राष्ट्रसंचार कनेक्टसंडे मॅटिनी

बाजारात तयारी जल्लोष पर्वाची!

दहीहंडी, गणपती, नवरात्री, दसरा यांसारखे सण धूमधडाक्यात साजरे करून समाजाने चैतन्याचे झरे वाहते झाल्याचं अलीकडेच सूचित केलं. त्यामुळे यंदाची दिवाळी मागील दोन वर्षांचं उणेपण दूर करून क्रयशक्ती प्रोत्साहित करणारी असल्याचं आश्‍वासक चित्र दिसत आहे. बाजारात या चित्राचं प्रतिबिंब दिसत आहे. सर्व वस्तूंच्या बाजारातलं उल्हसित वातावरण, ग्राहकांना होणारा लाभ ही परिस्थिती दिवाळी अधिक तेजोमय करेल यात शंका नाही. कोरोनावर विजय मिळवण्याची प्रदीर्घ लढाई संपवून नव्या उमेदीने कार्यरत झालेला देश स्थिरावलेल्या आणि विकासाभिमुख अर्थव्यवस्थेचा शुभसंकेत स्वीकारत आता सावरत आहे. मागील दोन वर्षांच्या कटु स्मृतींना वळसा घेत पुढे चाल घेत आहे. स्थिरावलेला बाजार, स्थिर केंद्र सरकार, राज्यात नाट्यपूर्ण घडामोडींनंतर स्थापन झालेलं नवं सरकार, वाढता रोजगार, उत्तम पाऊसकाळ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नैराश्यातून बाहेर पडत मोठी झेप घेण्याची सार्वत्रिक मानसिकता यामुळे आता प्रकाशाला आडकाठी उरलेली नाही. सर्व वस्तूंच्या बाजारातलं उल्हसित वातावरण, नानविध वस्तूंची मुबलक उपलब्धता, भरघोस सवलतींनिशी ग्राहकांना आकर्षित करणारा ऑनलाईन बाजार आणि विविध ब्रँड्समधील स्पर्धात्मक वातावरणाचा ग्राहकांना होणारा लाभ ही परिस्थिती दिवाळी अधिक तेजोमय करेल यात शंका नाही. म्हणूनच या बहरलेल्या बाजारात एक फेरफटका मारायलाच हवा.

ई-कॉमर्स कंपन्यांच्या सर्वेक्षणानुसार या सणपर्वामध्ये त्यांची विक्री ११.८ बिलियन डॉलरच्या स्तरावर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते, ५८ टक्के शहरी ग्राहकांनी खरेदीचं नियोजन सुरू केलं आहे. त्यातले ३९ टक्के लोक ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देत आहेत. याच सर्वेक्षणानुसार दिवाळीच्या निमित्ताने दहामधले सहा लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारची खरेदी करु इच्छितात. आश्‍चर्य म्हणजे यंदा महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये खरेदीची अधिक प्रतीक्षा आणि त्याकडे अधिक ओढ बघायला मिळत आहे. ६२ टक्के पुरुषांनी, तर ५५ टक्के महिलांनी खरेदीचं नियोजन केलं असल्याचं स्पष्ट केलं. ऑनलाइन खरेदीला मिळणारा प्रचंड प्रतिसाद हे यंदाच्या दिवाळीचं वैशिष्ट्य ठरावं. प्रत्येक पाचमध्ये दोन व्यक्ती ई-कॉमर्स कंपन्यांकडून दिल्या जाणार्‍या सवलतींचा लाभ घेत खरेदी करणार असल्याचं स्पष्ट होतंय. दिवाळीनंतर लगेचच लग्नसराईला सुरूवात होते. त्यामुळे खरेदीचा हाच ट्रेंड पुढेही सुरू राहण्याची दाट शक्यता आहे. सन २०१८ च्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत दुप्पट विक्री होण्याचा अंदाज ऑनलाईन कंपन्या व्यक्त करत आहेत. पहिल्या आठवड्यामध्ये ही विक्री ५.९ बिलियन डॉलर इतकी वाढली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत २८ टक्के अधिक आहे. या वर्षाच्या फॅशन श्रेणीमध्येही ऑनलाइन विक्रीत वाढ होण्याचा अंदाज असून टियर-२ शहरांमध्ये खास करुन हा ट्रेंड पाहायला मिळू शकतो.

त्यामुळेच यंदा ऑनलाइन दुकानदारांची संख्या तब्बल चारपट वाढल्याचं दिसून येत आहे. भारतातले ग्राहक सणासुदीच्या विक्रीदरम्यान मासिक पगाराच्या जवळपास २५ टक्के रक्कम खर्च करू इच्छितात. खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक ऑफर देण्यास सुरूवात झाली असून नव्याने बाजारात उतरवलेली उत्पादनं तब्बल ४१ टक्के सवलत देऊन विकली जात आहेत. त्याचबरोबर ‘शॉप नाऊ, पे लेटर’च्या योजनाही ग्राहकांना भुरळ घालत आहेत. शून्य टक्के व्याजाने दिल्या जाणार्‍या इएमआयच्या योजनांमुळे ग्राहकांचे मोठ्या खरेदीचे बेत प्रत्यक्षात उतरण्यास मदत होत आहे. म्हणजेच या सणासुदीच्या विक्रीला चालना देणार्‍या दोन प्रबळ ग्राहक गटांमध्ये मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन विक्री वाढवणारे जागरूक ग्राहक तर विशिष्ट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर प्रीमिअम ऑफरसाठी थोडी वाट पाहून खरेदी करण्यात गुंतलेले ‘मोबाइल ग्राहक’ यांचा समावेश आहे, असंही आपण म्हणू शकतो. ग्राहकांची ही वाढलेली सकारात्मक भावना किरकोळ विक्रेत्यांसाठीही चांगली आहे. त्यामुळे कोविडमुळे झालेल्या नुकसानातून पुनर्प्राप्तीचा संभाव्य मार्ग मिळण्यास मोठी मदत मिळणार आहे. ही नक्कीच चांगली बातमी म्हणावी लागेल. डिजिटल मार्केटिंग खर्चात सरासरी ८२ टक्के वाढ झाली आहे. हा खर्च सामान्यतः ऑक्टोबरच्या सुरूवातीला शिखरावर पोहोचतो आणि दिवाळीच्या संपूर्ण उत्सवपर्वात सुरू राहतो.

सतत मागणी आणि वाढलेली बास्केट व्हॅल्यू हे मुद्देही क्रयशक्तीवर परिणाम करतात. दिवाळीमध्ये कंपन्या सर्वोत्तम डील देऊन ग्राहकांची खरेदीची सततची भूक आणखी प्रज्वलित करतात. मोठ्या ब्रँड्सच्या वस्तू खरेदी करणार्‍यांची संख्याही वाढत आहे. विशेषत: व्हाउचर, कॅश बॅक, एकावर एक फ्री यांसारख्या सवलतीच्या शोधात असणार्‍या ग्राहकांच्या अपेक्षा वाढतात आणि ते अधिक चांगलं डील मिळवण्याचा प्रयत्न करतात. अलीकडे प्रदर्शन आणि दृश्यमानता हे वाढत्या खरेदीला कारणीभूत ठरणारे मुद्दे ठरत आहेत. मागच्या तुलनेत आता प्रदर्शनांमध्ये सरासरी ७२ टक्के वाढ दिसत आहे. कपडे आणि जीवनशैलीशी संबंधित वस्तूंचे किरकोळ विक्रेते तसंच मॉलचालक सांगतात, की पितृपक्षाचा कालावधी अशुभ असूनही गेल्या काही आठवड्यांमध्ये विक्रीमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. त्यामुळेच दिवाळीत ही मागणी उच्चांकावर राहण्याची अपेक्षा आहे. याबाबत ‘लाइफस्टाइल इंटरनॅशनल’चे मुख्य कार्यकारी देवराजन अय्यर सांगतात, ‘आम्ही देशात प्रवेश केल्यापासून पाहत असलेली मागणी आजघडीला सर्वाधिक आहे. सकारात्मक ग्राहक भावना आणि नवीन माल यासह अनेक घटक विक्रीला चालना देत आहेत.

कोणतीही सूट नसतानाही दोन अंकी वाढीसह या वर्षी सणासुदीच्या हंगामात बंपर विक्री होईल. साथीच्या रोगादरम्यान कपडे आणि चैनीच्या वस्तू विभागांना अत्यंत वाईट फटका बसला होता. तथापि, आता कपडे, जीवनशैली उत्पादनं आणि रेस्टॉरंटमधल्या किरकोळ विक्रेत्यांची चांगली सुरुवात होत असून त्यांच्या महसुलातही चांगली वाढ होत आहे. कार्यालये पुन्हा उघडल्यानंतर आणि सामाजिक वावर वाढल्यानंतर लोकांचे वॉर्डरोब ताजेतवाने होण्यास मदत झाली. या वर्षी ब्रँडकडे अतिरिक्त ऊर्जा आहे, कारण दोन वर्षांनंतर त्यांना ग्राहकांना आकर्षित करण्याची संधी मिळत आहे. आम्ही आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट विक्री करण्याची आशा करत आहोत आणि विक्रमी उच्चांक गाठण्याची अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये