विधायक शपथ घेऊया
![विधायक शपथ घेऊया sangh 1 1](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/08/ेsangh-1-1-780x470.jpg)
देशांतर्गत या आव्हानाबरोबर देशाबाहेरची आक्रमणे ही थोपवावी लागणार आहेत. त्यासाठी ऐक्य, एकीचे बळ आणि देशावर अढळ विश्वास पाहिजे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना विवेक,भानावर राहून राष्ट्रउभारणी केली पाहिजे.
कॉग्रेसचे पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. परराष्ट्र धोरणाची समज, व्यापक दृष्टिकोन, संशोधन-शिक्षणाबद्दल आस्था, ममत्व असणारे पं. नेहरू यांनी स्वतंत्र भारताच्या अनेक क्षेत्राची पायाभरणी केली. देशाला दिशा देण्याचे प्राथमिक कार्य त्यांनी नक्कीच केले. धरणे, प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे, शिक्षण यासंदर्भात अनेक प्रकल्प त्यांनी उभे केले. देशाची स्थिती त्यावेळी अत्यंत उत्तम नव्हती. फाळणी झालेली. केवळ जमिनीची नव्हे, तर मनांची, जातीतल्या विश्वासाचीही फाळणी झाली होती. इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा आपल्या देशातल्या अनेकांवर परिणाम होईल आणि आपली कूट राजनीती पुढे ही देशी मंडळी सुरू ठेवतील, याची व्यवस्था केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर देशातल्या बहुतेक नागरिकांचा महात्मा गांधी यांच्या तत्त्वावर आणि पंडित नेहरू यांच्या कर्तृत्वावर नक्कीच पक्का भरवसा होता. देशातला योग्य मार्गांनी पं. नेहरू नेतील याला मान्यता होती.काश्मीरप्रश्न, पाकिस्तान विभाजनानंतरच्या प्रश्नांनी देशाच्या प्रारंभातच अडथळा निर्माण केला. युद्ध, दुष्काळ, सामाजिक असामनता, आर्थिक दरी, शिक्षणाचे कमी प्रमाण, आरोग्यव्यवस्था, वाहतुकीच्या सोयी अगदी पाणीपुरवठ्याची व्यवस्था या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या समस्यांचा अडथळा त्यांच्या पुढे होता.
पक्षांतर्गत धुसफूसही होती, मात्र ते पं. नेहरू होते. त्यांनी सगळे अडथळे पार केले, काही अडथळे निर्माणच होऊ नयेत, यासाठी प्रयत्न केले. हे सगळे लिहित असताना त्यावेळची आपल्या देशाची परिस्थिती नक्की कशी होती, याचा विचार करूया. देशाची लोकसंख्या १९५१ मध्ये ३६ कोटी १० लाखांवर होती.त्यापूर्वी १९४१ च्या जनगणनेपेक्षा ही संख्या १३.३१ टक्क्यांनी वाढली होती. आज २०११ ची जनगणना पाहिली तर ही संख्या १२१ कोटी होती. आज स्वातंत्र्यदिन साजरा करताना ही संख्या १३० कोटींवर झाली आहे. जगाच्या लोकसंख्येत भारताच्या लोकसंख्येचा वाटा १७ टक्के आहे, तर त्यावेळी जो भूभाग भारताच्या वाट्यास आला, त्यात वाढ होणे शक्य नाही. जागतिक भौगोलिक क्षेत्रफळाच्या २.४ टक्के एवढेच क्षेत्रफळ आपल्या वाट्यास आलेले आहे. या जमिनीपैकी अन्नधान्य पिकवणारी जमीन आणि त्याला आवश्यक पाणी, खते, बियाणे याचा विचार केला तर १९५१ मध्ये आपण ३६ कोटी लोकसंख्येला दोन वेळा पोटभर खायला देऊ शकू, एवढेही अन्न पिकवत नव्हतो. मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपण अमेरिका किंवा इतर देशांवर अवलंबून होतो.
आज अन्नधान्याच्याबाबतीत आपण आत्मनिर्भर आहे. उलट काही देशांना आपण अन्नधान्य पाठवतो, निर्यात करतो. देश १९५१ मध्ये ५०, ५१ दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन करीत होता. १९७०-७१ मध्ये ते १०८ द. ल. टनापर्यंत पोहोचले, तर आजमितीस आपण २६० द. ल. टन अन्नधान्य उत्पादन करतो आहोत. ही प्रगती लक्षणीय आहे. लोकसंख्येत झालेल्या वाढीपेक्षा अन्नधान्यातल्या वाढीचा वेग चांगला आहे, मात्र पुरवठा, वितरण यंत्रणा सक्षम नसल्याने आजही अनेक मंडळी रस्त्यावर उपाशीपोटी झोपतात. प्रौढ साक्षरतेत दहा वर्षांत ९.२१% इतकी वाढ झाली, एकूण साक्षरता ७४.०४% पर्यंत वाढली. १९५१ च्या जनगणनेनुसार, भारताची एकूण साक्षरता १६.६७%, तर पुरुष साक्षरता २४.९५% आणि स्त्री साक्षरता ७.९३% एवढी होती. सातत्याने प्रयत्न केल्याने आज शिक्षणाच्या विविध शाखांमध्ये गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी निर्माण होत आहेत, केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही आपले विद्यार्थी गुणवत्ता दर्शवत आहेत. ३१ मार्च २०११ रोजी प्रसिद्ध झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारतीय लोकसंख्या १७.७% च्या दशकातील वाढीसह १.२१ अब्ज झाली होती.
प्रौढ साक्षरतेत दहा वर्षांत ९.२१% इतकी वाढ झाली, एकूण साक्षरता ७४.०४% पर्यंत वाढली. १९५१ च्या जनगणनेनुसार, भारताची एकूण साक्षरता १६.६७%, तर पुरुष साक्षरता २४.९५% आणि स्त्री साक्षरता ७.९३% एवढी होती. ही काही क्षेत्रातली आकडेवारी देताना दर दशकात प्रत्येक पक्षनेता नव्हे, प्रत्येक व्यक्ती राष्ट्रउभारणीच्या कार्यात आपले योगदान देत असते.भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, धार्मिक असहिष्णुता, प्रत्येक क्षेत्रातली असमानता-वाढणारी दरी ही आव्हाने आता अपल्यापुढे आहेत. राजकारण म्हणजे केवळ विरोधासाठी विरोध न करता सकारात्मक, विधायक, सकारात्मक काम करणे अपेक्षित आहे. देशांतर्गत या आव्हानाबरोबर देशाबाहेरची आक्रमणेही थोपवावी लागणार आहेत. त्यासाठी ऐक्य, एकीचे बळ आणि देशावर अढळ विश्वास पाहिजे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना विवेक, भानावर राहून राष्ट्रउभारणी केली पाहिजे. पक्षाभिनिवेष बाजूला ठेवावा आणि देश विश्वात शोभला पाहिजे, स्वातंत्र्य चिरंजीव राहिले पाहिजे, याची शपथ घेतली पाहिजे, नव्हे ती घेऊया…!