राजद्रोह म्हणजे काय रे भाऊ?
कायदेशीर मुद्दा हा न्यायालयासमोर येईलच; मात्र राणा दाम्पत्य आणि एल्गार परिषदेमधील वक्ते यांच्यामध्ये तुलना करता राणा दाम्पत्य हे परिषदेत भाषण केलेल्या वक्त्यांच्या भाषणापेक्षाही अधिक जहाल होते, हे किमान शरद पवार यांनी पटवून द्यावे. हा सगळा प्रकार पाहता राजद्रोह म्हणजे नक्की काय रे भाऊ, असा प्रश्न करीत राजद्रोहाची व्याख्या पुन्हा एकदा समजून घ्यावी लागेल.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्धार खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार राणा दाम्पत्य अमरावतीवरून मुंबईस आले आणि खार येथील त्यांच्या निवासस्थानी थांबले होते. मात्र पोलिसांनी या दाम्पत्याला अटक केली आणि त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. मुंबईचे पोलिस स्कॉटलंड यार्ड येथील पोलिसांनंतर क्रमांक दोनचे पोलिस दल आहे. केवळ गुन्हेगार शोधणे एवढेच नव्हे, तर गुन्हेगारीविषयक नियम, कायदे यांचा सखोल अभ्यास असणारे हे खाते आहे. असे खाते राणा कुटुंबीयांवर राजद्रोहाचा खटला दाखल करते हे आश्चर्यजनक आहे. याचा दुसरा अर्थ राजकीय दबावापोटी आणि सूडभावनेने एका जागतिक दर्जाच्या प्रशासकीय यंत्रणेला सुडापोटी मविआ सरकार बदनाम करीत आहे हे सिद्ध होते.
हे दाम्पत्य राजद्रोह करीत असल्याचा कोणताही सबळ पुरावा पोलिसांना न्यायालयासमोर देता आला नाही. किंबहुना पोलिसांनी नोटीस दिल्यानंतर राणा दाम्पत्य घराबाहेर पडले नाही, तसेच त्यांनी त्यांचा हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रमही रद्द केला. याउलट शिवसैनिकांनी त्यांच्या घरावर चाल करून हल्ला करण्याची तयारी केली होती. त्या तयारीला प्रक्षोभक करण्याचे म्हणजेच तापलेल्या शिवसैनिकांच्या आगीत तेल ओतण्याचे काम शिवसेना प्रवक्ते संजय राऊत करीत होते. संजय राऊत माध्यमांसमोर येऊन राणांच्या विरोधात विधाने आणि शिवसैनिकांना त्यांची कृती समर्थनीय असल्याचा शाबासकीसह पाठिंबा देत होते. आमच्या ‘मातोश्री’ या पवित्र मंदिरावर राणा दाम्पत्य हल्ला करण्यासाठी येत आहेत, अशा आशयाची विधाने संजय राऊत यांनी केली. खरेतर राणा दाम्पत्य हनुमान चालिसा पठणासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरी जाणार होते.
त्यातून मुख्यमंत्र्यांनी त्यांना रीतसर घरात घेऊन हनुमान चालिसा म्हणू दिली असती तर, आज जी अब्रू गेली ती अब्रू जाण्याची वेळ आली नसती. अर्थात संजय राऊत आणि अब्रू यांचा दुरान्वयेही संबंध नसल्यामुळे शिवसेनेची उरलीसुरली लाज न्यायालयाने काढून टाकली आहे. एक दाम्पत्य संपूर्ण महाराष्ट्राची राज्यव्यवस्था उलथवून टाकू शकते, अशांतता, दंगे निर्माण करू शकते अशाप्रकारची कलमे पोलिसांनी त्यांच्यावर लावली. दोन व्यक्ती जर राज्य उलथवून टाकू शकत असेल तर, हे सरकार अत्यंत दुबळे आहे असे म्हणावे लागेल. एकेकाळी राजकीय पक्षांचे प्रवक्ते अत्यंत महत्त्वाची जागा होती. पक्षाचे अध्यक्ष तसेच सुकाणू समिती यांचे विचार माध्यमांच्या द्वारे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रवक्ते नेमले जायचे, ते प्रवक्ते अत्यंत विद्वान आणि पक्षामध्ये तोलामोलाचे स्थान असलेले होते.
मात्र सध्या पक्षाच्या प्रवक्त्यांची पात्रता ती सुमार अशी राहिली आहे. त्यामुळे हे प्रवक्ते आहेत की, मनोरंजन करण्यासाठी नेमलेल्या व्यक्ती असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. अशांच्या प्रतिक्रियांची तपासणी करणे आणि त्यावर स्पष्टीकरण न्यायालयाने मागवले पाहिजे. राणा दाम्पत्याविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे चुकीचे असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. मात्र नोंदविलेला हा गुन्हा योग्य आहे, असे सांगून त्याचे समर्थन करणार्या प्रवक्त्यांनाही चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले पाहिजे. माध्यमासमोर बोलण्याची शिस्त आणि पद्धत निर्माण व्हायची असेल तर, न्यायालयाने अशा प्रवक्त्यांना न्यायालयाचा हिसका दाखवलाच पाहिजे. एकीकडे राणा दाम्पत्याला जामिनाचा दिलासा मिळाला आणि राजद्रोहाचा खटला दाखल करणे चुकीचे असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले.
त्याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजद्रोहाचे कलम काढून टाकावे, अशी मागणीवजा सूचना केली आहे. खरेतर त्यांनी हे विधान आणि याबाबतची चर्चा यापूर्वीच संसदेत करायला पाहिजे होती. भीमा-कोरेगाव येथील साक्षीत फडणवीस यांच्याविरोधात त्यांनी अटक केलेल्या व्यक्तींवरचा राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा असून, ते कलम रद्द करायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया नोंदवताना महाविकास आघाडी सरकारने राणा दाम्पत्यावर तोच गुन्हा दाखल केला आहे, याचा निषेध करायला पाहिजे होता. किंबहुना महाविकास आघाडी सरकारला कानपिचक्या द्यायला पाहिजे होत्या; परंतु आपला तो बाबुराव आणि दुसर्याचे ते कारटे या न्यायाने शरद पवार यांनी आपल्या साक्षीत हे विधान केले. खरेतर भीमा-कोरेगाव आणि एल्गार परिषद यामध्ये संबंध नाही, असे पवार म्हणत असले तरी, एल्गार परिषदेमधील भाषणांचे पडसाद दंगलीच्या काळात उमटले असेही निरीक्षण आहे आणि एल्गार परिषदेमध्ये भाषण केलेल्या वक्त्यांची चौकशी केल्यावर त्यातील काहीजणांचे परदेशातील दहशतवादी संस्थांशी संबंध असल्याचे तपासणी अहवालात म्हटले आहे.
कायदेशीर मुद्दा हा न्यायालयासमोर येईलच; मात्र राणा दाम्पत्य आणि एल्गार परिषदेमधील वक्ते यांच्यामध्ये तुलना करता राणा दाम्पत्य हे परिषदेत भाषण केलेल्या वक्त्यांच्या भाषणापेक्षाही अधिक जहाल होते, हे किमान शरद पवार यांनी पटवून द्यावे. हा सगळा प्रकार पाहता राजद्रोह म्हणजे नक्की काय रे भाऊ, असा प्रश्न करीत राजद्रोहाची व्याख्या पुन्हा एकदा समजून घ्यावी लागेल.