ताज्या बातम्यापुणेसिटी अपडेट्स

नांदेड सिटीमधील सदनिधारकांना मोठा दिलासा; कर सवलतीसाठी विशेष मोहीम

पुणे | Nanded City : नांदेड सिटीतील (Nanded City) सदनिकाधारकांना मिळकतकरात 40 टक्क्यांची सवलत न दिल्यामुळे त्यांना मोठा फटका बसला होता. नांदेड सिटी ही महापालिका हद्दीत आल्यामुळे महापालिकेने तेथील रहिवाशांना मिळकतकराची आकारणी सुरू केली आहे. पण, तेथे राहणाऱ्या संबंधित रहिवाशांना मिळकतकरातील 40 टक्क्यांची सवलत देण्यात आली नसल्याचं स्पष्ट झालं होतं. तर आता तेथील रहिवाशांना कर सवलतीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

नांदेड ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कर संकलन आणि कर आकारणी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून 23, 24 डिसेंबर आणि 31 डिसेंबर रोजी सवलत योजनेचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. तसंच पुराव्यासह जागेवर अर्ज भरला तर सवलत रकमेसह कर भरून घेतला जाणार आहे. हा सवलत योजनेचा अर्ज महापालिकेच्या propertytax.punecorporation.org या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहे.

रहिवाशांना या अर्जासोबत आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र, गॅसकार्ड, रेशन कार्ड, वाहनचालक परवाना यापैकी कोणतीही दोन कागदपत्रे जोडणं बंधनकारक आहे. तर सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

दरम्यान, महापालिकेच्या करआकारणी विभिगाकडून घरमालकांना मिळकतकरात 40 टक्क्यांची सूट दिली जाते. पण नांदेड सिटीतील रहिवाशांना 3 वर्षांपासून मिळकतकर देयके देताना ही सवलत न देताच देयके पाठविण्यात आली आहेत. त्यामुळे नांदेड सिटीतील सुमारे 12 हजार रहिवाशांना वाढीव मिळकतकर भरावा लागत होता. या पार्श्वभूमीवर मिळकतकरातील सवलतीसाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये