साताऱ्यात ‘न भूतो न भविष्यते’असा रामोत्सव जल्लोषात संपन्न
कराड : (Ramotsav karad) अयोध्येतील अद्वितीय अशा नव्याने उभारलेल्या राम मंदिरात प्रभू रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने अवघ्या सातारा जिल्ह्यात एकच जल्लोष अन् महादिवाळी साजरी झाली.
विद्युत रोषणाई व फुलांच्या माळांची सजावट, परिसरात उजळणारे दिवे अशी सजलेली मंदिरे, भगवे ध्वज, झेंडे, श्री रामाचे भव्य कटाआउट, सुरेख रांगोळ्यांचा सडा यांनी सजलेले रस्ते व चौकात मोठ्या पडद्यावर अयोध्यापतीच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा अनुभवताना गोडाचे वाटप, जयघोष, पूजाअर्चा आणि दीपोत्सव असा आनंदसोहळा साजरा होत होता. ध्वनीक्षेपकावरील अयोध्या सोहळ्याच्या गीतांनी संपूर्ण दिवस दुमदुमून गेला होता.
मंदिरा-मंदिरांमध्ये श्रीरामरक्षा, मंत्रपठन, भजन, कीर्तन, महाआरती, प्रसादाचे वाटप असे असंख्य कार्यक्रम एकाचवेळी संपन्न होत होते. त्यामुळे एकंदरच भगवे राममय आणि चैतन्याचे वातावरण राहिले होते. पारंपारिक तसेच सांस्कृतिक पोशाखात हजारो रामभक्त सार्वजनिक ठिकाणी रामोत्सव पार पडताना दिसत होते. चौकाचोकात मोतीचूर लाडू वाटपाचा स्थानिक मंडळांचा उपक्रम रामोत्सवाला आणखी गोडवा देणारा होता.
श्री रामाची मंदिरे असलेल्या सज्जनगड, चाफळ, गोंदवले, रहिमतपूर, सातारा, फलटण, पाटण आदी ठिकाणी मंदिर समित्यांनी पूजेअर्चेसह कार्यक्रमांचे भव्यदिव्य आयोजन केले होते. श्री रामाचे दर्शन घेण्यासाठी दर्शनरांगा लागल्या होत्या. स्थानिक आमदार, खासदार आदी लोकप्रतिनिधीही रामभक्तांच्या खांद्याला खांदा लावून या उत्सवात उतरल्याने हा राष्ट्रीय महाउत्सव ‘न भूतो न भविष्यते’ असाच साजरा होत होता. रात्री उशिरापर्यंत महाआरती, मंत्रपठण, प्रसाद वाटप असे एक ना अनेक कार्यक्रम सुरूच राहणार आहे. अगदी वाड्यावास्त्यांवर अन् झोपडीतही हा उत्सव साजरा झाला.