ताज्या बातम्यारणधुमाळी

भाजपने घेतलेल्या माघारीनंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “माझे पती…”

मुंबई | Rutuja Latke – शिवसेना आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्वच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली. तर शिंदे गट-भाजपकडून मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीवरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरु होता. मात्र आता भाजपने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपने मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लिहिलेल्या पत्रामुळे वळण मिळालं. अखेर ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला असून यासंदर्भात आता ऋतुजा लटके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी ऋतुजा लटके म्हणाल्या, “मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानते. सर्व पक्षातील जे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडून जी पत्र गेली. तसंच माझे पती रमेश लटके यांच्या कामाबद्दल आणि त्यांचं प्रत्येकाशी असलेलं सहकार्याचं नातं. प्रत्येकजण म्हणत होतं की ते माझे सहकारी होते. माझ्या बरोबर होते. त्या कामाची पावती आणि त्यांच्याबरोबर असलेल्या संबंधामुळे आज मला या सगळ्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे. त्यामुळे प्रत्येकाचे मी आभार मानते.”

दरम्यान, राज ठाकरेंच्या पत्रानंतर फडणवीसांनी सर्वांची मतं लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं होतं. यानंतर भाजप नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या होत्या. रविवारी रात्री फडणवीसांच्या घरी पार पडलेल्या या बैठकीमध्ये आशिष शेलार, अंधेरी पोटनिवडणुकीतील उमेदवार मुरजी पटेल यांच्यासहीत अनेक नेते उपस्थित होते. भाजपचं स्थानिक नेतृत्व ही जागा लढवण्यासाठी तयार असल्याचं आशिष शेलार आणि मुरजी पटेल यांनी फडणवीस यांना कळवलं होतं. यानंतर सकाळीही देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मेघदूत’ बंगल्यावर भाजप नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणूक अर्ज घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये