ताज्या बातम्यारणधुमाळी

“शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचं नाव बदलून…”, आशिष शेलारांचा खोचक टोला

मुंबई | Ashish Shelar On Uddhav Thackeray – शिवसेना आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्वच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. 3 नोव्हेंबरला होणारी ही पोटनिवडणूक रंगतदार वळणावर चालली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यात ही लढत होणार आहे. भाजप नेते मुरजी पटेल यांनी शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या शक्तीप्रदर्शनात भाजपचे अनेक नेते सामील झाले होते. यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी आशिष शेलार म्हणाले, “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचं नाव बदलून ‘रडकी सेना’ ठेवायला हवं. सत्तेत असताना केंद्र सरकारच्या नावानं रडत होते. आता विरोधी पक्षात असताना न्यायालय, निवडणूक आयोगाच्या नावानं रडत आहेत. बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदे तर उद्धव ठाकरेंबरोबर ‘रडकी शिवसेना’ आहे”, असा खोचक टोला शेलारांनी लगावला आहे.

दरम्यान, अंधेरी निवडणुकीबाबत दीपक केसरकरांनी आपली प्रतिक्रिया दिली. “सहानभुती असती तर ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केला असता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मन मोठं आहे. काँग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत विश्वजीत कदम यांना शिवसेना आणि भाजपने पाठिंबा दिला होता. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यासाठी पुढे यावं लागतं, सर्वांना एकत्र येण्याची विनंती करावी लागते”, असं केसरकर म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये