विठ्ठल रुक्मिणी यांचे प्राचीन 315 दागिन्यांची नोंद नाही
पंढरपूर : विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सन २०२१-२२ चा लेखापरीक्षण करण्यात आले आहे. यात विठ्ठल रुक्मिणी यांचे प्राचीन ३१५ दागिने नोंद नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. मंदिर समितीने हिवाळी अधिवेशनात विठ्ठलाचा प्रसाद लाडू बाबतचा अहवाल सादर केला. मात्र दागिने नोंद नसल्याचा अहवाल दिला नसल्याने दागिने गहाळ झाले असल्याने भाविकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल रुक्मिणीस राजे-महाराजे, पेशवे यांनी हिरे व सोन्याचे दागिने अर्पण केले होते. सन १९८५ सालापासून ताळेबंदात त्रुटी आढळून येत आहेत. गेली अनेक वर्षे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे लेखापरीक्षण करण्यात आले नव्हते. ते करण्यात यावे अशी मागणी होत होती. याची दखल घेऊन मंदिर समितीने पुणे येथील एका कंपनीला लेखापरीक्षण करण्याचे काम दिले. त्यानुसार कंपनीने सण २०२१-२२ चा लेखा परीक्षण केले. यामध्ये मंदिर समितीने अगोदर मंदिरातील चांदीचे दरवाजे, चौकाम, सोळखांब, विठ्ठल गाभाऱ्यास असलेला चांदीचा दरवाजा, रुक्मिणी आभाऱ्यास असलेला चांदीचा दरवाजा तसेच अनेक वस्तूची नोंद केली नसल्याचे आढळून आले आहे. विठ्ठल रुक्मिणीस राजे, महाराजे, पेशवे यांनी सोने व हिऱ्यांचे दागिने अर्पण केले होते. यातील ३१५ दागिन्यांची नोंद झाली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. यात विठ्ठलाच्या अंगावरील २०३ व रुक्मिणी मातेच्या अंगावरील १११ दागिन्यांचा समावेश आहे.
पंढरीत येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी शासनाने विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची स्थापना केली आहे. मात्र या समितीमधील अध्यक्ष, सहअध्यक्ष, सदस्य भाविकांना सोयी सुविधा देण्याबाबत व मंदिरात देखरेख करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे भाविकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पंढरीत येणाऱ्या भाविकांना विठ्ठलाचा प्रसाद बुंदीचा लाडू मिळावा म्हणून मंदिर समितीने एका बचत गटास लाडू तयार करण्याचा ठेका दिला होता. मात्र लाडू च्या प्रसादाकडे मंदिर समितीने दुर्लक्ष केले होते. याबाबत भाविकांनी तक्रार केल्यानंतर मंदिर समितीने लाडू प्रकरणाकडे लक्ष दिले. निकृष्ट दर्जाचे लाडू तयार होत असल्याने मंदिर समितीने बचत गटास दिलेला ठेका रद्द करून स्वतः लाडू तयार करण्यास सुरुवात केली. लाडू प्रकरणाची चौकशी करून याबाबतचा अहवाल तयार झाल्यावर तो नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात आला. यानंतर मंदिर समितीचे दुर्लक्ष असल्याने भाविकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. मंदिर समितीने लाडूचा अहवाल हिवाळी अधिवेशनात ठेवला. मात्र दागिने नोंद नसल्याचा अहवाल ठेवला नाही यामुळे भाविकात नाराजी पसरली आहे.