संपादकीय

स्नानगृहाबाहेरही…!

रणवीरची नग्नता हा चर्चेचा विषय नाही, असे सांगणारे विद्वान ना समाजाला ओळखतात ना सामजिक मानसिकतेला. निर्बंध मनाने लादणे हा त्यावर मार्ग आहे. मात्र असे निर्बंध मन लादून घेत नाही, ही वस्तुस्थिती आहे. राजकीय आणि सामाजिक परिस्थिती स्नानगृहात सगळेच विवस्त्र असतात, असे असताना स्नानगृहाबाहेर येऊन आपण कसे विवस्त्र आहोत, हे दाखवण्याचे आणि त्याचे तुष्टीकरण करणे आवश्यक नाही; निदान रणवीरला तरी…!

रणवीर सिंग याने नग्नावस्थेत केलेले चित्रीकरण सध्या गाजत आहे. संस्कृती, सभ्यता आणि रुढी-परंपरांचा अभिमान असणाऱ्या व्यक्तींसाठी हे चित्रीकरण धक्कादायक आहे. खरे तर ते सार्वजनिक होणे त्यांच्या दृष्टीने धक्कादायक आहे. ते तसे सार्वजनिक झाल्यावर आपण काही बोललो नाही तर आपल्या पारंपरिक विचारसरणीवर आणि व्यक्तिमत्त्वावर प्रश्नचिन्ह उमटवले जाईल, अशी भीती त्यांना वाटत असावी. हा झाला एक भाग. मात्र त्या चित्रीकरणाचे समर्थन करणारे आपण कसे पुरोगामी विचारसरणीचे आहे, हे दाखवण्यासाठी त्या चित्राच्या बाजूने बोलत आहेत. हे पण त्यांच्या कथित पुरोगामी विचारसरणीवर शिक्का बसू नये, यासाठीची धडपड आहे हे स्पष्ट होते. समर्थन करणारे अगदी खजुराहोच्या कामशिल्पांपर्यंत जाऊन पोहोचले, तर काहींनी सप्रे-सोमण यांच्या जाहिरातीचा दाखला दिला. त्यावर होणारी चर्चा आणि त्यावेळी जशी पुरोगामी विरुद्ध पारंपरिक विचारांच्या गटात झाली होती, तशीच आता रंगणार यात शंका नाही.

चित्रीकरण सभ्य की असभ्य? ते सार्वजनिक असावे की खासगी? अगदी ते करावे की न करावे? करावे तर का करावे? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. यासंदर्भात अनेक दाखले दिले जातील, उदाहरणे दिली जातील. अगदी बऱ्याच वर्षांपूर्वी भट्ट परिवाराच्या महेश, पूजा यांनी अशा प्रकारे सामूहिक साधनसुचितेला छेद देणारी विधाने करून प्रसिद्धीच्या झोतात अंग शेकून घेतले होते. पूजा भट्ट हिने तर बर्थ डे ड्रेस अंगावर गोंदवून घेतला होता. केवळ अंगावर रंगांनी कपडे असल्याचा भास निर्माण करणारी कृती पूजाने पंचवीस वर्षांपूर्वी केली होती. त्यावरही जोरदार चर्चा झाली होती. आज हे संदर्भ देण्याचे कारण म्हणजे रणवीर सिंग याने नग्न चित्रीकरणाचा उपद्व्याप का केला असावा, हे समजत नाही. रणवीर सिंग हा नावाजलेला अभिनेता आहे. दीपिका पदुकोणचा पती आहे. कष्टाने, संघर्ष करून त्याने चित्रपटसृष्टीत आपले नाव निर्माण केले आहे. आज पैसा, प्रसिद्धी असताना अशा प्रकारचे फोटो काढून घेऊन ते व्हायरल करण्याची आवश्यकता काय आहे, हे समजत नाही. जाहिरातीसाठी अशी छायाचित्रे काढावी लागली, हे त्याचे स्पष्टीकरण खरे असले तरी जाहिरातीच्या वरातीआधीच ही घोडी पुढे दामटायचे कारण काय आहे? बरे ही घोडी दामटताना त्याच्या अर्धांगिनीलाही ते फारसे पटलेले नाही.

मात्र जाहिरातीसाठी हे करावे लागते, हे समर्थन सर्वसामान्यांसाठी पटणारे नाही. रणवीरच्या त्या छायाचित्रांवर उच्चवर्गीय, चित्रपटक्षेत्रातली मंडळी, अत्यंत श्रीमंतवर्गाला आक्षेप नाही. नसावा. याचे कारण त्यांच्या या प्रकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोणच वेगळा, स्वतंत्र असतो. अर्थात, असा वर्ग अत्यंत कमी आहे. पण जी मंडळी रणवीरला आपला मानतात, काही वेळा देवत्व-सुपर ह्युमनचा दर्जा देतात, त्यांना जाहीरपणे या त्याच्या कृतीचे समर्थन करता येणार नाही. समाजाची एक चौकट आहे. ती चौकट अमान्य करून फारसे चालत नाही. समाजस्वास्थ्याला ते घातक असते. याचा अर्थ सध्या जे चालते ते सगळे नैतिकतेला आधारित असतेच, आहे असे नाही. मात्र त्याचे समर्थन समाजात ज्यांना अनुसरले जाते त्यांनी करावे असे नाही. यातला भेद समजणे हा विवेकाचा, विचाराचा भाग आहे.

जगात सगळ्यात मोठे व्यापाराचे क्षेत्र शस्त्रास्त्र व्यापार, अमली पदार्थांचे व्यापार-तस्करी आणि कामुक चित्रफिती-देहव्यापाराचे आहे. यातला कोणताच प्रकार वैध नाही. समाजमान्य नाही. नीतीमत्तेत बसणारा नाही. मात्र त्याचे सर्वाधिक आकर्षण समाजाला आहे. गुपचूप केले आणि हे करताना सापडत नाही तोपर्यंत ही सगळी मंडळी सभ्य असतात. मात्र जाहीरपणे याचे समर्थन आणि त्यात सहभागी होणे, हे समाजमान्यतेला धरून नाही. घरात चार भिंतीत तुम्ही काय करता, यावर विचार करण्याचे कारण नाही. तुम्ही तुमच्या घरातल्या दूरदर्शन संचावर अथवा मोबाईलवर काय पाहता, याचा समाजाशी संबंध नाही. मात्र जेव्हा ते सामजिक होते तेव्हा त्याचा तुमच्या वैयक्तिक जीवनाशी संबंध येतो. तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहता. केले जातात. रणवीर सिंग याचे हेच झाले.

ते छायचित्रण जोपर्यंत त्याच्या अथवा जाहिरात कंपनीपुरते मर्यादित होते, तोपर्यंत त्यावर चर्चा झाली नसती. मात्र जेव्हा ती चर्चा समाजमाध्यमावर आणि समाजाच्या प्रत्येक घटकात जेव्हा याचा प्रचार, प्रसार होतो तेव्हा हा विषय सगळ्यांच्या चर्चेचा आणि टीकाटिप्पणीचा होतो. नग्नता ही स्वच्छ आणि सुंदर असते यात वाद नाही. मात्र लहान, पाळण्यातल्या मुलाला आपण तसे पाहतो तेव्हा मनात येणारे भाव; विचार स्वच्छ, निर्लेप असतात. रणवीरकडे पाहून ते तसे येणार नाहीत, याबाबत कोणाचे दुमत असणार नाही. सर्वसाधारणपणे सोने आणि माती याकडे समान दृष्टीने पाहणे हे संतांना किंवा महान कलाकारांनाच जमू शकते, मात्र सर्वसामान्यांकडे तशी दृष्टी असणे कसे शक्य आहे? आणि त्यावरून समाजात किती नग्नता आहे आणि आर्थिक धारणापासून मानसिक आचरणापर्यंत नग्नता असताना रणवीरची नग्नता हा चर्चेचा विषय नाही, असे सांगणारे विद्वान ना समाजाला ओळखतात ना सामजिक मानसिकतेला. निर्बंध मनाने लादणे हा त्यावर मार्ग आहे. मात्र असे निर्बंध मन लादून घेत नाही, ही वस्तुस्थिती आहे. राजकीय आणि सामाजिक परिस्थिती स्नानगृहात सगळेच विवस्त्र असतात, असे असताना स्नानगृहाबाहेर येऊन आपण कसे विवस्त्र आहोत, हे दाखवण्याचे आणि त्याचे तुष्टीकरण करणे आवश्यक नाही. निदान रणवीरला तरी…!

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये