अग्रलेख

विश्वाला भुरळ पाडणारा देशाचा अमृतमहोत्सव

आज भारताचा अमृतमहोत्सव संपन्न करीत असताना १५ ऑगस्ट या राष्ट्रीय सणाच्यानिमित्ताने आपण या स्वातंत्र्याला अभिवादन करूया…

विस्तीर्ण हिमालयाच्या कुशीत विस्तारलेला अरबी समुद्र, बंगालचा उपसागर यांच्या खारट जलाशयाने व्यापलेला, गंगा, यमुना, सरस्वतीच्या पवित्र जलाने न्हाऊन निघालेला, काश्मीरसारख्या नंदनवनाचे अस्तित्व असलेला, चंद्रगुप्त मौर्यपासून छत्रपती शिवाजीमहाराज यांनी महान पराक्रम गाजवलेला, संत सूरदास, संत कबीरदास, संत पुरंदरदास यांच्यापासून ते संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्‌गुरु तुकाराममहाराज, संतशिरोमणी नामदेवराय, शांतीब्रह्म एकनाथ महाराज या संतकुळीने पावन केलेला, घेवड्याच्या शेंगापासून ते केशराचे मळे फुलविणारा कृषिप्रधान असलेला, प्रत्येकाच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटलेला आणि तारुण्याच्या सळसळत्या रक्ताने न्हाऊन निघालेला, १३० कोटी जनतेचा, माझा, आपला आणि सर्वांचा भारत देश आज स्वातंत्र्याचा (७५ वा)अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. १५० वर्षांची जुलमी राजवट उलथवून टाकून ब्रिटिशांना हद्दपार करण्यासाठी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या प्रदेशातील हुतात्म्यांनी स्वातंत्र्ययुद्धाचे रणशिंग फुंकून आपले हौतात्म्य या देशाला समर्पण केले. त्यांच्याप्रति आज अंत:करणपूर्वक श्रद्धांजली अर्पण करणे, ही सर्वात पुण्यप्रद बाब या अमृतमहोत्सवी कालखंडात मानायला हवी.

ब्रिटिशांच्या जुलमी गोळ्यांनी ज्या भूमीला आपल्या रक्ताने अक्षरश: न्हाऊ घातले त्या रक्ताची प्रतिज्ञा आजही भारतवासीयांचा स्वाभिमान बनलेली आहे. स्वातंत्र्याच्या कालखंडात गेल्या ७५ वर्षांत प्रगतीच्या अनेक दिशा या देशातील राज्यकर्त्यांनी निर्माण केल्या. कधीकधी नैसर्गिक आपत्तींनी या देशातील जनतेला आणि राज्यकर्त्यांना संकटाला सामोरे जावे लागले. त्यावर मात करून आपल्या राष्ट्राची जनता पुन्हा ताठ मानेने उभा राहत गेली. वाहतुकीची साधने, अन्नधान्य उत्पादनाच्या शास्त्रीय, संयुक्तिक प्रक्रिया, सुईपासून ते विमान बनविण्यापर्यंतचे विविध प्रकारचे उद्योगधंदे या राष्ट्रात निर्माण झाले. नैसर्गिक हवामानावर आधारित विविध प्रकारचे प्रकल्प राबविण्यात आले. एकेकाळी नावेतून मालवाहतूक करणारा हा देश आज कित्येक टनाच्या मालाची वाहतूक यांत्रिक बोटीच्या सहाय्याने जगभर मालवाहतूक करीत आहे. शेतात झोपडी बांधणारा किंबहुना कुठे कुठे पत्र्याची घरे उभारणारा आज हिरव्यागार शेताच्या माळावर सिमेंट काँक्रिटच्या छत्राखाली आश्रय घेणारा शेतकरी पाहिला, की झालेल्या प्रगतीची लक्षणीय परिस्थिती समोर येताना दिसते. मोलमजुरीसाठी मैलोन्‌‍मैल शहराच्या दिशेने फाटक्या अंगवस्त्राने पाठीवर दोन भाकरी टाकून मिरचीच्या ठेच्याची साथ बरोबर घेऊन शहराकडे जाणारा मजूर आज सायकलवर, तर कधी कधी स्वत:च्या मोटारसायकलवर शहराकडे जात असताना दिसतो.

झाडाखाली भरणाऱ्या शाळा आज प्रचंड इमारतींच्या पवित्र वास्तूने दुमदुमून गेलेल्या आहेत. एखादे दुसरे उपचार केंद्र असलेल्या आपल्या देशात आज प्रत्येक खेडोपाडीसुद्धा रुग्णालयांची साथ ग्रामीण भागातील रुग्णांना मिळू लागलेली आहे. परदेशी वैद्यकीय किंवा तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी जाणारा स्नातक किंवा विद्यार्थी आज स्वाभिमानाने हजारोंच्या संख्येने उभारलेल्या महाविद्यालयांमध्ये आणि शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेताना जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्या प्रगतीची उंची किती विलक्षण वाढत गेली, याची जाणीव आपल्याला होते. चीनचा पहिला भारतात आलेला प्रवासी ह्यु एन संग याने भारताबाबतची भविष्याची केलेली कल्पना आज कृतीत उतरताना जेव्हा दिसते तेव्हा एकच जाणीव समोर येते आणि ती म्हणजे राष्ट्रप्रेम, जिद्द आणि निर्धार याचा त्रिवेणी संगम आमच्या जनतेच्या रक्तवाहिन्यांत झालेला दिसतो. प्रगतीच्या दिशा चौफेर उधळल्या आणि राष्ट्राची देदीप्यमान भरारी गतिमान होत गेली. या सगळ्या इतिहासाचे अवलोकन करताना गेल्या आठ वर्षांत भारताच्या एकूण सर्वांगीण प्रगतीने जी भरारी घेतली आहे, त्यामुळे भारताची प्रतिमा संपूर्ण जगात वेगळ्या पद्धतीने समोर आलेली आहे. ही प्रगती पाहून पिढीजात शत्रू असलेला पाकिस्तान आणि ज्यांच्यावर पाकिस्तानची मदार आहे तो उर्मट आणि साम्राज्यवादाला हपापलेला, युद्धाला आसुसलेला आणि कपटी बुद्धीने आक्रमक होणारी बुद्धी पाजळणारा चीनसारखा बलाढ्य देशसुद्धा थोडासा दचकून गेलेला दिसतो.

याला अनेक कारणे आहेत, याला अनेक प्रसंग आहेत, याला अनेक कल्पनांची जोड आहे आणि या सगळ्यापेक्षा या पाठीमागचा जो निर्धार आहे तो राष्ट्रप्रेमाचा आणि गेल्या आठ वर्षांत सुशासन नावाची जी यंत्रणा या राष्ट्रात राबवली जात आहे त्याचा आणि फक्त त्याचाच हा परिणाम आहे. इथे एक गोष्ट स्पष्टपणे नमूद करणे गरजेचे आहे, या सगळ्या प्रगतीपूर्वी या देशातील पहिल्या काँग्रेसच्या राज्यकर्त्यांपासून ते परवा-परवाच्या जनता दलाच्या व्ही. पी. सिंह यांच्या कारकिर्दीपर्यंत या देशाची काही प्रगतीच झाली नाही हे म्हणणे पूर्णपणे अन्यायाचे ठरेल. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची राष्ट्र संकल्पना, विकास संकल्पना कदाचित थोडी भिन्न असू शकेल, पण राष्ट्र प्रगतीच्या दृष्टीने नेण्यासाठी काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनीसुद्धा विकासाचा एक स्तंभ उभा केला हे नाकारता येणार नाही. आमच्या राष्ट्रीय भौगोलिक परिस्थितीचा विचार करून भाजप शासनाने विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी एक विकासाची गंगोत्री निर्माण केली त्या गंगोत्रीचा आज वैश्विक परिणाम या देशाच्या विकासाला जाणवू लागलेला आहे. राज्यकर्त्यांच्या मग ते कोणत्याही पक्षाचे असो, सत्तालालसा, भ्रष्टाचार आणि सत्तेचा उन्माद ही सूत्रे अंगी बाणलेलीच असतात. जगातील कुठलाही पक्ष याला अपवाद नाही. पण या सर्व गोष्टींपेक्षा राष्ट्रवैभव आणि समृद्धीची आस असणे हे राष्ट्राविषयी अत्यंत आवश्यक असते आणि हेच सूत्र २०१४ पासून भाजप शासनाने अंगीकारल्याने आज चौफेर प्रगतीचे अश्व उधळताना आपल्याला दिसतात.

हा सगळा प्रपंच मांडताना राज्यकर्ते म्हणून किंवा राज्यकर्ता पक्ष म्हणून कोणावरून पंचारती ओवाळायची, स्तुतिसुमने त्यांच्यावर गायची हा उद्देश मुळीच नाही. पण शुद्ध अंत:करणाने राष्ट्रभावनेची ज्योत घराघरांत प्रज्वलित करून सर्वसामान्य माणसापासून ते धनिकापर्यंत सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कौटुंबिक, औद्योगिक स्वास्थ्य लाभण्याच्या दृष्टीने जे प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुशासनाकडून होताना दिसतात. त्याबाबत कृतज्ञता म्हणून नव्हे, तर एक कर्तव्यभावनेने त्यांच्याविषयी सद्‌भावना व्यक्त करणे हाच यापाठीमागील उद्देश आहे. म्हणून श्री. मोदी युगद्रष्टा आणि धाडसी सुधारणावादाचे प्रणेते म्हणून त्यांचे नाव यापुढेही हिंदुस्थानच्या इतिहासात कोरले जाईल, हे मुळीच नाकारता येणार नाही. आज आपण आर्थिक वाटचालीची बारकाईने पाहणी केली तर २०१४ पासून गेल्या आठ वर्षांत भारतीय विकास योजनांवर सुमारे ९१ लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. २००४ ते २०१४ च्या कालखंडात ४९.२ लाख कोटी रुपये तत्कालीन शासनाने खर्च केले होते. हा फरक जर आपण जाणून घेतला तर प्रगतीतून विकासाचा मार्ग कसा प्रशस्त होत गेला, याची एक भारताचा नागरिक म्हणून आपल्याला कल्पना येईल.

भारत सरकारने प्रगतीच्या अनेक योजना कार्यान्वित करीत असताना ‘भारत जोडो’चा संदेश या सुधारणा सूत्रात गोवला आणि लोकशक्तीतून लोकसहभागाचा एक वेगळा परिणाम दिसून आला. २०१४ नंतर देशाच्या एकूण राजकीय पद्धतीत नव्हे, तर शासनपद्धतीतही अामूलाग्र परिवर्तन झाल्याचे आपल्याला दिसून येते. आज वैद्यकीय उपचार पद्धती ही सर्वसामान्य माणसांना न परवडणारी अशी आहे. त्यासाठी गरजूंना म्हणजे गरिबांना, विशिष्ट प्रकारच्या कार्डधारकांना विविध मोठ्या रुग्णालयांमधून विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी विशिष्ट प्रकारची सवलत दिली जाते. दिवसेंदिवस औषधांच्या किमतीतही प्रचंड प्रमाणात वाढ होत असताना भारतीय जनऔषधी प्रकल्प राबविण्याचा निर्धार केंद्र सरकारने घेतला, त्याचा प्रारंभ ऑक्टोबर २०१६ मध्ये करण्यात आला. यालाच जेनेरिक औषध पद्धती असे म्हटले जाते. जनऔषधी केंद्राचे जाळे देशभर पसरले असून आतापर्यंत १० हजार ५०० जनऔषधी केंद्रे खेडोपाड्यापर्यंत स्थापन करण्यात आलेली आहेत. मातृवंदन योजना २०१६ मध्ये सुरू करण्यात आली. १ जानेवारी २०१७ पासून देशातील सर्व जिल्ह्यांत ही योजना लागू करण्यात आली. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांचे बाळंतपण सुरक्षित होण्यासाठी, तसेच स्तनदा मातांना पोषण आहार देण्यासाठी रोख ५ हजार रुपयांची मदत दिली जाते. आमच्या पुराणकाळापासून योगशास्त्राला एक विशेष महत्त्व दिले गेले आहे. आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांच्या कधी ध्यानी-मनी नव्हते, की योगविद्या संस्कृती पुनर्स्थापित करण्याचे फार मोठे कार्य नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात पुढे आले. सुदृढ शरीर हा यापाठीमागचा मुख्य उद्देश समोर येत असताना दिसतो. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने संपूर्ण देशात नारीशक्तीसाठी विविध योजनांची निर्मिती केलेली आहे. सैन्यदलापासून ते वैमानिक होण्यापर्यंत स्त्रीकर्तृत्वाला एक वेगळा आयाम निर्माण झालेला दिसतो.

आपण देशाच्या परकीय गंगाजळीचा बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला असे दिसून येईल, नोव्हेंबर २०२१ पर्यंत चीन, जपान आणि स्वित्झर्लंड या देशांनंतर भारत हा जगातील सर्वात मोठा परकीय चलन भांडार असणारा चौथा देश मानला जातो. २०१९ मध्ये ४७७.८, २०२०-२१ मध्ये ५७७, २०२०-२२ (३१ डिसेंबर २०२१) मध्ये ६३३.६ हा आलेख सातत्याने वाढताना दिसतो. गेल्या काही वर्षांत विक्रमी निर्यातीचे आकडे समोर येत आहेत. ४१८ अब्ज अमेरिकन डॉलरहून अधिक निर्यात भारतातून करण्यात आली आली आहे. २०२१-२२ या वित्तीय वर्षात व्यापारी मालाच्या निर्यातीचा हा एक वर्षाचा विक्रम मानला जातो. मोबाईलनिर्मितीत जागतिक क्रमवारीत भारताचा दुसरा नंबर लागतो. स्टँडअप इंडियामुळे रोजगारनिर्मितीला जी एक वेगळी चालना मिळताना दिसत आहे, त्याचेही सकारात्मक परिणाम समोर येताना दिसतात. विरोधकांकडून याबाबत सरकारच्या संदर्भात टीका-टिप्पणी होत असली तरी स्टँडअपच्या प्रगतीचे वास्तव आपण नाकारू शकत नाही. अनेक स्थलांतरित उद्योजक कुटुंब संपूर्ण देशात आपले एक वेगळे स्थैर्य निर्माण करू शकतात, हे भारतातील अनेक कुटुंबांनी सार्थ करून दाखवले आहे.
एक साधे उदाहरण, १९६१ मध्ये राजस्थान येथील ब्यावर, जिल्हा अजमेर येथील एम. टी. गुप्ता यांचे कुटुंब पंढरपुरात व्यवसायासाठी दाखल झाले. अनेक प्रयत्नांनी त्यांनी हॉटेल व्यवसाय सुरू केला.

अनेक संस्थांशी त्यांचा सेवाभावी संबंध आला. गेल्या कित्येक वर्षांपासून पंढरपुरात स्थायिक झालेले हे कुटुंब आपल्या जीवनाचा आस्वाद घेताना आज दिसत आहे. देशाच्या अनेक भागांत अनेक राज्यांतून स्थलांतरित झालेल्या कुटुंबांना एक वेगळा व्यावसायिक मार्ग मिळाल्याने आणि शासनाने या कुटुंबांना सर्व प्रकारची व्यावसायिक मोकळीक दिल्याने त्यांच्या जीवनात आनंदाची पहाट निर्माण होत असताना दिसते. एकूण प्रगतीच्या कव्हेत संपूर्ण भारत येत असताना ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ हे सूत्र सरकारने अंगिकारलेले दिसते. हिंदुस्थानातील अलिकडच्या राज्यकर्त्यांनी वेगळा दृष्टिकोन समोर आणल्याचे दिसून येते. राष्ट्र ही संकल्पना दिखाव्यापुरती दाखवायची आणि स्वार्थाच्या अनेक खेळी खेळत सत्तेच्या मस्तीवर जगण्याचा प्रयत्न करायचा ही काही पक्षांची एक मिरासदारी होऊन बसली आहे. शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या भ्रष्टाचारावर चरणारी जनावरं मस्तवाल तर झालीच आहेत, त्यांचा हा मस्तवालपणा उखडून टाकण्याची भूमिका देशाचा राज्यकर्ता पक्ष म्हणून भाजपने स्वीकारल्याचे दिसते.

बाळासाहेब बडवे

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये