अग्रलेखताज्या बातम्यादेश - विदेशपुणेमहाराष्ट्रसंपादकीयसिटी अपडेट्स

विद्वत्तेचा गौरव, श्रमिकांच्या यातना

पंतप्रधान मोदी यांनी पुणे दौऱ्यात बोलताना पुणेकरांचे केलेले कौतुक हा त्यातल्या त्यात सर्वांना, विशेषत: पुणेकरांना आवडणारा आणि त्यांना दिलासा देणारा, प्रेरणा देणारा घटक होऊ शकला, ही या दौऱ्यातील एक महत्तम उपलब्धी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आजच्या पुणे (Pune) दौऱ्याला दोन परस्परविरोधी भावनांच्या निरीक्षणांमधून नोंदविले गेले. एक तर, पुण्याबद्दल अत्यंत गौरवोद्‌गार काढून पुण्याच्या विद्वत्तेबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. देशाला अभिमान वाटावा अशा पद्धतीचे उद्‌गार देशाच्या पंतप्रधानांनी पुण्याबद्दल काढावे, ही पुण्याच्या प्रकृतीला मानवणारी, किंबहुना सुखावणारी गोष्ट आहे.

प्रगतीच्या दिशेकडे जाणारा वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सुखदायी चित्र रंगविणाऱ्या मेट्रोच्या उद्घाटनाच्या बरोबरीने घराचे स्वप्न पाहणाऱ्यांना हक्काची घरकुले प्रदान करण्याचे कार्यक्रम आज झाले. पुण्याचे आद्य पुढारी असणारे लोकमान्य टिळक यांच्या नावाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार टिळकांची पगडी घालून नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला आणि त्यामुळे विद्वत्तेच्या सर्व मानदंडांवर आजचा हा दौरा कमालीचा यशस्वी झाला. पंतप्रधान म्हणजे या देशाचा राजा आहे आणि राजा जेव्हा घरी येतो तेव्हा दिवाळी-दसरा साजरा झाला पाहिजे. त्यामुळे सामान्य पुणेकरांनी, श्रमिक पुणेकरांनी त्यांचे स्वागत करावे, अशी अपेक्षा होती. परंतु एखाद्या आणीबाणीसारखी पुण्याच्या मध्य भागात लागलेली संचारबंदी, दुसरीकडे मणिपूरसारख्या संवेदनशील विषयावर रस्त्यावर उतरलेला जमाव, काळे झेंडे दाखवत चाललेली आंदोलने आणि त्या आंदोलनाला मिळालेला मोठा प्रतिसाद हे सर्व पाहता नरेंद्र मोदी यांचा दौरा हा एका डोळ्यात अासू, तर दुसऱ्या डोळ्यात हसू अशा पद्धतीचा झाल्याचे दिसले.

पंतप्रधानांच्या या दौऱ्याने अनेक अजेंड्यांना गती देण्याचा प्रयत्न केला. एक तर, सार्वजनिक वाहतूक ही आरामदायी व्हावी हे खरोखरच पुणेकरांचे एक मोठे स्वप्न आहे किंबहुना एका प्रगतीशील देशाचे ते लक्षण आहे. या दृष्टिकोनातून ही वाहतूक आणि बहुप्रतिक्षित मेट्रोचे टप्पे सुरू करण्यामुळे हा दौरा अत्यंत गाजला. महानगरपालिका आणि लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे मनोमिलन दिसावे, यानिमित्ताने एकीचा संदेश द्यावा आणि पुण्याच्या प्रगतीसाठी भारतीय जनता पक्ष कसा कटिबद्ध आहे आणि प्रयत्नशील आहे याचे यथार्थ दर्शन घडावे, त्याचे खूप मोठे सादरीकरण व्हावे, हा मोदी यांच्या दौऱ्या पाठीमागील भावार्थ बऱ्यापैकी यशस्वी झाला.

तसेच शरद पवार यांना त्याच व्यासपीठावर आणत एक मास्टर स्ट्रोक देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. महाविकास आघाडी खिळखिळी केली तरच भारतीय जनता पक्षाला मोठे यश हाती लागू शकते, हे मर्म भाजपने पूर्वीच ओळखले आहे. त्यामधूनच अजित पवार यांना सत्तेत सहभागी करून घेतले गेले, परंतु अजूनही त्यांचे समाधान झाले नाही. शरद पवार यांच्यासोबत व्यासपीठ गाजवल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू होईल, हे स्वाभाविक होते. त्याप्रमाणे त्याची प्रचिती कालपासून येऊ लागली आणि हाच मास्टर स्ट्रोक होता. अशा अनेक आघाड्यांवर आजचा दौरा पार पडला.

अपेक्षेप्रमाणे फार काही या कार्यक्रमांना राजकीय स्वरूप आले नाही, परंतु एक विकासात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने झाला. नंतर पुण्यातील उद्योजकांसोबतच्या बैठकीमध्येदेखील उद्योजकीय वर्तुळाचा मोदी-शहांच्या पार्टीला पाठिंबा मिळावा, यासाठीदेखील व्यवस्थित साखरपेरणी झाली. हे सगळे होत असताना बाबा आढाव यांच्यासह अनेक श्रमिकांच्या आणि सामान्य नागरिकांच्या रस्त्यावरच्या वेदना तितक्याच जोराने ऐकू आल्या. यापूर्वी जेव्हा दौरा झाला होता, त्या वेळेसही या वेदना होत्या, परंतु त्या इतक्या मोठ्या आवाजामध्ये ऐकू आल्या नव्हत्या. किंबहुना, त्या दाबल्या गेल्या होत्या. मागच्या वेळेप्रमाणे यावेळचा मोदी यांचा दौरा हा सब कुछ मोदी असा नव्हता. कुठेतरी मोदीमय पर्व झाकोळते आहे, किंबहुना त्याची सिद्धता आम्ही करीत आहोत, अशी विरोधी पक्षांची तयारी दिसून आली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये