ताज्या बातम्यादेश - विदेश

चित्त्यांचा मृत्यू होणे चिंताजनक, वातावरणातला बदल कारणीभूत?

परदेशातून भारतात आणलेल्या चित्त्यांच्या मृत्यूमागील कारणांमध्ये, येथील हवामानाचा परिणाम झाला असण्याची शक्यताही असू शकते.

सध्याच्या परिस्थितीत भारतातीलच नाही तर संपूर्ण जगातील हवामानात दिवसेंदिवस आमूलाग्र बदल होत आहेत व याचा परिणाम पर्यावरणावर होऊन पृथ्वीतलावरील संपूर्ण जीवसृष्टीवर विपरित परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत आपण विदेशातून कोणतेही प्राणी आणले तर त्यांना सर्वप्रथम हवामानाशी सामना करावा लागतो. त्यानंतर जंगलातील वेगवेगळ्या प्राण्यांशी झुंज द्यावी लागते. कारण आपण जे चित्ते (Cheetah) आणले, ते नामिबियातून आणलेले आहेत. म्हणजेच समुद्रापलीकडून चित्ते भारतात आणले. त्यामुळे या चित्त्यांना हवामानाचा धोका राहू शकतो. यासोबतच वन्यप्राण्यांचाही चित्त्यांना धोका असू शकतो, हे नाकारता येत नाही.

देशातील जंगलांमध्ये चित्त्यांपेक्षा हिंसक असे अनेक प्राणी आहेत. त्याचप्रमाणे देशातील जंगलांत विविध प्राणी आहेत व प्रत्येक प्राणी आपापल्या पद्धतीने प्रत्येक प्राण्यांना चांगल्या प्रकारे ओळखतो व त्याच पद्धतीने आपापली बचावात्मक भूमिका व शिकारीची भूमिका प्रत्येक प्राणी चांगल्या प्रकारे जाणतो. अशा परिस्थितीत माझ्या मते विदेशी पाहुण्यांचा (चित्त्यांचा) टिकाव लागणे शक्यच नाही असे मला वाटते. यासंदर्भात अधिक अभ्यास आणि चौकशी होईलच, पण या संपूर्ण परिस्थितीमुळे म्हणजेच हवामान किंवा भारतातील वन्यप्राण्यांच्या आक्रमकतेमुळे आतापर्यंत ८ चित्त्यांचे प्राण गेले असावेत यालासुद्धा नाकारता येत नाही. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी चित्ता प्रकल्पांतर्गत नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून २० चित्ते भारतात आणून त्यांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले. परंतु आतापर्यंत ८ चित्त्यांचा मृत्यू झाल्याने उरलेल्या १२ चित्त्यांच्या जिवालाही धोका होऊ शकतो याला नाकारता येत नाही. असेही होऊ शकते की, कुनोच्या राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांसाठी जागा अपुरी पडत असावी किंवा त्यांना पाहिजे त्या पद्धतीची शिकार उपलब्ध होत नसावी. त्यामुळेसुद्धा त्यांचा मृत्यू होऊ शकतो. आता चित्त्यांच्या मृत्यूचा विषय सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्राची कानउघडणी करून प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालय म्हणते की, हवामान अनुकूल नाही की, आणखी काही अन्य कारणे आहेत? कारण २० चित्त्यांपैकी आठ दगावले आहेत.

गेल्या आठवड्यात दोन चित्त्यांचा मृत्यू झाला. तुम्ही त्यांना अन्य अभयारण्यांमध्ये हलविण्याच्या शक्यतेचा शोध का घेत नाही? तुम्ही त्याला प्रतिष्ठेचा मुद्दा का बनवत आहात? असे अनेक प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केले. भारतातील चित्ते नामशेष झाले ही बाब सत्य आहे. त्याचप्रमाणे देशातील अनेक प्रजातींचे पशु-पक्षीसुद्धा नामशेष झाले आहेत. काही पशुपक्षी शिकाऱ्यांना बळी पडले तर काही बदलत्या हवामानामुळे नामशेष झालेत. हीच परिस्थिती देशातील वृक्षांची आहे.

देशातील जंगल तोडीमुळे अनेक औषधी उपयोगाच्या वनस्पतींचे वृक्ष नामशेष झाले आहेत. हा सर्व प्रकार वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, वाढती लोकसंख्या व बदलत्या हवामानामुळे संपूर्ण निसर्गाचेच संतुलन बिघडले आहे. त्यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊन संपूर्ण जीवसृष्टीवर याचा गंभीर परिणाम होताना आपण पाहातो.वृक्षतोडीमुळे देशासह जगातील जंगलसंपदा हळूहळू कमी होत असल्याने जंगलातील प्राण्यांचे जगणे अत्यंत कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत बाकी राहिलेले विदेशी पाहुणे (चित्ते) कसे काय जगतील याची शंकाच आहे. त्यामुळे सरकारने बाकी असलेल्या चित्त्यांची जातीने काळजी घ्यावी हीच अपेक्षा!

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये