![वेध ६ जी तंत्रज्ञानाचे... 6g](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/08/6g-780x470.jpg)
आता होणार आभासी जगाचे संमिश्रण
मार्टिन कूपर एक अमेरिकन अभियंता होते. त्यांनी ३ एप्रिल १९७३ रोजी जगाला पहिला मोबाइल फोन दिला. हा फोन सर्वसामान्यांसाठी होता. त्याचं वजन सुमारे दोन किलो होतं. हे आपल्याला विचित्र वाटेल, पण पूर्वी एवढ्या वजनाचे मोबाइल फोन असायचे. आजच्या युगानुसार ते खूपच जड होते.
तंत्रवेध | डॉ. दीपक शिकारपूर |
भारतात ५ जी चर्चा सुरू असताना चीनमध्ये ६ जीचे प्रयोग सुरू आहेत. ६ जी हा विस्तारित आणि मिश्रित वास्तविकता मोबाइलच्या सहाव्या पिढीचा भाग असेल. ६ जी १०० गिगाहर्टझच्या आसपासच्या फ्रिक्वेन्सीवर ऑपरेट करतं. हे संवेदनांचं इंटरनेट आहे, भौतिक आणि आभासी जगाचं संमिश्रण हे ६ जीचं वैशिष्ट्य आहे. पुढील दशकात स्मार्ट उपकरणं, आयओटीमुळे सर्वत्र इंटरनेट बॅंडविड्थ लागताच ६ जी (जनरेशन) कामी येईल.
देश-वंश-वर्ण-राहणीमान या क्षुद्र भेदांच्या पलिकडे जाऊन आज जगात सर्वांच्या जीवनाचा या ना त्या प्रकारे हिस्सा बनलेली वस्तू म्हणजे मोबाइल फोन! मग तो हँडसेट ४०० रुपयांचा जुना, रोगट पिवळ्या रंगाच्या स्क्रीनचा सेकंडहँड असो की एखाद्या प्रख्यात ‘फॅशन-हाऊस’मधला, हिरे जडवलेला आणि सर्व सुविधायुक्त तीन लाख रुपयांचा असो! सर्व सेलफोनधारकांना परस्परांच्या संपर्कात ठेवण्याचं मूलभूत काम फोन कंपन्या, सेवा-पुरवठादार आणि हँडसेटमधल्या तांत्रिक करामतींद्वारे निरंतर केलं जात आहे. पूर्वी घराबाहेर पडताना पैशाचं पाकीट, घड्याळ, चाव्या इत्यादी गोष्टी बरोबर घेतल्या का याची खातरजमा करून घेतली जात असे.
आता फक्त मोबाईल फोन बरोबर बाळगला की सर्व टेन्शन दूर… जगातला पहिला मोबाईल फोन मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपरने १९७३ मध्ये विकसित केला. इलेक्ट्रॉनिक युगाच्या सुरुवातीपासून (सुमारे १९७०) गेल्या ४० वर्षांमध्ये सर्वाधिक वेगाने बदलत आणि विकसित होत गेलेलं उपकरण म्हणजे सेलफोन. याबाबतीत त्याने संगणकाला केव्हाच मागे टाकलं आहे. किंबहुना, आता हँडसेटमध्येच परिपूर्ण संगणक समाविष्ट झाला आहे. आता सेलफोन हवा असण्याच्या गरजेचं रूपांतर वेडामध्ये म्हणजे ‘ॲडिक्शन’मध्ये झालं आहे. इतकं की रोटी-कपडा-मकानसारख्या जीवनावश्यक गोष्टींमध्ये लोक आता सेलफोनचाही समावेश करू लागले आहेत. गेल्या दहा वर्षांमध्ये मोबाइल फोनच्या हँडसेटचं स्वरूप किती बदललं आहे हे सांगायला नकोच. हँडसेट लहान आणि हलके बनले आणि मुख्य म्हणजे त्याद्वारे मिळणाऱ्या सुविधांमध्ये आश्चर्यकारक वेगाने वाढ झाली.
मानवी संस्कृतीच्या उदयाला ५० हजार वर्षं उलटून गेली आहेत. सुरुवातीच्या काळात संवादासाठी मानवाने विविध प्रकारच्या आवाजाचा वापर केला. कालांतराने भाषा अस्तित्वात आली. संवादासाठी भाषेचा वापर सुरू झाला. मानवाने माध्यम म्हणून प्राणी आणि पक्षांचा वापर केला. पुढे दूत अस्तित्वात आला आणि आधुनिक काळात त्याला पोस्टमन ही ओळख मिळाली. पहिल्या विश्वयुद्धात संपर्कासाठी टेलिग्रामचा वापर करण्यात आला, तर दुसऱ्या विश्वयुद्धात टेलिफोन अस्तित्वात आला. त्यावेळी रेडिओ टेलिफोनचा वापर करण्यात आला होता. १९४० च्या दशकात वाहनातल्या फोनची सुविधा उपलब्ध झाली.
पुढची तीन दशकं यावर बरंच संशोधन झालं. १९५० च्या दशकात फक्त नागरी सेवांसाठी म्हणजेच सैन्य दलासाठी फोन वापरले जात होते. १९७३ पासून ते सामान्य माणसासाठी उपलब्ध होत गेले. मार्टिन कूपर एक अमेरिकन अभियंता होते. त्यांनी ३ एप्रिल १९७३ रोजी जगाला पहिला मोबाइल फोन दिला. हा फोन सर्वसामान्यांसाठी होता. त्याचं वजन सुमारे दोन किलो होतं. हे आपल्याला विचित्र वाटेल, पण पूर्वी एवढ्या वजनाचे मोबाइल फोन असायचे. आजच्या युगानुसार ते खूपच जड होते. परंतु ८० च्या दशकाच्या सुरुवातीला असा फोन जवळ असणं हे आनंदाचं प्रतीक मानलं जात असे. मार्टिन कूपरने आजच्या आघाडीच्या मोबाईल कंपनी मोटोरोलाच्या सहकार्याने हा मोबाइल फोन तयार केला. नंतर तो या कंपनीचा सी. ई. ओ. झाला.(पूर्वार्ध)