संपादकीय

॥ या भारतात बंधुभाव नित्य वसू दे ॥

आज देशातील सामाजिक स्थिती पाहिल्यानंतर मला जाणवते की, राष्ट्रसंतांनी त्यावेळी मांडलेला विचार या देशासाठी आजही किती महत्त्वाचा आहे व त्याची आज आपल्या देशाला किती प्रकर्षाने गरज आहे.

पूर्वीच्या नागपूर विद्यापीठाचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर, असे नामकरण झाल्यानंतर कुलगुरूपदावर माझी पहिलीच नेमणूक झाली. १४ जुलै २००५ रोजी दुपारी तीन वाजता कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारण्याचा समारंभ झाला. मी कपाळावर लावून घेतलेला टिळा हा अनेकांच्या चर्चेचा विषय होता. कार्यालयामध्ये येताच मी कुलसचिवांना सांगितलं, की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी व हजरत ताजोद्दीन बाबा यांच्या दर्ग्यावर जाऊन पुष्पचक्र अर्पण केल्यानंतरच मी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करीन.

तेव्हा कुलसचिव प्रा. बेलसरे यांनी राष्ट्रसंतांची समाधी नागपूरपासून दीडशे किलोमीटर अंतरावर असल्याचं सांगितलं. मी त्यांना सांगितलं, की आपणास त्वरित मोझरीला निघालं पाहिजे. तिथं पोहोचायला सूर्यास्त झाला होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीवर पुष्पचक्र वाहिल्यानंतर माझ्या कार्यकाळाच्या यशासाठी मी राष्ट्रसंतांना साकडं घातलं. त्या पवित्र समाधी स्थळावरून मला ऊर्जा मिळत असल्याचा भास झाला. तेथील सचिव बोथेदादा यांना मी तसं बोलून दाखवलं. नंतर बोथेदादा म्हणाले, सर, आता आपणास मंदिरात जायचं आहे. तिथं तुम्हाला प्रार्थना करता येईल. मी सौभाग्यवतीकडं पाहिलं. आपले पती आता मंदिरात प्रार्थना, पूजा-अर्चा करतील.

त्याचे फोटो वर्तमानपत्रात आल्यावर मुस्लिम समाजाचा नाहक रोष ओढून घ्यावा लागेल, असं तिनं माझ्या कानात हळूच सांगितलं. तेवढ्यात बोथेदादा म्हणाले, सर, राष्ट्रसंतांनी स्वत: हे मंदिर बांधलं आहे. त्याचं नाव ‘मानवता मंदिर’ असं ठेवलं आहे. मी पाहतो तर समोरच त्या मंदिरावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं,
आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी।
सबके लिये खुला है, मंदिर यह हमारा॥

मी तर आश्चर्यचकितच झालो. धर्माच्या नावावर सगळीकडं वणवा पेटला असताना गुरुकुंजमधील ते ‘ओऍसिस’ (हिरवेगार बेट) पाहून मी आनंदित झालो. माझ्या मनातील मंदिराची कल्पना वेगळी होती. तोपर्यंत आम्ही मंदिरात पोहोचलो होतो. बोथेदादा म्हणाले, सर, त्या आसनावर फुलं ठेवलेली जागा आहे ना? ते ईश्वराचं अधिष्ठान समजा. इकडे तुम्ही बसा आणि तुमच्या अल्लाहची प्रार्थना करा. वाटल्यास तुम्ही नमाजदेखील येथे पढू शकता. आता मात्र माझ्या आश्चर्याला पारावार नव्हता. सौ. जन्नत पठाण हिच्या चेहर्‍यावरचा आनंद मी पाहू शकत होतो. बोथेदादा म्हणाले, सर, येथे मंदिरात कोणतीही मूर्ती नाही.

फक्त सर्व जातिधर्माच्या संतांचे फोटो लावले आहेत. नागपूरच्या ताजोद्दीन बाबांचाही फोटो इथं लावलेला आहे. विश्वात्मक ईश्वराचा विचार मांडणार्‍या राष्ट्रसंतांच्या त्या विचारांचं दर्शन मला झालं आणि माझे हात आपोआप त्या अधिष्ठानाकडं जोडले गेले. मला धन्यता वाटली. त्यावेळी बोथेदादांनी मला राष्ट्रसंतांनी लिहिलेले लहानमोठे ४० ग्रंथ भेट दिले. नागपूरला आल्यावर मी दीक्षाभूमी आणि ताजोद्दीन बाबा यांच्या दर्ग्यासही भेट दिली.

मी रात्री सर्व ग्रंथ उत्सुकतेनं चाळले. त्यात एका पुस्तकात राष्ट्रसंतांचं एक भजन/गीत माझ्या वाचनात आलं. ते गीत होतं,
या भारतात बंधुभाव नित्य वसू दे । दे वरचि असा दे ।
हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे। मतभेद नसू दे ॥धृ.॥
नांदोत सुखे गरीब-अमीर एक मतानी ।
मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी ।
स्वातंत्र्य सुखा या सकलामाजि बसू दे ।
दे वरचि असा दे ॥१॥

या देशात सर्व जातीधर्माचे लोक बंधुभावानं नांदू दे, असा वर राष्ट्रसंतांनी ईश्वराकडं मागितला होता. देशातील गरीब-श्रीमंतांनी सुखाने राहावे म्हणून प्रार्थना केली होती. देशातील युवक शीलवान व उद्योगी व्हावा आणि या देशातून अस्पृश्यता कायमची नष्ट व्हावी, यासाठीही वर मागितला होता. शिवाय जातीभाव विसरून आपण सर्वजण एक होऊ या. मानवता आणि राष्ट्रभावना जोपासून आपल्या घरामध्ये स्वर्गीय आनंद निर्माण करूया, अशी ती प्रार्थना होती. हे एकमेव गीत म्हणजे ज्याला नोबेल पुरस्कार मिळावा, या ताकदीचं आहे, असे मला वाटले.

दुसर्‍या दिवशी सकाळी मी कार्यालयात गेल्याबरोबर कुलसचिवांना विद्यापीठाच्या गीताबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांनी आपल्या विद्यापीठाला ‘विद्यापीठ गीत’ नसल्याचं सांगितलं. मग मी त्यांना पुणे विद्यापीठाचे कवी मंगेश पाडगावकरांनी लिहिलेलं गीत म्हणून दाखविलं. तेव्हा ते म्हणाले, ठीक आहे सर; परंतु आपल्या विद्यापीठाचे गीत करायचे राहून गेलं. आजवर तसा विचारच झाला नाही. मी त्यांना लगेच सांगितलं की, विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाच्या वतीनं व विधिसभेच्या (सिनेट) वतीनं मी ‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे…’

हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन आपल्या विद्यापीठाचं गीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. कुलसचिवांनी हसतच त्याला होकार दिला. त्यांनी अध्यादेशाचा मसुदा लिहून आणला. मी त्यावर स्वाक्षरी केली. ‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे…’ हे विद्यापीठ गीत असेल व ते गीत गायल्याशिवाय विद्यापीठात अथवा संलग्नित महाविद्यालयात कोणताही कार्यक्रम सुरू करता येणार नाही. हा आदेश न पाळल्यास संबंधितांवर कारवाई करून त्यांना दंड करण्यात येईल. प्रसंगी महाविद्यालयाचं संलग्नीकरण रद्द करण्यात येईल. अशा आशयाचा तो अध्यादेश होता. दुसर्‍या दिवशी ही बातमी सर्व वर्तमानपत्रांत आली. माझ्या एका निर्णयामुळं संपूर्ण विदर्भात माझं कौतुक झालं.

अशाच प्रकारे विश्वशांती केंद्र (आळंदी), पुणेचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी आपल्या जन्मगावी रामेश्वर (रुई), ता. जि. लातूर येथील सर्व जातीधर्मातील लोकांना एकत्र करून सर्व लोकांच्या सहभागातून गावात श्रीराम मंदिर, जामा मशीद, हजरत जैनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा, गोपाळबुवा मंदिराचा जीर्णोद्धार, श्रीराम-रहिम मानवता सेतू, तथागत गौतमबुद्ध विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन इ. धार्मिक स्थळं निर्माण केली व उभे केले ‘मानवता तीर्थ’, ‘विश्वतीर्थ’; परंतु या मानवता तीर्थाची अथवा विश्वतीर्थाची राज्यातील अथवा केंद्रातील एकाही मोठ्या नेत्याने अद्याप साधी नोंददेखील घेतली नाही, तर त्या केंद्रांना भेट देणे दूरच.

एखादी व्यक्ती भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंदांपासून प्रेरणा घेऊन आपले संपूर्ण जीवन भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी खर्ची घालते आहे व त्या व्यक्तीच्या कार्याची नोंद कुणीच घेऊ नये हे खरेच कुणालाही वेदना देणारे आहे. आज ही सर्व धर्मस्थळे केवळ धर्मस्थळे न राहाता प्रेरणास्थळे झाली आहेत व संदेश देत आहेत… या भारतात बंधुभाव नित्य वसू दे।

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये