अग्रलेखताज्या बातम्यादेश - विदेशसंपादकीय

भारतीय ग्रंथालय शास्त्राचे पितामह

डॉ. एस. आर. रंगनाथन

डॉ. रंगनाथन यांनी ग्रंथालय व माहितीशास्त्राशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात भरीव कार्य केले. त्यांच्या कार्यपद्धतीवर, तंत्रावर, त्यांनी सुचविलेल्या शिफारशीवर आजही अभ्यास, विचारविनिमय होतो.

ग्रंथालय हे केवळ पुस्तकांचे संग्रहालय न होता ती एक संस्था व्हावी, चळवळ व्हावी म्हणून अहोरात्र झिजणाऱ्या डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जन्म १२ ऑगस्ट १८९२ मध्ये तामिळनाडूतील शियाली गावी झाला. दहावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी गणित या विषयात बीए आणि एमए शिक्षण पूर्ण केले. १९१७ ला ते मंगलोरमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून शिकवू लागले. चार वर्षं मंगलोरमध्ये शिकवल्यानंतर ते १९२१ ला चेन्नई ( तत्कालीन मद्रास) च्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून रूजू झाले. १९२४ साली मद्रास विद्यापीठाचे ग्रंथपाल म्हणून कार्यरत. रंगनाथन यांनी १९२८ मध्ये मद्रास ग्रंथालय संघाची स्थापना करून भारतातल्या सार्वजनिक ग्रंथालय चळवळीची मुहूर्तमेढ रोवली.

१९३१ मध्ये त्यांचा सर्वांत महत्त्वाचा ग्रंथ ‘द फाईव्ह लॉज ऑफ लायब्ररी सायन्स’ प्रसिद्ध झाला. भारतीय ग्रंथालयांची चौकट रंगनाथन यांनी दिलेल्या या पाच सिद्धांतांवरच आहे.
ग्रंथालय शास्त्राचे नियम
१. ग्रंथ हे वाचण्यासाठीच असतात.
२. प्रत्येक वाचकासाठी पुस्तक असतं.
३. प्रत्येक पुस्तकासाठी वाचक असतो. ४.
ग्रंथपालाचा आणि वाचकाचा वेळ वाचला पाहिजे .
५. ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे. हे ते पाच नियम होत.

सन १९३१ ते १९६७ या काळात त्यांनी विपुल ग्रंथलेखन केले. ग्रंथालय आणि माहितीशास्त्रावरील त्यांची ६५ पुस्तके आणि २५०० हून अधिक लेख प्रकाशित आहेत. ग्रंथालयांना जास्तीत जास्त लोकाभिमुख बनवावे, त्याचा फायदा सर्वसामान्यांना व्हावा यासाठी त्यांनी ग्रंथालयाची पंचसूत्री तयार केली. त्या आधारावर ग्रंथालय शास्त्राचा पाया रचला गेला आहे. भारतातच नाही तर जगभरातल्या सर्वच ग्रंथपालांना रंगनाथन यांच्या तत्त्वांचा अभ्यास करावाच लागतो. त्यांचा वाढदिवस देशात राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस म्हणून साजरा केला जातो. भारत हा दानशूर परंपरा असलेल्या लोकांचा देश आहे. डॉ. रंगनाथन हे एक दानशूर व्यक्तिमत्त्व होते. त्यांची बुद्धी जेवढी विशाल होती, तेवढेच त्यांचे हृदयही विशाल होते.

१९६१ मध्ये शारदा रंगनाथन इण्डोमेंट ट्रस्ट, बेंगलोर यांना आपली मोठ्यात मोठी धनराशी समर्पित करून दातृत्वाचे उदाहरण घालून दिले. या त्यांच्या आर्थिक योगदानामुळेच ग्रंथालय शास्त्रातील उच्च प्रतीचे प्रशिक्षण आणि प्रकाशनाला उत्तेजन मिळाले.
डॉ. रंगनाथन यांच्या Colon Classification आणि Classified Catalogue Code या ग्रंथालय संहितामुळे भारताचे नाव ग्रंथालय जगतात आजही आदराने घेतले जाते.

विद्यापीठ व महाविद्यालयाचे ग्रंथालयाचे ग्रंथपाल हे पद शिक्षकासमान आहेत. त्यांच्यासाठी असलेल्या सेवाशर्ती, वेतनमान आणि इतर संशोधन सुविधाही प्राध्यापकांप्रमाणेच असाव्यात. यासाठी त्यांनी ठाम भूमिका मांडली व ग्रंथपालांना विद्यापीठ कायद्यान्वये दर्जा प्राप्त करून दिला.

ग्रंथालय शास्त्राच्या पंचसूत्री ग्रंथापासूनच खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. ग्रंथालय व माहितीशास्त्राच्या प्रत्येक क्षेत्रात भरीव कार्य केले. त्यांच्या कार्यपद्धतीवर, तंत्रावर त्यांनी सुचविलेल्या शिफारसीवर आजही ग्रंथालय व माहितीशास्र संबंधित सेमिनार, कॉन्फरन्समध्ये प्रमुख विषय म्हणून घेतले जातात.

डॉ. एस. रंगनाथन यांच्या विचाराने एका आंदोलनास जन्म दिला. त्यांचे गुरू सेयर्स यांनी या काळाला रंगनाथन युग असे नाव दिले. डॉ.रंगनाथन यांना कित्येक पदव्या, मानसन्मान मिळाले असले तरी त्यांच्याकडे विलक्षण नम्रता होती. त्यांचा स्वभाव ज्ञानसाधना करणार्‍या महान योग्याचा होता. त्या अर्थाने ते ज्ञानयोगी होते. १९५७ मध्ये त्यांचा भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला.

ग्रंथालयात वाचकांना सर्वोत्तम सुविधा सेवा पुरविणे, वाचकांचा वेळ वाचवून योग्य मार्गदर्शन करणे ह्यामध्ये ग्रंथपालाची मोलाची कामगिरी असते. त्याचप्रमाणे ग्रंथालयांना सुविधाही हव्या असतात. योग्य वातावरणात वाचन व अभ्यासाकरिता चांगले फर्निचर, यांत्रिकी संसाधन, कौशलतज्ज्ञ शिक्षित कर्मचारी, शिस्तबद्ध नीतिनियमांचे पालन, ग्रंथालयात प्रकाश व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बाथरूम अशा सुविधा प्राथमिक गरजेत येतात.

पुस्तक मानवाला शेवटपर्यंत साथ देतात. आजचा युगात तर ग्रंथालयाचे महत्त्व फार वाढलं आहे. पारंपरिक ग्रंथालयपासून आजच्या ऑटोमेशन, यांत्रिकी, डिजिटल व ग्रंथालयापर्यंत विकसित झालेले आहे. आजच्या वेळेला वाचकांची गरज ओळखून योग्य वेळेत ती सेवा पूर्ण करणे हेच ग्रंथालयाचे मुख्य ध्येय आहे आणि हेच डॉ. एस. आर. रंगनाथन यांना सर्वेत्तम मानवंदना ठरेल. अशा या थोर महात्म्याचे आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी २७ सप्टेंबर १९७२ रोजी निधन झाले आणि ग्रंथालय व माहितीशास्राला नवीन आयाम देणारेएक महान पर्व संपले. डॉ. रंगनाथन हे ग्रंथालय शास्त्राचे सुवर्णयुग निर्माते होते, असे म्हणणे योग्य ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये