शिवसेनेच्या वाघांमुळेचं हिंदुत्वावरील कलंक दूर; खासदार राऊत यांचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल
नाशिक : (Sanjay Raut On Devendra Fadnavis) शिवसेनेचे वाघ नसते, तर हिंदुत्वाला अनेक वर्षांपासून असलेला कलंक दूर झाला नसता. राममंदिर लढ्यात शिवसेनेचे योगदान काय, असे म्हणणाऱ्यांसाठी अयोध्येतील कारसेवेवरील ‘रामजन्मभूमीत शिवसेनेचे वाघ’ हे दालन खुले करण्यात आले आहे, डोळे उघडे ठेवून पाहिल्यास समजेल, असा हल्लाबोल शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केला.
शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खासदार राऊत यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की आता कुणी, कितीही श्रेय घेतले तरी लोकांना शिवसेनेचे अयोध्येतील योगदान माहीत आहे. शिवसेनेतर्फे अधिवेशनस्थळी अयोध्येतील योगदानासंदर्भात माजी मंत्री व ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून ‘रामजन्मभूमीत शिवसेनेचे वाघ’ हे छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उदघाटन खासदार राऊत यांच्या हस्ते झाले.
प्रदर्शनामध्ये बाबरी मशिदीचा पाडलेला ढाचा, आंदोलनात शिवसेनेचे योगदान, बाळासाहेब ठाकरेंची भूमिका मांडण्यात आली आहे. प्रदर्शनासाठी देसाई यांनी अत्यंत मेहनत घेतली. अयोध्येला आपण जात नाही, अयोध्येच्या राममंदिर संघर्षात शिवसेनेचे जे योगदान आहे, ते सगळ्यांना माहीत व्हावे, यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात आल्याचे सांगून खासदार राऊत म्हणाले, की प्रदर्शनातील चित्रांमध्ये तरुणपणीचे सुभाष देसाई आपल्याला दिसले होते.
शाळेतला मुलगा दप्तर घेऊन जातो, तसे ते पाठीला हत्यार बांधून चालले होते. मनोहर जोशी, चंद्रकांत खैरे आदी शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. हा आमचा ठेवा आहे. काही लोक असे म्हणतात, की शिवसेनेचे योगदान काय, त्यांच्यासाठी हे दालन डोळे उघडे ठेवा आणि हे पाहा, असा टोला त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.