अग्रलेखताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्रसंपादकीय

गडकरींचे शॉर्टसर्किट

राज्याची वीज मागणी २७,५६१ मेगावॅटच्या घरात असते.तर १७,५४१ मेगावॅट इतकी वीज महाराष्ट्रात निर्माण होत आहे. महाराष्ट्रात विजेची मागणी साधारणपणे १९,००० ते २४,००० मेगावॅटच्या घरात असते. इलेक्ट्रिक वाहनांच्या संदर्भात याचा विचार कधी करणार की नाही ?

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी त्यांची नेहमीची आवडती घोषणा पुणे येथे एनडीए चौकातील उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात केली. देशातून पेट्रोल, डिझेल हद्दपार केले जाणार असून, त्या दृष्टीने मिथेनॉल, बायोसीएनजीवर गाड्या चालवण्यास प्राधान्य दिले जाईल, असे जाहीर केले. एक तर विजेवर चालणाऱ्या गाड्यांचे प्रमोशन, तर दुसरे मिथेनॉल, बायोसीएनजीवर गाड्या चालवण्यास गडकरी सांगतात. हे सांगत त्यांच्या वैचारिक शॉर्टसर्किटचे प्रदर्शन नेहमी करत असतात.

नितीन गडकरी यांच्या कार्यकाळात पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे केल्यावर त्यांना रोडकरी अशा कौतुकाने अनेकांनी शाबासकी दिली होती. त्यानंतर केंद्रातही हेच खाते सांभाळताना त्यांचे रस्ते बांधण्याचे क्षितिज विस्तारले आहे. खंदा (खणा) आणि बांधा ही त्यांची कामाची आवडती शैली त्यांनी निर्माण केली. उड्डाणपूल, चौपदरी, सहापदरी, आठपदरी महामार्ग निर्माण करण्याची तलफ त्यांनी देशभरात बांधकामे करत भागवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. वाहतूककोंडीमुळे गुंतवणूकदार पुण्यासारख्या शहरात गुंतवणूक करण्यास कचरतात. वाहतुकीची कोंडी, रस्त्यावरील बेशिस्त वाहतूक, सर्रास मोडले जाणारे नियम, प्रदूषण, अपघात, पार्किंग, फेरीवाले यांचे प्रश्न सुटता सुटत नाहीत, हे वास्तव आहे. मात्र वाहतूककोंडी सोडवण्यावर ठोस आणि जनतेला विश्वासात घेऊन उपाययोजना काढण्याऐवजी कोंडीला पर्यायी व्यवस्था तयार करण्यात बरीच मंडळी मग्न असतात. त्यातील गडकरी हे एक !

पर्यायी व्यवस्था मार्गाच्या माध्यमातून किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून तयार होऊ शकते. नवे मार्ग नव्याने बसवल्या जाणाऱ्या महानगरांच्या उपनगरांत शक्य आहेत. मात्र पुण्यासारख्या महानगरात हा प्रकार आता अवघड झाला आहे. जागा मिळवणे, त्याची नुकसान भरपाई देणे, त्यानंतर त्यावर बांधकाम हे सगळे गुंतागुंतीचे प्रश्न आहेत. तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जलद, पुरेशी परवडणारी करण्याचे शिवधनुष्य सरकार उचलते, पण नंतर ते त्यांच्याच छाताडावर पडते, हा इतिहास आहे. अशावेळी खासगी वाहनांशिवाय वाहतुकीसाठी दुसरा कोणताच मार्ग नागरिकांपुढे शिल्लक राहात नाही. त्यातूनही दुचाकी हा स्वस्त वाहतुकीचा सोपा पर्याय आहे. दुचाकी, तीनचाकी वाहनांचे पेट्रोल व डिझेल बंद करून त्या इलेक्ट्रिकवर चालवण्याचा सल्लायुक्त आवाहन नितीन गडकरी यांनी केले. या वाहनांमुळे प्रदूषण होणार नाही असा शोधही नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील यांनी लावला आहे.

मुळात इलेक्ट्रिसिटी निर्माण करण्यासाठी जो कोळसा जाळला जातो त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. इलेक्ट्रिक वाहनांमुळे विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढेल. साहजिकच विजेचा पुरवठा करण्यासाठी अधिक कोळसा जाळल्याने प्रदूषणही वाढेल. पाणी, सौरऊर्जा व वाऱ्यावरच्या ताकदीवर वीज निर्माण होते. मात्र ७५ टक्के कोळसा जाळूनच वीज होत असल्याने पाणी, सौर आणि वाऱ्यावरच्या विजेचे प्रमाण कमी आहे. सौर व वाऱ्यावर निर्माण होणाऱ्या ऊर्जेत आवश्यक असणारे पॅनल्स तयार करण्याचे तंत्र, साहित्य व त्याचा पुरवठा पुरेसा नाही. ती यंत्रणा महागाईची आहे. ही वीज वाहनांसाठी वापरायची असेल तर घरगुती वीज ही सौर व वाऱ्यावरच्या विजेवर तयार करण्याची क्षमता आपल्यात निर्माण केली पाहिजे. वाहनांसाठी रिचार्जिंग सेंटर पाहिजेत. मग पेट्रोल- डिझेल बंद करता येईल. सध्या रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांना विजेवर चालण्याची यंत्रणा तयार केली पाहिजे. अन्यथा अजून पंचवीस वर्षे तरी पेट्रोल, डिझेल बंद करता येणार नाही.

स्वस्त धान्य दुकानातून रॉकेल गायब केले. याचे कारण गॅस वापरला जावा. मात्र गॅसची किंमत अकराशे रुपये झाल्याने गॅस परवडत नाही व रॉकेल मिळत नाही अशी अवस्था नागरिकांची झाली आहे. विजेबाबतही तसेच होऊ शकते. वीजदर भरमसाठ वाढवल्यावर ग्राहकांच्या मोडलेल्या कंबरड्याचे तुकडे तुकडेच केवळ होतील. तेव्हा गडकरी यांनी वीजपुरवठ्याचे उत्पादन, वितरणाचे नियोजन अगोदर जाहीर करावे. त्याचबरोबर मिथेन, बायोसीएनजीचे उत्पादन आणि त्याचा पुरवठा सुरळीतपणे कसा होईल आणि त्याने प्रदूषण होणार नाही याची हमी द्यावी आणि मगच अशा सवंग घोषणा कराव्यात एवढेच.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये