संपादकीयलेख

काँग्रेसचे भवितव्य काय?

काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी विविध मुद्दे मांडले असले तरी, काँग्रेसला लागलेली घरघर थोपवणारे नेतृत्व त्यांच्याकडे आहे का? याचा विचार प्रथम व्हायला हवा. ज्या धाडसाने आणि कर्तृत्वाने काँग्रेसला प्रत्येक प्रदेशामध्ये पुढे जायला हवे, असे नेतृत्व त्यांच्याकडे आहे का? शिवाय प्राणपणाने आणि हिरीरीने झगडणारे संघटन कौशल्य दिसते का, याचा त्यांनी विचार करायला हवा.

काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सुनावलेले खडे बोल बरेच काही सांगून जातात. सोनिया गांधी यांना आपल्या पक्षाची किती चिंता आहे याचेच समीकरण त्यांनी पक्षाच्या बैठकीत मांडले आहे. सध्या देशामध्ये सर्वत्र काँग्रेसचे जे पानिपत सुरू आहे ते थोपवायचे कसे, याची मुख्य चिंता सोनिया गांधींना वाटणे साहजिक आहे. पक्षामधून प्रबळ नेतृत्व पुढे येत नाही. कोणी अशाप्रकारची सूचना केली तर त्याला बाजूला फेकायचे ही रणनीती पूर्वीपासून चालत आलेली आहे.

सोनिया गांधी यांच्या आजारपणामुळे आलेल्या शारीरिक मर्यादा आणि राहुल गांधी यांचे अयशस्वी ठरलेले नेतृत्व यामुळे काँग्रेस पक्षाची वाताहत झाली आहे हे मान्य करावेच लागेल. पक्षातील २३ ज्येष्ठ नेत्यांनी पक्षनेतृत्वाबाबत फक्त आवाज उठविला तर त्याला बंड समजले गेले. चोहोबाजूंनी टीकास्त्रे सोडली गेली. गांधी घराण्याच्या बाहेर नेतृत्व जाणे म्हणजे काँग्रेस संपविणे असा काहीसा अर्थ काँग्रेस कार्यकर्त्यांचा झाला की काय, याची शंका येते. एकतर नव्या नेतृत्वाकडे पक्षाला जिंकून देण्याची धमक नाही आणि नेहरू-गांधी घराण्याकडे पक्षाला दिशा देण्याची क्षमता नाही हेच यावरून सिद्ध होते.

महाराष्ट्रातील असंतुष्ट आमदारांचा एक गट सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी गेला होता आणि त्यांनीही सोनिया गांधींना साकडे घातले. राज्यात सत्तेवर असणार्‍या महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांकडून काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींची कशाप्रकारे गळचेपी होत आहे हे त्यांनी पुराव्यानिशी सांगितले. त्याचप्रमाणे राज्यातील पक्षाचे नेते, विशेषतः बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात तक्रारींचा पाढाच वाचला. आधीच घरघर लागलेला पक्ष आणि पक्षांतर्गत यादवी यात पक्षाचे भले कसे होणार, हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. मुळात दूरदृष्टी नसलेला हा पक्ष तरुण पिढीला आपल्याकडे वळवण्यात अपयशी ठरला आहे की काय, हा मुद्दा यानिमित्ताने डोळ्यांसमोर येतो. पक्षाचे बहुतेक नेते सध्या सत्तरी पार झालेले आहेत.

थोडक्यात त्यांना राजकारणातून बाजूला ठेवून त्यांच्याकडे मार्गदर्शक म्हणून पाहण्याची वेळ आली आहे. पूर्वी पक्षाकडे राहुल व प्रियांका गांधी यांच्या बरोबरीने ज्योतिरादित्य शिंदे व सचिन पायलट यांच्याकडे पाहिले जात होते. त्यातील ज्योतिरादित्य यांनी भाजपमध्ये उडी मारली आणि एकाकी पडलेल्या पायलटना पक्षातील बुजुर्गांनी जेरीस आणले. राहिला मुद्दा राहुल गांधी आणि प्रियांका यांचा, पण गेल्या महिन्यात झालेल्या पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल पाहिले तर काँग्रेस पक्षाला समूळ नष्ट करण्याचा विडा भाजप नेत्यांनी उचलला नाही ना, असे म्हणण्याची वेळ आली आहे. हाच मुद्दा उचलून धरत सोनिया गांधी यांनी काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना खडे बोल सुनावून डोळ्यांत झणझणीत अंजन घातले आहे.
विशेषतः त्यांनी आपल्या मार्गदर्शनाची सुरुवातच अतिशय धीरगंभीर पद्धतीने केली.

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी होते, असे सांगत त्या म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाचा मार्ग यापुढील काळात फारच खडतर बनला आहे, हे प्रत्येकाने गांभीर्याने घ्यायला हवे. आपल्या पक्षाला समर्पण, राष्ट्रप्रेम, दृढनिश्चय आणि आत्मविश्वासाची गरज आहे. त्याचप्रमाणे लवचिकतेच्या भावनांची परीक्षाही द्यावी लागेल. काँग्रेस पक्षांतर्गत असलेल्या जी-२३ या गटातली ज्येष्ठ नेत्यांची वक्तव्ये किंवा काही राज्यांतील नेत्यांचा नाराजीचा सूर त्यांनीही आळवला आणि त्या नेत्यांचा थेट नामोल्लेख टाळून त्या म्हणाल्या की, पक्षाच्या एकतेसाठी मी स्वतः कटिबद्ध आहे. नुकत्याच निवडणुकीच्या निकालांमुळे सर्वच जण हताश झाले असणार याची मला पूर्ण कल्पना आहे आणि याच कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी कार्यकारिणीची बैठकही झाली. काँग्रेस पक्षाचे पुनरुज्जीवन हे केवळ आपल्यासाठी महत्त्वाचे नसून, आपल्या देशातील लोकशाहीचे जतन करण्यासाठी आवश्यक आहे. सध्या केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारचे धोरण आपल्या पक्षात फूट पाडणे आणि जाती-धर्मामध्ये फूट पाडणे हेच आहे. त्याचा मुकाबला आपल्याला करावा लागणार आहे.

दुसरीकडे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचा निघालेला अश्वमेध रोखायचा असेल तर काँग्रेसला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. त्या दृष्टीने पुन्हा सुवर्णदिन आणण्यासाठी मैदानात उतरायचे आहे; परंतु सध्याची त्यांची गती आणि नेतृत्व पाहिले की, काँग्रेसची ही घरघर अत्यंत वाईट पद्धतीने त्यांना विनाशाकडे घेऊन जाणार की काय असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. नव्याने जन्मलेले अनेक पक्ष बाजी मारून जातील आणि निराश व हताश झालेला सर्वांत जुना काँग्रेस पक्ष, पक्षाचा कार्यकर्ता गल्लीबोळात शोधावा लागेल, हे निश्चित!

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये