देशात गेल्या 24 तासात 750 जणांना कोरोना, चौघांचा मृत्यू; जेएन.1 व्हेरियंटचे 23 रुग्ण
नवी दिल्ली : (Corona New JN Variant) नव्या जेएन.१ मुळे आरेाग्य यंत्रणा कामाला लागलेली असताना गेल्या चोवीस तासांत देशभरात कोरोनाचे नवे ७५२ रुग्ण आढळून आले आहेत. हा आकडा गेल्या सात महिन्यातला सर्वाधिक आहे. त्यापैकी ३५२ जण बरे झाले आहेत. कोरोना संसर्गामुळे गेल्या चोवीस तासात चार जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ४२० असून काल ही संख्या २ हजार ९९८ होती. जेएन.१ ची आतापर्यंत २३ जणांना लागण झाली आहे.
देशभरात आतपर्यंत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ४.५ कोटींवर पोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात असून तेथे ५६३ रुग्ण आहेत आणि दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी २९७ जण बरे झाले आहेत.
तसेच राजस्थान आणि कर्नाटकात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. १९ नोव्हेंबर ते १७ डिसेंबर या काळात ८ लाख ५० हजार रुग्णांची नोंद झाली आणि तीन हजार जणांचा मृत्यू झाला आहे. या महिन्यात मृत्युदर ८ टक्क्यांनी कमी झाला आहे.