![एक तरी ओवी अनुभवावी तरी ओवी](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/08/एक-तरी-ओवी--780x470.jpg)
।।जय श्री राम ।।
।।ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन ।।
।।अहिंसकाचे संभाषण ।।
विवेचन | प्रकाश पागनीस |
अ. १३ व्यातील ओवी क्रमांक २६१ ते २७० यात आलेले अहिंसकाचे बोलण्याचे वर्णन करताना सुंदर उपमांचा वापर केलेला आहे. हे वाचताना आपल्याला १८ व्या अध्यायातील ओवी आठवते.
वाचे बरवे कवित्व।
कवित्व बरवे रसिकत्व।।
संभाषणात काव्यप्रचुरता हवी आणि वाचकांना काव्यात रस घेण्याची आवड असेल तर अध्यात्मासारखा गहन. विषय आनंददायी होतो.
स्वयें श्वसणेचि ते सुकुमार।
मुख मोहाचे माहेर।माधुर्या जाहले अंकुर।
दशन तैसे ।।२६१।।
अहिंसावादीचे बोलणे किती हळुवार असते पाहा. त्याचे श्वास घेणे आणि सोडणे.हळूवारपणे होते. त्याचे वदनावर प्रेम, मोह माहेरी आल्यासारखे वस्ती करतात. त्याच्या तोंडातील दात मधुरतेचे जणू काही अंकूर असतात.
पुढा स्नेह पाझरे । मागा चालती अक्षरे ।
शब्द पाठी अवतरे । कृपा आधि ।।२६२।।
बोलण्याचे आधीचे त्याचे चेहऱ्यावर प्रेम भावना पाझरत असते. मागून त्याचे बोलणे सुरू होते. सर्वप्रथम कृपा दया प्रकटतात. नंतर शब्द बाहेर पडतात.
श्री रामदासांची उक्ती पाहा – पुढे वैखरी ।
राम आधि वदावा ।।
प्रत्यक्ष बोलण्याचे अाधी श्रीरामांचे चिंतन करावे. म्हणजे गैर बोलले जात नाही.
तवं बोलणेचि नाही । बोलो म्हणे जरी काही ।
तरि बोल कोणाही ।खुपेल कां ।।२६३।।
बरेच वेळेस तो बोलतच नाही आणि आपल्या बोलण्याने कोणीही दुखावला जाणार नाही, याची तो काळजी घेतो.
बोलता अधिकुही निघे ।
तरी कोण्हाही वर्मी न लगे ।
कोण्हासि न रिगे ।शंका मनी ।।२६४।।
आपले बोलणे तो नेमके बोलतो. पाल्हाळीक, कंटाळवाणे तो बोलित नाही आपल्या बोलण्याने तो कोणाला घायाळ करीत नाही. हा बोलताना वर्मभेद करील, अशी शंका कोणालाही वाटत नाही. म्हणजे त्याचे बोलणे नेहमीच विश्वासदर्शकच असते.
मांडिली गोठी हन मोडैल ।
वासिपैल कोणी उडैल ।
आईकोनि वोलांडिल । कोण्ही जरी ।।२६५।।
आपण मांडलेल्या विषयावर वादावादी होईल असे तो. बोलत नाही. आपल्या बोलण्यानंतर एखादा ज्ञानाने घाबरून जावे, असे तो बोलत नाही.
तरि दुवाळी कोणा न व्हावी ।
कवणाची भंवयी नुचलावी ।
ऐसे भावो जीवी । म्हणोनि उगा ।।२६६।।
आपल्या बोलण्याचा विरुद्ध अर्थ निघेल. रागाने कोणी डोळे मोठे करेल अथवा त्याची भुवयी उचलली जाईल, असे वाईट तो बोलत नाही.
मग प्रार्थिला विपाये ।जरी लोभे बोलो जाये । तरि परिसे तया होये । मायबापु ।।२६७।।
खूप वेळेस तो मौन पत्करून गप्प बसतो.कोणी “महाराज आपण बोलावे” अशी विनंती केली तर इतका सुंदर प्रेमाने बोलेल की ऐकणारांना आपले आई-वडीलच बोलत आहेत. असे वाटते.
कां नादब्रह्म मुसे आले ।
की गंगापयच उसळले ।
पतिव्रते आले । वार्धक्य कां.।। २६८।।
त्याच्या बोलण्यात उत्तम गवयाचे गाणे ऐकतो आहे. नादमाधुर्य त्याच्या बोलण्यात असते. पापाचे क्षालन करणाऱ्या गंगानदीला प्रेमाचे भरते यावे, असे ते बोलणे असते.