ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्र

भरतमुनींच्या नाट्यशास्त्रांत जागतिक नाट्य प्रवाहांचे दर्शन: तुषार भद्रे

साहित्य कला वर्तक मंचाचे उद्घाटन

सातारा | नाट्यशास्त्राचा जसजसा अभ्यास करत गेलो, तसं तसे भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात जागतिक नाट्यशास्त्रांचे दर्शन होते गेले. जागतिक पातळीवर नाट्यशास्त्राचा जो विचार महान नाट्यचिंतकांनी केला आहे तो किती सारखा आहे हे लक्षात आले. स्तानेस्लावस्की,अंतोन, ब्रोटस्की, ब्रेख्त,पीटर ब्रुक या सगळ्यांनी नाट्य विषयक केलेला विचार आणि अडीच हजार वर्षांपूर्वी भरतमुनी यांनी नाट्यशास्त्राचा केलेला विचार यात फरक नाही, हे समजते. ही सगळीच मंडळी महान ऋषीमुनीच होत, असे विचार ज्येष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे यांनी व्यक्त केले.

साहित्य कला वर्तक (साकव) मंचाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात तुषार भद्रे बोलत होते. याप्रसंगी दीपलक्ष्मी सभागृहात नाट्य, चित्रकला, संगीत ,साहित्य या क्षेत्रातील साताऱ्यातील जाणकार मंडळी उपस्थित होती. तुषार भद्रे यांनी यावेळी साहित्य कला वर्तक या संस्थेचे उद्घाटन केल्याचे जाहीर केले. दर महिन्याला एक कला, साहित्य विषयक उपक्रम या संस्थेच्या वतीने होणार असल्याचे साकवचे मधुसूदन पतकी यांनी यावेळी सांगितले. दरम्यान ज्येष्ठ चित्रकार बाळासाहेब कचरे, मनोज सिदमुल यांचा सत्कार तुषार भद्रे यांनी केला ,तर तुषार भद्रे यांचा सत्कार ज्येष्ठ संपादक मुकुंद फडके यांनी केला. तुषार भद्रे यांनी यावेळी भरत मुनी यांचे नाट्यशास्त्र,रंगमंच, रंग, रस या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती अभिनयाच्या विविध छटांच्या सादरीकरणासह दिली.

तुषार भद्रे पुढे म्हणाले, जागतिक पातळीवर मेथड अक्टिंग हा प्रवाह सुरू झाला होता. स्तानेस्लावस्की यांच्या या मेथड नाट्य प्रशिक्षणात आम्ही अभिनय शिकत असतानाच भरतमुनी यांनीही याच प्रकाराचे अत्यंत सखोल असे विश्लेषण केल्याचे समजून आले. मेथड अक्टिंग मध्ये जाणीवनिर्मिवाच्या आंतरप्रवाहात रममाण होऊन त्याचा अनुभव घेऊन नटाने अभिनय करणे अपेक्षित असते. तर भरतमुनी यांच्या सात्विक अभिनयात नेमके तेच सांगतात. भरतमुनी याला परकाया प्रवेश म्हणतात, तर नटाने सत्व शोधण्यासाठी आत्मिक स्वच्छता,आत्म्याची निर्वस्त्रता विचारात घेऊन तन मनाने भूमिका वठवली पाहिजे असे स्तानेस्लावस्की यांनी सांगितले. भरतमुनी यांच्या ध्वनी, नाट्य, अभिनय, रस ,रंग,मुद्राभिनय ,वाचिक अभिनय, स्वरसाधना या सगळ्यांचे दाखले यावेळी तुषार भद्रे यांनी यावेळी दिले.

भद्रे पुढे म्हणाले, नाटक हे प्रेक्षक शरण आहे. प्रेक्षकाशिवाय नाटक होऊ शकत नाही. पीटर ब्रुक यांच्या म्हणण्यानुसार, रंगमंचावर एक किंवा दोन व्यक्ती व रंगमंचासमोर एक व्यक्ती असेल तरीही नाटक घडत असते .मात्र ते प्रेक्षक शरणच असते. चित्रकला, मूर्ती कला या कला व्यक्ती केंद्रित असतात. त्यांचा आशय सामाजिक व कलाकारी सामूहिक असू शकते. मात्र नाटक हे पूर्णपणे प्रेक्षक शरणच असते. लोकांनी, लोकांसाठी, लोकरंजनासाठी लोकांनीच म्हणून घडवलेला तो अविष्कार असतो. सहाजिकच याचा आत्मा रंगमंचीय कलाकाराबरोबरच प्रेक्षक हा सुद्धा असतो. भारतीय नाट्यशास्त्रात रंगमंचाला रंगभूमी असे म्हटले आहे .यामध्ये रंग आणि भूमी अशा दोन शब्दांचा अत्यंत समर्पक वापर केलेला आहे. रंग याचा अर्थ केवळ रंगापुरता मर्यादित नसून रंग म्हणजे अभिनय रंग ,रंग म्हणजे नट, रंग म्हणजे वृत्ती, प्रवृत्ती, धर्म, संस्कृती. या रंगात सर्व कला सम्मिलित होतात. ते सगळे रंग नटरंगात सामील होतात. स्वराला रंग असतो. कृतीला रंग. असतो रंगभूमीवरील अवकाशातील प्रत्येक स्वर गती आणि मितिला रंग असतो आणि त्यामुळे रंगभूमीवर जे अवकाश असते. त्या अवकाशाला रंगमंच रंगभूमीचे विविध प्रकार भरतमुनी यांनी सांगितले आहेत. यात अनेक किंवा शेकडो प्रेक्षकांपासून समीप नाट्य किंवा छोट्या रंगमंचावरील अविष्कारापर्यंत विविध रचना आणि नाटकांचे पोत त्यांनी स्पष्ट केले आहेत. नटाचे शरीर हेच वाद्य असते. आणि नट हाच त्याचा वादक असतो. सहाजिकच हे वाद्य आणि वादक यांच्यामध्ये कमालीचा समन्वय ज्यावेळी निर्माण होईल तेव्हा ते नाटक प्रेक्षकांना ब्रह्मानंद सहोदराचा अनुभव देऊ शकते.

भरतमुनी यांनी नाट्यशास्त्राला पाचवा वेद असे म्हटले आहे. ब्रह्मदेवाने चार वर्ण एकत्र बसून मनोरंजनाचा आस्वाद घेता यावा यासाठी शिवशंकराला हे शास्त्र करण्यास सांगितले. आणि शिवशंकराने ऋग्वेदातून संवाद, सामवेदातून संगीत ,आयुर्वेदातून रस परिपोष आणि अथर्ववेदातून अभिनय घेऊन नाट्यशास्त्र हे पाचवा वेद निर्माण केला .सहाजिकच संवाद, संगीत, अभिनय आणि रसपरिपोष याचा सविस्तर अभ्यास आपल्याला नाट्यशास्त्रात पाहायला मिळतो. या रसामध्येही भरतमुनी यांनी आठ रसांचा शारीरिक व वाचिक अभिनयासह सविस्तर विचार केलेला आहे. कालांतराने अभिनव गुप्त यांनी नवव्या रसाचा म्हणजेच शांत रसाचा शोध नाट्यशास्त्र लावून नवरसांची उत्पत्ती या शास्त्रात दाखवून दिली आहे. यावेळी आशय अभिव्यक्तीसाठी रंग महत्त्वाचा असतो. भाषेच्या पलीकडे ही अभिव्यक्ती होऊन संवाद घडू शकतो हे पीटर ब्रुक आणि त्यांच्या स्वतःच्या उदाहरणावरून घडलेल्या घटनेवरून भद्रे यांनी स्पष्ट केले.नाटक शिकण्यासाठी चित्र, नृत्य, संगीत,शिल्प ,वाद्य कलेचा अभ्यास महत्वाचा आहे हे स्पष्ट केले. त्याचबरोबर विजया मेहता, गोपू देशपांडे यांच्याबरोबर झालेल्या चर्चेतून नाटकांचे विविध आयाम समजल्याचेही सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मधुसूदन पतकी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये