ताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवजन्मभूमीत शिवरायांचे सुवर्ण मंदिर, जगातील सर्वात मोठा पुतळा उभारणार; माजी आमदार सोनवणेंची मोठी घोषणा

जुन्नर | महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचे आराध्य दैवत, ज्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य रयतेसाठी दिले असे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे जन्मस्थान म्हणजे शिवजन्मभूमी जुन्नर (Junnar). याठिकाणी शिवरायांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यात येणार असल्याची सर्वात मोठी घोषणा माजी आमदार तथा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख शरद सोनवणे (Sharad Sonawane) यांनी केली आहे. यासह त्यांनी आणखी काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.

जुन्नर शहरातील किल्ले शिवनेरीपासून 5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गोद्रे गावामध्ये 25 एकर क्षेत्रावर छत्रपती शिवाजी महाराजांचे सोन्याने मढवलेले सुवर्णमंदिर उभारण्यात येणार आहे. याच परिसरामध्ये शिवरायांचा हातात तलवार असलेला जगातील सर्वात उंच 200 फुट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार असून 80 मीटर उंचीचा स्वराज्याचा भगवा ध्वज देखील असणार अशी माहिती यावेळी शरद सोनवणे यांनी दिली. तसेच ही संकल्पना स्वतःची असल्याने इतर कोणावरही आर्थिकभार न टाकण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, मित्र आणि सहकाऱ्यांच्या आग्रहामुळे “श्रीमंत योगी सुवर्ण स्मारक ट्रस्ट” ची स्थापना केली असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनधारी सुवर्ण मंदिर

जुन्नरच्या कुशीत वसलेल्या निसर्गसंपन्न गोद्रे गावामध्ये तयार करण्यात येणारा शिवरायांचा हा मंदिर परिसर खुपच आकर्षक व प्रेरणादायी असणार आहे, यामध्ये शिवाजी महाराजांच्या आचार विचारांवर आधारित ग्रंथालय असणार आहे. छत्रपती महाराजांच्या जिवनावर आधारित चित्रफीत, लघुपट सभागृह असणार आहे, छप्पर नसलेली पायऱ्या आणि पायऱ्यांनी वर खाली जाता येणारी एक गोलाकार जागा म्हणजे बदामी नाट्यगृह, मंदिराच्या चौहूबाजूंनी पाण्याचा प्रवाह व मंदिर परिसराच्या चौहूबाजूंनी शील तटबंदी असणार आहे, संपुर्ण परिसरामध्ये भारतीय प्रजातीची वातावरणाकुलीत आकर्षक वृक्ष असणार आहेत, मंदिराच्या सुरुवातीला भव्य असे महाद्वार असणार आहे.

जनतेसाठी सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

जुन्नर तालुका आणि परिसरातील नागरिकांना काही गंभीर आजारांवर उपचार घेण्यासाठी पुणे किंवा मुंबई सारख्या शहरात लांबचे अंतर पार करून जावे लागते. गावाकाच्या ठिकाणी अशा पद्धतीचे उपचार मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होते. नागरिकांनी चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्या या हेतून माजी आमदार शरद सोनवणे यांच्या संकल्पातून सुसज्ज असे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. हे हॉस्पिटल सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण असणार असून माफक दरात रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याची माहिती शरद सोनवणे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये