पुणेसंडे फिचरसंडे मॅटिनी

पुण्यातले पूल हे असून अडचण नसून खोळंबा

तसा विचार केला तर या चांदणी चौक पुलाचे आयुष्य जेमतेम २०-२२ वर्षे. जेव्हा देहूरोड-कात्रज बाय पास केला तेव्हा याचा जन्म झाला. राजकारण्यांच्या बुद्धी-मर्यादेचे प्रतिक म्हणून या पुलाकडे बघता येईल. साधारण पुणे शहर पुणे-मुंबई जलदगती मार्गाला पटकन जोडले जावे म्हणून या बायपासची निर्मिती झाली. मुळातच ३+३ पदरी रस्यावर २+२ लेनचा पूल बांधणे म्हणजे बॉटलनेक तयार करणे. रस्ता आणि पूल भविष्याचा विचार करून बांधला असता तर हा पूल पाडण्याची वेळच आली नसती. नुकताच पाडून पुन्हा बांधलेला सुस-पाषाण जोडणारा पूल हे दुसरे उदाहरण. या देहूरोड बायपासचे काम वर्षानुवर्षे चालू आहे. हिंजवडीत सॉफ्टवेअर पार्क झाले की इथली वाहतूक वाढणार हे माहित असून वाकड येथे बांधलेला चुकीचा पूल, स्थानिक राजकारण्यांनी घातलेल्या कायदेशीर कोलदंड्यांमुळे बावधन, HEMRL, बाणेर, सुस इथले पूल बांधायला लागलेला आकारण वेळ. यामुळे हा बायपास कायम अनियंत्रित ट्राफिक जामचाच राहिला आहे.

पुण्यात अशा अनेक जागा आहेत ज्या राजकारण्याच्या बुद्धीमांध्यतेचे प्रतिक आहेत. पूल हे शहराचे असेट्स असतात आणि खर्चिक देखील असतात. पण हे बांधताना त्याचा विनियोग रहदारी जास्तीत जास्त कशी सुकर होईल हे बघणे गरजेचे. बऱ्याचदा थोडा जास्त खर्च करून ट्राफिक अधिक सुकर होईल असे बघता येईल. पुण्यात चिंधीगिरी करून अनेक पूल बांधलेले दिसतात. अगदी अलीकडचे उदाहरण घेऊ. नळस्टॉपचा डबल डेकर ब्रिज. पुणेकरांच्या अभिमानात भर घालणार असा पूल. पुणेकरांनी वापरला आणि त्यांचा भ्रमनिरास झाला. दोन्ही बाजूने काटकसर केलेली दिसते. एयएनडीटी समोर पुलावरून कोथरूड कडे जाणारे आणि पुला खालून पौडरोडकडे जाणाऱ्यांचे क्रॉस होईल याचा विचारच केला गेला नाही. जेव्हा अशी परिस्थिती येते तेंव्हा काही क्रॉसिंग मार्जिन ठेवले जाते. जिथे क्रॉसिंग करण्याची शक्यता असते तिथे साधारण १ किमी वाहने एकत्र समांतर जात थोडा वेगाला आवर घालून एकमेकांना सांभाळून घेत क्रॉस करतात.

इथे तो मार्जिन मिळणे शक्य नव्हते. ती उणीव पुलाच्या वेगळ्या डिझाईनने भरून काढता आली असती. आता नळस्टॉपचा गोंधळ ४०० फूट पुढे ढकलला आहे. हा पूल एका छोट्या जागेत वाहने अक्षरशः ओततो. बाकी काही नाही. काही दिवसांनी SNDT समोर सिग्नल बसवून जुजबी मलमपट्टी केली जाईल आणि कोथरूडकरांचे आणि पौडरोडवासीयांचे नशीब फुटकेच राहील. तीच गोष्ट कलमाडी शाळेच्या चौकात. पूल चौका अलीकडे उतरवण्यापेक्षा चौकापुढे उतरवला असता तर थोडे बजेट वाढले असते. चौक आणि सिग्नल टळला असता. ३-४ पिलर वाढले असते. एक तर हा दुमजली पूल करणे ही पश्चात बुद्धी होती.
कोविड काळात पाडलेला युनिव्हर्सिटी चौकातला पूल हे असेच क्षीण विचारसरणीचे उदाहरण. पूल बांधल्यापासून जेमतेम १५ वर्षात तो पाडावा लागला. एकंदर पुण्यातले पूल हे असून अडचण नसून खोळंबा असे आहेत.

-श्रीकांत कुलकर्णी

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये