विश्वशांतीच्या शोधात
‘विश्वशांती केंद्र (आळंदी), पुणे, भारत’चे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचे रामेश्वर (रुई), ता. जि. लातूर हे जन्मगाव. या गावातील ‘श्रीराम रथयात्रा’ आता संपूर्ण देशातच नावीन्यपूर्ण ठरलेली आहे. पंचक्रोशीतील हिंदू, मुस्लिम, हरिजन, गिरीजन व सर्वच जातिधर्मांतील लोक या रथयात्रेत सहभागी होतात आणि भारतीय संस्कृतीचे व एकात्मतेचे सुंदर दर्शन येथे घडवितात..
रामनवमीच्या दिवशी गावातील लोकांचा उत्साह गगनाला भिडलेला असतो. संपूर्ण गाव प्रभू रामचंद्राच्या मिरवणुकीसाठी सज्ज असते. गावातील सर्व घरांना दिलेल्या गुलाबी रंगामुळे (गुलाबी खेडे) ताजेतवाने दिसायला लागते. श्रीरामरथयात्रेसाठी सुंदर नक्षीकाम केलेला स्वतंत्र रथ तयार करण्यात आलेला आहे. हा रथ अत्यंत कलात्मक पद्धतीने सजविला जातो. रथावर श्रीरामाची मूर्ती विराजमान होताच ढोल, ताशा, टाळ, मृदंगाच्या गजरात रथयात्रा सुरू होते. प्रभू रामचंद्रांच्या नावाचा जयजयकार होतो. शेकडो विद्यार्थी, बालचमू यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसरच निनादून जातो.
संपूर्ण पंचक्रोशीतील हजारो नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला या मिरवणुकीत सहभागी होतात. लोकांच्या आनंदाला पारावार उरत नाही. लोक नाचत असतात, महिला फुगड्या खेळत असतात, कारण मर्यादापुरुषोत्तमाच्या या मिरवणुकीने भारतीय संस्कृतीचे सुंदर दर्शन घेण्याचा आनंद प्रत्येकजण अनुभवत असतो. श्रीराम म्हणजे आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श पती, आदर्श राजा असाच तो जयजयकार असतो. मोठ्या जल्लोषात निघालेली ही यात्रा गावातील जामा मशीद येताच थांबते.
रामजन्मोत्सवाच्या दिवशी सकाळीच श्रीराम मंदिरात दर्शन घेऊन टाळ-मृदंगाच्या गजरात ‘रघुपती राघव राजाराम। पतितपावन सीताराम॥’ असे भजन म्हणत रामनवमीची ही मिरवणूक गावातून निघते. ज्यावेळी ही मिरवणूक तथागत गौतम बुद्ध विहार येथे येते. तेव्हा अर्थातच ‘बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि’ असा जयघोष करीत मिरवणूक गावातील जामा मशिदीसमोरून जाते त्यावेळी जामा मशिदीसमोर रस्त्यावर भव्य कमान उभारून मुस्लिम बांधव रथयात्रेचे स्वागत करतात. रथयात्रा येताच गावातील मुस्लिम बांधव व या वैशिष्ठ्यपूर्ण यात्रेसाठी देशातून आलेले काही नामवंत पाहुणे स्वागत समारंभात सहभागी होतात. आलेले पाहुणे व काही मुस्लिम युवक हा रथ ओढण्यामध्ये सहभागी होतात.
यावेळी रामेश्वर (रूई) गावचे उपसरपंच कमाल पटेल, जब्बार पटेल, प्रस्तुत लेखक व अनेक मुस्लिम बांधव श्रीराम रथयात्रेत सहभागी होऊन हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश दिला जातो. मशिदीजवळ येताच ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम – सबको सन्मती दे भगवान’ हे महात्मा गांधीजींचे अत्यंत आवडते भजन सर्वजण गात असतात, तर शाळेचे विद्यार्थी अक्षरशः नाचत असतात.
संत गोपाळबुवा यांच्या मंदिरात ही मिरवणूक पोहोचताच ‘पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम’चा गजर होतो. ही मिरवणूक म्हणजे विश्वात्मक भारतीय संस्कृतीचे दर्शनच म्हणावे लागेल.
