फडणवीसांची अजित पवारांवर जाहीर नाराजी; मलिक प्रकरणावरुन लिहिलं पत्र, ”सत्ता येते-जाते, पण…”
नागपूर : (Devendra Fadnavis On Ajit Pawar) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना एक पत्र लिहून नवाब मलिक यांच्याबाबत नाराजी बोलून दाखवली आहे. सत्ता येते जाते परंतु मलिकांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही, अशी भूमिका फडणवीसांनी घेतली आहे.
गुरुवारी सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर सर्वात शेवटी बसले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर नवाब मलिक यांनी कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नव्हता. त्यांनी तटस्थ भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर मलिक जामीनावर बाहेर आल्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. मात्र आता नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट झाले आहे, त्यामुळे अजित पवार गटाची गोची झाल्याचे पाहायला मिळत आहे.
फडणवीस काय म्हणाले होते?
सभागृहामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मलिकांवरुन प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर फडणवीस म्हणाले, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की, ज्यांच्या नेत्यांनी प्रत्यक्ष जेलमध्ये असताना देखील आम्ही मंत्रीपदावरून काढणार नाही, ते आता इथे भूमिका मांडत आहेत.
आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलेलो नाहीत. मी आणि मुख्यमंत्री मांडीला मांडी लावून बसलो आहोत. आमच्या बाजूला अजितदादा मांडीला मांडी लावून बसले आहेत, त्यांच्या बाजूला भुजबळ साहेब बसले आहेत. त्यामुळे आमची काळजी करू नका. पहिल्यांदा तुम्हाला हे उत्तर द्यावं लागेल की, देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर ते जेलमध्ये असताना तुम्ही त्यांना मंत्रीपदावरून का काढलं नाही? त्यानंतर सभागृहात गोंधळ झाल्याचे पाहायला मिळालं. आता फडणवीसांनी थेट अजित पवार यांना पत्र पाठवून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.