लेखसंडे फिचरसंडे मॅटिनी

श्रीमद ्भागवताचे अलौकिकत्व

ह. भ. प. भगवताचार्य बाळासाहेब बडवे लिखित श्रीमदभागवत कथासागर ग्रंथावर पुणे येथे आयोजित परिसंवादाच्या निमित्ताने…

मराठी सारस्वतात श्रीमद्भागवतावर बरेच लिखाण उपलब्ध आहे. दिवसेंदिवस त्यात भरही पडत आहे. भागवतावर आणि भगवद्गीतेवर मराठीत प्रथम लिहिते झाले संतशिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली. विचारवंतांनी आणि संतांनी आपापल्या लेखणीतून अन्‌ अभंगातून श्रीमद्भागवत हा ग्रंथ सोपा करून सांगण्याचा उत्तम प्रयत्न केल्याचे दिसून येते. त्यांनी आपल्या लेखणीतून भागवत कथासार सांगून लोकजागृतीचे महान कार्य केलेले आहे. संतश्रेष्ठ श्री एकनाथमहाराजांनी पैठण येथे राहून एकनाथी भागवत हा ओवीबद्ध ग्रंथ रचलेला आहे. महाराष्ट्रातील खेडोपाडी सप्ताह आयोजित करून श्रीमद्भागवतावर कथा-कीर्तन व प्रवचन होताना दिसून येत आहे. या ग्रंथाच्या लिखाणाचा ऐतिहासिक क्रमच लावायचा ठरवला, तर हभप बाळासाहेब बडवे यांच्या लेखनाचा क्रम निश्चितपणे तिसरा लागेल. यात शंका नसावी. श्री संत ज्ञानदेव आणि श्री एकनाथांनंतर इतक्या तार्किकदृष्ट्या शुद्ध विचारांची मांडणी रसाळ अन् ओघवत्या भाषेत झाल्याचे दिसून येत नाही. असे बोलणे अतिशयोक्तीचे खचितच होणार नाही. श्रीमद्भागवत कथासार या ग्रंथाचे कर्ते हे परंपरेने पांडुरंगाचे तेही पंढरपूरचे बडवे आहेत. ह.भ.प. (कै.) भगवानबुवा पंढरीनाथ बडवे आणि श्रीमती यमुनाबाई बडवे यांच्या पोटी त्यांचा जन्म पंढरपूर येथेच झालेला. त्यांना गुरू लाभले ते ह.भ.प. वे. शा. सं. बाळासाहेब हरिदासमहाराज. त्यांच्याकडे राहून त्यांनी अध्यात्माचे पाठ गिरवले.

लेखक – ह. भ. प. भागवताचार्य बाळासाहेब बडवे
 प्रकाशन – मल्टिव्हर्सिटी
प्रकाशन, पुणे
 पृष्ठे – ५००

 किंमत – ४०० रुपये

आज पेशाने ते पत्रकार आहेत. राजकीय व सामाजिक वार्तापत्रे लिहिण्यात त्यांचा हात कोणीच धरू शकणार नाही. राजकीय विश्लेषण करण्याचा, राजकारण्यांच्या वर्मावर आणि मर्मावर अचूक बोट ठेवून त्यांना ठिकाणावर आणण्यात त्यांची लेखणी अग्रेसर आहे. या अन् अशा सामाजिक व राजकीय पत्रकारितेतून आलेल्या अनुभवातून, झालेल्या अध्यात्म ज्ञानप्राप्तीतून पाहिलेल्या सामाजिक जाणिवेतून त्यांना हा श्रीमद्भागवत कथासार ग्रंथ लिहिण्याची स्फूर्ती मिळाली. या कामी ऊर्जा मात्र त्यांच्या सौभाग्यवती रुक्मिणी बाळासाहेब बडवे यांनी दिल्याचे ते कबूल करतात. या ग्रंथामागची आणखी एक प्रेरणा असावी ती म्हणजे,
‘बुडती हे जन पहावेना डोळा।
म्हणूनी कळवळा येतसे॥’

