ताज्या बातम्यारणधुमाळी

अखेर भाजपची माघार! राज ठाकरेंच्या पत्राला यश, ऋतुजा लटकेंचा विधानसभेचा मार्ग मोकळा

मुंबई | Andheri East Bypoll – शिवसेना आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्वच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली. तर शिंदे गट-भाजपकडून मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीवरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरु होता. मात्र आता भाजपने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपने मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रामुळे वळण मिळालं. अखेर ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला असून यासंदर्भातली माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला ही निवडणूक न लढण्याचं आवाहन केलं होतं. त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलं होतं. राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) या भूमिकेवर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखाप्रमुख पदापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी आमदार होण्याने रमेश लटके यांच्या आत्म्यास खरोखरीच शांती मिळेल. यामुळेच भाजपने ही निवडणूक लढवू नये व त्यांच्या पत्नी निवडून येतील असं पाहावं, असं राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं होतं.

दरम्यान, राज ठाकरेंच्या पत्रानंतर फडणवीसांनी सर्वांची मतं लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं होतं. यानंतर भाजप नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या होत्या. रविवारी रात्री फडणवीसांच्या घरी पार पडलेल्या या बैठकीमध्ये आशिष शेलार, अंधेरी पोटनिवडणुकीतील उमेदवार मुरजी पटेल यांच्यासहीत अनेक नेते उपस्थित होते. भाजपचं स्थानिक नेतृत्व ही जागा लढवण्यासाठी तयार असल्याचं आशिष शेलार आणि मुरजी पटेल यांनी फडणवीस यांना कळवलं होतं. यानंतर सकाळीही देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मेघदूत’ बंगल्यावर भाजप नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणूक अर्ज घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये