ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्रसिटी अपडेट्स

ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले काळाच्या पडद्याआड

पुणे | Nagnath Kottapalle – मराठी ग्रामीण साहित्यात मोठे योगदान असलेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (Nagnath Kottapalle) यांचं निधन झालं आहे. ते ७४ वर्षांचे होते. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या निधनानं मराठी साहित्य विश्वात शोककळा पसरली आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी नागनाथ कोत्तापल्ले यांना फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यांचं निधन झालं. त्यांच्यामागे त्यांच्या पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

नागनाथ कोत्तापल्ले यांनी कथा, कादंबरी आणि समीक्षा अशा विविध अंगांनी मराठीत लेखन केलं आहे. चिपळूण इथं भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विभागप्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्षं काम केलं आहे.

नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील मुखेडमध्ये झाला होता. त्यांची अत्यंत खडतर परिस्थितीतून शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर देगलूर महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली. नंतर एम. ए. मराठवाडा विद्यापीठातून केलं. त्यांनी शंकर पाटील यांच्या साहित्यावर पीएचडी केली होती. पुढे त्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात 19 वर्षे अध्यापनाचं काम केलं. नंतर ते 1996 ते 2006 या काळात विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रोफेसर आणि विभागप्रमुख होते. 2005 ते 2010 अशी पाच वर्षे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे कुलगुरु देखील होते.

कोत्तापल्ले यांची साहित्यसंपदा :

– ‘मूड्स’ (कवितासंग्रह)
-‘कर्फ्यू आणि इतर कथा’, ‘रक्त आणि पाऊस’, ‘संदर्भ’, ‘कवीची गोष्ट’, ‘सावित्रीचा निर्णय’, ‘देवाचे डोळे’ (कथासंग्रह)
-‘मध्यरात्र’, ‘गांधारीचे डोळे’, ‘प्रभाव’ (कादंबरी)
-‘पापुद्रे’, ‘ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि बोध’, ‘नवकथाकार शंकर पाटील’, साहित्याचा अन्वयार्थ’, ‘मराठी कविता : एक दृष्टिक्षेप’, ‘साहित्याचा अवकाश’ (समीक्षात्मक)
-‘गावात फुले चांदणे’ (प्रौढ नवसाक्षरांसाठी लघुकादंबरी)
-‘मराठी साहित्य संमेलने आणि सांस्कृतिक संघर्ष’, ‘उद्याच्या सुंदर दिवसासाठी’ (ललित गद्य),
-‘जोतीपर्व’ (अनुवादित पुस्तक)
-‘स्त्री-पुरुष तुलना’, ‘शेतकऱ्यांचा असूड’, ‘पाचोळा आणि दहा समीक्षक’, ‘निवडक बी रघुनाथ’ (संपादन)

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये