शिंदेचा वांदा? आमदार अपात्रता प्रकरणात अध्यक्ष अन् शिंदे गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटीस
नवी दिल्ली : (Shivsena MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाकडून (Thackeray Group) त्या निर्णयाला आव्हान देत, पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यात आली असून यावेळी सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नोटीस जारी केली आहे.
दरम्यान, यावेळी पार पडलेल्या सुनावणीत शिंदे गटा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीसा बजावत येत्या दोन आठवड्यात बाजू मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचवेळी सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी तुम्ही उच्च न्यायालयात का जात नाही, असा सवाल देखील केला. यावर ठाकरे गटाकडून युक्तिवाद करत कपिल सिब्बल यांनी त्यासाठी बराच वेळ जाईल असं म्हटलं आहे.
शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेना देत कोणत्याही गटाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कोणत्याही गटातील आमदाराला अपात्र केलं नाही. दरम्यान आता सर्वोच्च न्यायालयाने शिंदेंना नोटीस जारी केली असल्यामुळे राहुल नार्वेकरांचा निकाल अडचणीत तर नाही ना येणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय झालं?
सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, तुम्ही उच्च न्यायालयातच जा, पण यासाठी बराच अवधी लागेल, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला नोटीस जारी करत असल्याचं म्हटलं. त्यानुसार एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 39 आमदारांना नोटीस जारी करण्यात आली. तसेच या आमदारांना दोन आठवड्यात त्यांचं म्हणणं सादर करण्यात सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर दोन आठवड्यानंतर सुनावणी होईल. तारीख नंतर कळणार असली तरीही फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ही सुनावणी होण्याची शक्यता असल्याचं वकिल सिदार्थ शिंदे यांनी म्हटलं.