सोनावळा नदीवरील श्रीराम-रहीम मानवता सेतूमधून ही मिरवणूक जात असताना जणू एकीकडे इस्लाम धर्माची बांग (अजान) याचे सुमधुर स्वर कानी पडत आहेत, तर त्याच वेळी ह. जैनुद्दीन चिस्ती यांच्या दर्ग्यावरील कव्वालीचे स्वर साद घालत आहेत, असा भास होत असतो. नंतर ह. जैनुद्दीन चिस्ती यांच्या दर्ग्यावर फुलांची चादर अर्पण करून विश्वशांतीसाठी समाधीवर ‘दुआ’ मागण्यात येते. या कार्यक्रमात सर्वधर्मीय मान्यवर सामील होतात.
धार्मिक उन्मादाने केवळ भारतातच नव्हे तर जगभर हैदोस घातल्याचे दिसून येते. धार्मिक उन्मादातून निर्माण झालेला दशहतवादाचा भेसूर राक्षस आज समाजाचा बळी घेत आहे. सर्व मानवजात एक प्रकारच्या असुरक्षिततेच्या व भयाच्या वातावरणात वावरताना दिसते. मानवजातीस भेडसावणारी ही असुरक्षितता, अशांतता नाहीशी करून पृथ्वीतलावर विश्वशांती आणि नंदनवन फुलवायचे असेल तर रामेश्वर (रुई) येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याची ही श्रीराम रथयात्रा देशातील तरुणांना अत्यंत प्रेरणादायी ठरणार आहे.
रामेश्वर (रुई) या गावी श्रीराम रथयात्रेच्या रूपाने हिंदू-मुस्लिम बांधवांनी भारतमातेच्या नावाचा केला जाणारा हा जयघोष खर्या अर्थाने स्वामी विवेकानंदांचे स्वप्न साकार करणारा आहे. प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांची यासाठी चाललेली तळमळ आणि धडपड मात्र आम्हा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.
श्रीराम रथयात्रेत सहभागी झालेला प्रत्येक माणूस जणू याचीच साक्ष देत असतो की, ‘राम’ अधिक ‘ईश्वर’ म्हणजेच ‘रामेश्वर’ व ‘रहीम’ अधिक ‘ईश्वर’ म्हणजे ‘रहीमेश्वर’ म्हणजेच गाव रामेश्वर! रामेश्वर (रुई) येथील श्रीराम रथयात्रा पाहिली म्हणजे भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी जगाला दिलेल्या संदेशाची आठवण होते. स्वामीजी म्हणाले होते की, ज्या ठिकाणी वेदही नाही, बायबलही नाही अथवा कुराणही नाही अशा ठिकाणी आपल्याला मानवजातीला घेऊन जावयाचे आहे; परंतु हे कार्य वेद, बायबल आणि कुराण या सर्वांचा समन्वय साधूनच करावयाचे आहे. ‘एकत्व’ हाच एकमेव धर्म असून, वेगवेगळे धर्मपंथ हे मूळ धर्माचे निरनिराळे आविष्कार आहेत. मानवजातीस हे शिकविले पाहिजे. तसे केले तर प्रत्येकजण त्याला उपयुक्त ठरेल अशा एकेक मार्गाचा अवलंब करील.
स्वामी विवेकानंदांचे पट्टशिष्य प्रा. डॉ. विश्वनाथ कराड हे जगत असलेल्या मानवता या धर्माचे तत्त्वज्ञान श्रीराम यात्रेतून त्यांनी किती स्पष्टपणे भारतातील सर्व विविध जातिधर्माच्या लोकांच्या पुढे ठेवले आहे, हे दिसून येते. सांप्रदायिक सद्भाव आणि धर्मनिरपेक्षतेचा हा अद्भुत असा एकमेवाद्वितीय अनुभव रामेश्वर (रुई) या गावी नेहमीच येतो. हा आदर्श सर्व भारतीयांनी आपल्या हृदयावर कोरून ठेवला पाहिजे. महाकवी डॉ. इक्बाल म्हणतात,
मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना
हिंदी है हम, वतन है, हिंदोस्ता हमारा ॥
सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा ॥
मुस्लिम बांधवांच्या प्रेरणेने सजलेली ‘श्रीराम रथयात्रा’ पाहण्यासाठी पंचक्रोशीतील प्रत्येक माणूस उत्सुक असतो व वर्षभर या अभिनव रथयात्रेची तो वाट पाहात असतो.
_प्रा. डॉ. एस. एन. पठाण (लेखक माजी कुलगुरू व आळंदी येथील विश्वशांती केंद्राचे समन्वयक आणि सल्लागार आहेत.)