सामान्य जनांप्रति त्यांची असलेली बांधिलकी त्यांच्या लिखाणात जागोजागी प्रत्ययास येते. हा समाज मदिरेच्या घोटीमागे, मांसाच्या बोटीपाठी अन् बाईच्या ओठीसाठी धावणारा बनला आहे. याला सुसंस्काराची शिदोरी मिळायला हवी, ही तळमळ या लिखाणामागे आहे. ते करत असलेली पत्रकारिता हीदेखील हा समाज सुसंस्कारित व्हावा याचसाठी आहे. त्यांची लेखणी ही सच्ची, खरीखुरी आणि प्रामाणिकपणे लोकहितार्थ झटत आहे. त्यांनी लिहिलेला हा ग्रंथ घ्या, त्यांचे अग्रलेख वा इतर लिखाण घ्या, त्यातून हाच प्रत्यय आल्यावाचून राहत नाही. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे कोणालाही आपलेसे करून घेणारे आहे. त्यांच्या मनात एकच छंद अन् एकच ध्यास, हा समाज सुसंस्कारित व्हायला हवा. यासाठी त्यांनी आपली संपत्ती पणाला लावून दोन वर्तमानपत्रे सुरू केली आहेत. एक पुणे येथून, तर दुसरे पंढरपूरहून. निर्भीडपणाने, नि:पक्षपातीपणाने वर्तमानपत्र चालविणे हे अत्यंत कठीण काम; परंतु त्यांनी हा वसा टाकलेला नाही.

त्यांचा शुद्ध सात्त्विक स्वभाव, निर्भीड व स्वतंत्र पत्रकारिता इथल्या भल्याभल्यांना घाम फोडायला लावते. इथले भ्रष्ट राज्यकर्ते तसेच शासकीय नोकर त्यांना टरकून राहतात. त्यांच्यावर पत्रकार म्हणून एक वेगळाच धाक बसवते. प्रत्येक नगरात, हरेक शहरात, तसेच खेड्यापाड्यांत काही मोजकी हुशार, विद्वान व सज्जन मंडळी वास्तव्यास आहेत, याची चांगलीच जाण त्यांना आहे. पंढरपुरी पत्रकारजगतात व ह.भ.प. लोकांमध्ये त्यांचा क्रम अतिशय वरचा आहे हे येथे नमूद करावेसे वाटते. मध्यंतरी कोणा एका अधिकार्‍याने पांडुरंगाच्या मंदिरात होणारे कथा-कीर्तन आणि भजन-प्रवचन बंद केले. बाळासाहेबांनी केवळ एकच बातमी दिली अन् चमत्कार झाला. २४ तासांच्या आत या बातमीच्या धसक्याने शासनाने हा निर्णय मागे घेतला व संबंधित अधिकार्‍याकडचे देवस्थानचे काम काढून घेतले. त्यांनी रचलेल्या या श्रीमद्भागवत या ग्रंथात काही नाही असे नाही.

वास्तविक हा ग्रंथ हिंदूधर्मीयांचा एक प्रमुख धर्मग्रंथ. हिंदू धर्मातील सार सांगून असार बाजूला फेकणारा कथाकथनाच्या माध्यमातून आपल्या उज्ज्वल परंपरेचा अन् संस्कृतीचा वारसा जपणारा व ओळख करून देणारा एकमेव ग्रंथ. नाही म्हणायला सामान्यजनांना तो थोडासा किचकट वाटणारा; तो सोपा करून सांगण्यासाठी या भागवताचार्यांनी आपली लेखणी अत्यंत मधाळ आणि रसाळ बनवली आहे. ज्ञानाचे महत्त्व बिल्कूल कमी न करता ते म्हणतात, ‘ज्ञान श्रेष्ठ का संस्कार श्रेष्ठ? धर्म भावनेने विचार केला, तर निश्चितच संस्कार श्रेष्ठ आहे. संस्कार हा सुसंस्कृत समाजाचा आधार आहे. संस्काराची श्रेष्ठता पटावी म्हणून त्यांनी अनेक उदाहरणे आपल्या ग्रंथात पेरली आहेत. हा ग्रंथ म्हणजे अध्यात्माचे एक शास्त्र आहे. हा ग्रंथ मोक्षाची वाट दाखवणारा एक वाटाड्या आहे. मूळ ग्रंथ ही व्यासवाणी. त्यांच्या वाणीचे व चरित्राचे हे एक भाष्य आहे. त्यांनी हिंदूंचे श्रद्धास्थान दशावतार यावर अतिशय चपखल भाष्य केले आहे अन् दशावतारांचे कार्य सांगितले आहे. ब्रह्म एक आहे. त्याचा हा दृश्य पसारा अन् ते अभिन्न नाहीत. ईश्वर एकच आहे. विद्वान मात्र त्याला वेगवेगळ्या नावाने संबोधतात हा उपनिषदाचा संदेश ते वाचकांस देऊन जातात. कृष्णचरित्रावर तर हा ग्रंथ अन् त्याचा डोलारा उभा आहे. स्वतः कृष्णभक्त असल्याने त्यांनी श्रीकृष्णाच्या गोपालनापासून ते कुरुक्षेत्रावर कथन केलेल्या श्रीमद्भगवत्गीतेवर भाष्य केले आहे.

