अत्यंत योग्य आहेत, असाच आहे. प्रश्नांना उत्तरे देता येत नाही, म्हणून सकाळी लवकर उठण्यापासून आजोबांची पुस्तके वाचण्याचा सल्ला देणे ही प्रश्नांना भिडण्यापासून निवडलेली पळवाट आहे. ज्येष्ठ नेत्यांकडून अशी पळवाट अपेक्षित नाही. राज ठकरे यांच्या निशाण्यावर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस दिसत आहे. त्याबरोबर शिवसेना यावर त्यांचे विशेष लक्ष आहे, याचा अर्थ दोन्ही प्रादेशिक पक्षांना अस्थिर करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
त्यांच्या अस्थिरतेतून मनसेला जागा मिळते का, हाही त्यांचा प्रयत्न असेल; मात्र यापूर्वी आम्ही अग्रलेखातून वारंवार सांगत होतो, त्याला राज ठाकरे यांच्या भाषणातून पुष्टी मिळते. आम्ही यापूर्वी भाजप आणि काँग्रेस हेच दोन पक्ष कायम ठेवण्याच्या दृष्टीने जनतासुद्धा प्रयत्न करेल, असे सांगत होती. काँग्रेसची अवस्था कितीही हलाखीची असली तरी तो पक्ष जिवंत राहणार, भारतीय जनता पक्ष त्यांच्या ताकदीमुळे जिवंत राहणार आणि हे दोन पक्ष ज्यांच्या डोक्यावर हात ठेवतील तो प्रादेशिक पक्ष अस्तित्व टिकविणारा. आज राज ठाकरे आपल्या अस्तित्वासाठी भारतीय जनता पक्षासोबत आहेत. पूर्वी शरद पवार काँग्रेससोबत होते. हाच या भाषणांचा अन्वयार्थ आहे.