शेंबड्या म्हणून चिडवल्यामुळे अल्पवयीन मुलानं चिमुकलीची केली हत्या, मुलाचा गुन्हा लपवण्यासाठी वडीलांनी केलं ‘हे’ कृत्य
वसई | Vasai Virar Crime News : वसई विरारमध्ये (Vasai-Virar) एक धक्कादायक घटना घडली आहे. शेंबड्या म्हणून चिडवल्यामुळे एका अल्पवयीनं मुलानं शेजारी राहणाऱ्या आठ वर्षांच्या चिमुकलीची हत्या केली आहे. त्यामुळे वसईमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यात धक्कादायक बाब म्हणजे आरोपी मुलाचा गुन्हा त्याच्या वडिलांना माहिती असूनही त्यांनी ही माहिती सर्वांपासून लपवली होती. तर सध्या आरोपी मुलगा फरार असून त्याच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
पेल्हार पोलिसांनी केलेल्या तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. 4 डिसेंबरला वसई फाटा येथे 8 वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह एका बंद घरातील मोरीत आढळून आला. त्यावेळी मृत चिमुकलीचे पाय हे नायलॉनच्या बेल्टने बांधलेल्या स्थितीत होते.
मृत चिमुकली ही जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीत शिकत होती. ती 1 डिसेंबर रोजी सायंकाळी घराजवळ असलेल्या दुकानात आईस्क्रिम आणण्यासाठी गेली होती. त्यानंतर ती अचानक गायब झाली. त्यामुळे तिच्या घरच्यांनी पेल्हार पोलीस स्थानकात मिसिंग तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात हा धक्कादाक प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुकलीचा मृतदेह सापडल्यानंतर त्याच परिसरातील एक अल्पवयीन मुलगा गायब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी मुलाच्या वडिलांजवळ चौकशी केली असता हत्येचा उलगडा झाला. मृत चिमुकली शेजारी राहणाऱ्या मुलाला शेंबड्या म्हणून चिडवत होती. या रागात त्या मुलानं तिची गळा दाबून हत्या केली असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं. तसंच वडीलांनी ही घटना लपवण्यासाठी चिमुकलीचा मृतदेह एका बंद खोलीमध्ये ठेवून ते त्याची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत होते. तर आता पोलिसांनी आरोपी मुलाच्या वडिलांना अटक केली असून आरोपी मुलगा जालन्यात सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.