सुदैवाने राज ठाकरे यांनी नव्याने हा मुद्दा उपस्थित करून या वादाला तोंड फोडले आहे. त्यामुळे आता सर्वच या विषयांवर जागृत झाले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. हे सर्व मुद्दे लक्षात घेता राज ठाकरे यांनी जो मुद्दा उपस्थित करून संघर्षाची हाक दिली, तो मुद्दा वैध पद्धतीने आणि शांततामय मार्गाने पुढे कसा रेटता येईल, याचा विचार प्रत्येक हिंदू व्यक्तीने करायला हवा.
गेल्या शनिवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईत शिवतीर्थवर झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात बोलताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवर भोंगा लावून बांग देण्याच्या प्रकरणात नाराजी व्यक्त केली आणि या प्रकाराच्याविरोधात येथे अशी लाऊडस्पीकर लावून बांग दिली जाते, तिथे समोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा वाजवा, असे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिले. त्यांच्या या निर्णयाचे महाराष्ट्राच्या राजकारणात साद-पडसाद उमटताना दिसत आहेत. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी, तर राज ठाकरे यांना हातकड्या लावून तुरुंगात डांबण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या आवाहनानुसार त्यांच्या एका कार्यकर्त्याने मशिदीसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा ऐकवण्याचा उपक्रम सुरू केला. मात्र तो उपक्रम पोलिसांनी लगेचच उधळून लावला. पोलिसांनी तो लाऊडस्पीकर तर जप्त केलाच, पण त्याचबरोबर संबंधित कार्यकर्त्यासह इतर कार्यकर्त्यांनाही अटक करून गुन्हे दाखल केले. एकूणच हे प्रकरण आता चिघळणार आहे हे नक्की.
या प्रकरणावर भाष्य करण्यापूर्वी नेमके वास्तव काय हे जाणून घेणे गरजेचे आहे. आपल्या देशात जिथे जिथे मशिदी आहेत तिथे मशिदींवर भोंगा म्हणजे लाऊडस्पीकर लावून नमाज पढतानाची बांग किंवा अजानचे वाचन करायचे, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रथा आहे. आपल्या देशात सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर लावून एखादा कार्यक्रम घ्यायचा असल्यास पोलिसांची परवानगी घेणे गरजेचे असते. देशात अनेक धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रम जाहीररीत्या होतात. यावेळी लाऊडस्पीकर लावण्यासाठी रीतसर परवानगी घेतली जाते. मात्र अशा प्रकारे मशिदीवर भोंगे लावून दिवसातून चार ते पाच वेळा बांग देणार्या मुस्लिमांना यातून सूट देण्यात आली आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात असलेल्या काँग्रेसच्या सरकारांनी मतांचे राजकारण करण्यासाठी मुस्लिमांचे लांगूलचालन करण्याचे धोरण अंगिकारले होते. त्यामुळे असा सर्रास कायदाभंग सुरू राहिला. आज वर्षानुवर्षे मुस्लिम बांधव असे मशिदींवर भोंगे लावून बांग देतात आणि दिवसातून पाच वेळा नमाज पढतात.
इथे विशेषत्वाने नमूद करायचे असे, की मशिदीतून मुल्ला-मौलवींनी बांग द्यायची आणि मुस्लिम बांधवांनी रस्त्यावर येऊन नमाज पढायचे, अनेक शहरांमध्ये रहदारीच्या रस्त्यांवर मशिदी उभ्या आहेत. अशा मशिदीसमोरच्या रस्त्यांवर दिवसातून पाच वेळा नमाज पढला जात असेल तर रहदारीला अडथळे होणारच, मात्र या गोष्टीला दुर्लक्षित करण्यात आलं. मुंबईसारख्या भररहदारीच्या रस्त्यावर नमाजचे कार्यक्रम दिवसभर चालायचे. शेवटी १९९२-९३ च्यादरम्यान तत्कालिन विरोधी पक्षनेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांनी नमाजच्या उत्तरात रस्त्यावर महाआरती सुरू केली. परिणामस्वरुप सरकारला झुकावे लागले आणि आता सध्या रस्त्यावर नमाज पढणे कमी झाले आहे.
भोंगे लावून बांग देण्याच्या पद्धतीची सुरुवात झाली आणि ज्याला काँग्रेसने उचलून धरले त्या पद्धतीला आज प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला तर मुस्लिमांच्या धार्मिक हक्कांवर गदा आल्याचा आरोप केला जाईल, हे नक्की. यावेळी कोणते धार्मिक हक्क नाकारले जातात, याचा शोध घेणेही गरजेचे ठरते. मुस्लिम धर्माची स्थापना अंदाजे इसवी सन सुरू होताना झाली असावी, अशी माहिती मिळते. म्हणजे सुमारे २००० वर्षांपूर्वीचा हा धर्म असावा, असा अंदाज बांधता येतो. मुस्लिमांनी अल्लाला धन्यवाद देण्यासाठी दिवसभरातून पाच वेळा मशिदीत जाऊन किंवा मग जिथे असाल तिथे नमाज पढावे, असे धर्मग्रंथात लिहिले आहे. मात्र रस्त्यावर येऊन नमाज पढलाच पाहिजे, असे कुठेही म्हटलेले नाही. त्याचप्रमाणे अजानचे वाचन करणे किंवा बांग देणे यासाठी ध्वनिक्षेपकच वापरला पाहिजे, असेही कुठे म्हटलेले नाही. सुमारे २००० वर्षांपूर्वी लाऊडस्पीकर ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती.
लाऊडस्पीकरचा शोध गेल्या दोन शतकातला आहे. त्यापूर्वीसुद्धा मशिदीतून बांग देणे सुरूच होते. मग लाऊडस्पीकर बंद करायला सांगितला तर त्यात धार्मिक स्वातंत्र्यावर अधिक्षेप कसा होईल, याचे उत्तर मिळायला हवे. विशेष म्हणजे अन्य धर्मीयांनाही सवलत नाही. हिंदूंना त्यांच्या मंदिरातून दिवसभरातून दोनदा होणारी आरती लाऊडस्पीकरवर वाजवण्याची परवानगी मिळत नाही. ख्रिश्चन, बौद्ध, शिख, आदिवासी या कोणालाच अशी परवानगी दिली जात नाही. फक्त मुस्लिमांनाच ही परवानगी का दिली जाते, असा प्रश्न या देशातील प्रत्येक सुजाण नागरिकाच्या मनात आला तर त्यात नवल काहीही नाही.
काही वर्षांपासून ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न कायम ऐरणीवर आला. त्यामुळे सुमारे ८-१० वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला. ठिकठिकाणी ध्वनिक्षेपक लावून ध्वनिप्रदूषण होते, ही बाब लक्षात घेऊन रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत ध्वनिक्षेपक लावण्याला सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली. या आदेशाला वर्षातून माझ्या माहितीप्रमाणे १० वेळा अपवाद करण्याचे निर्णय स्थानिक प्रशासनप्रमुखाला देण्यात आले आहेत.
अशा स्थितीत रात्री १० ते ६ च्यादरम्यान कोणालाही लाऊडस्पीकरचा वापर करता येत नाही. मुस्लिमांमध्ये पहाटे ४ वाजता अजान देऊन नमाज पढण्याची पद्धत आहे. अशा वेळी पहाट ४ वाजता जर मशिदींवर लाऊडस्पीकर लावून बांग दिली गेली, तर तो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान ठरू शकतो. मात्र याकडे शासकीय यंत्रणा पद्धतशीरपणे दुर्लक्ष करते. पहाटेचेही अजान तर किमान बंद केली जाऊ शकते. विशेष म्हणजे अशा प्रकारे मशिदींवर भोंगा लावून बांग देण्याची पद्धत फक्त भारतातच आहे. इतर मुस्लिम देशांमध्ये अशी कोणतीही पद्धत नसल्याची माहिती मिळते. ख्यातनाम गायिका अनुराधा पौडवाल यांनी हा मुद्दा समाजमाध्यमांवर उपस्थित केला आहे. जिथे मुस्लिमबहुल देशात अशी मशिदीवर लाऊडस्पीकर लावून बांग देण्याची पद्धत नाही. भारतातच ही पद्धत का? असा सवालही अनुराधा पौडवाल यांनी विचारला आहे.
अजानचे भोंगे बंद करायचे असतील तर लाऊडस्पीकर लावून सार्वजनिक महाआरतीचेही राज्यभरात एकाच वेळी ठिकठिकाणी आयोजन करावे लागेल, तरच हा प्रश्न सोडवावा, असे सरकारला वाटेल आणि यातून हिंदूधर्मीयांवरचा अन्याय कमी होऊ शकेल, हे नक्की!
_अविनाश पाठक