शास्त्रात कथन केलेली पाच वैराग्ये १) त्रास वैराग्य २) मैथून वैराग्य ३) स्मशान वैराग्य ४) प्रसूती वैराग्य आणि ५) शुद्ध वैराग्य यांचे ते वर्णन करतात. अर्जुनाचे ठायी शुद्ध वैराग्य आणण्यासाठी भगवंतांनी गीता सांगितली आहे. महाभारतात कर्ण आणि श्रीकृष्ण संवाद पेरून सामान्य जनांना खराखुरा दुःखमुक्तीचा मार्ग दाखविला आहे. भगवान श्रीकृष्ण कर्णाला दोघांच्याही जन्माची व जगण्याची वास्तविकता सांगतात. दोघांत तुलना करून दुःखी कोण असा प्रश्न त्याला विचारतात. संतांनी सांगितले आहे, शेवटी आपल्याला साडेतीन हात जमीन लागते. वामन आणि बळीराजा यांच्या कथेतून हेच सांगण्याचा प्रयत्न तर नाही ना? ‘हे बळी, तू किती वैभवशाली, किती मोठा विष्णूभक्त, किती थोर पराक्रमी; परंतु तुझा शूरपणा, दानशूरपणा न् तुझी थोरवी ही तीन पावलांइतकीच आहे. राम अवताराची कथा सांगताना ते रामाची थोरवी, त्यांचा संयमित बाणा, त्यांचा मर्यादा पुरुषोत्तमपणा, दुःखात सुख मानण्याची त्यांची वृत्ती त्यात कथन केलेली आहे. भरताचे अन् रामाचे प्रेम, भरताचे शुद्ध वैराग्य, लक्ष्मणासारख्या बंधूचा कष्टाळूपणा, बंधुप्रेमाचे श्रेष्ठत्व अन् त्यामुळे आलेला हट्टीपणा यात आलेला आहे. रात्री झोपताना उद्याच्या राज्याभिषेकाची सुखद स्वप्ने पाहणारा राम तितक्याच अलिप्तपणे राजवस्त्रे व राजाची आभूषणे दान करून, सिंहासनाचा त्याग करून वल्कले परिधान करून दंडकारण्याचा रस्ता धरतो.

पितृआज्ञेपुढे त्याचे मन थोडेही विचलित होत नाही. कोणाविषयीही त्याच्या मनात कटुता नाही.
दिले दुःख ते सुख मानीत जावे।
सुखालागी अरण्य सेवीत जावे॥

हा संत रामदासांनी मनाच्या श्लोकात दिलेला उपदेश तो अंगीकारत आहे. रामचरित्र सांगून त्यांनी रामाच्या नावावर राजकारण करणार्‍या राज्यकर्त्यांना मोठीच चपराक दिली आहे. सारा ग्रंथच मुळातून वाचण्यासारखा झालेला आहे. भागवताचार्य बाळासाहेब बडवे साहेबांना या परिसंवादाच्या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा तर आहेतच. त्यांच्या लेखणीला बळ प्राप्त व्हावे, त्यांना चांगले आरोग्य मिळावे या शुभेच्छा दिल्याशिवाय राहवत नाही.

शब्दांकन- शहाजीराव बलवंत (ज्येष्ठ साहित्यिक)

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये