“लोकशाही बसली धाब्यावर…”; संसदेतून १४१ खासदारांच्या निलंबनानंतर तेजस्विनी पंडितची संतप्त प्रतिक्रिया
मुंबई | नव्या संसदभवनाच्या सुरक्षाभंगाच्या मुद्द्यावरून सध्या हिवाळी अधिवेशन चांगलंच गाजत आहे. संसदेच्या सुरक्षेच्या प्रश्नावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं अशी मागणी करुन सभागृहात गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या ४९ खासदारांवर आज निलंबनाची कारवाई करण्यात आली. गेल्या तीन दिवसांत लोकसभा आणि राज्यसभेच्या १४१ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. याबाबत देशभरातून प्रतिक्रिया उमटत असून, एक्स आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रियांचा पूर आला आहे. दरम्यान यावरुन अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेही ट्विटर पोस्ट करत ‘लोकशाही बसली धाब्यावर’ असे म्हटले आहे.
तेजस्विनीनं पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?
तेजस्विनीने तिच्या एक्स (ट्विटर) पोस्टमध्ये असे म्हटले की, ‘चला बिलं पास करुन घ्या पटापट, मेजॉरिटी तर आधीपासून होतीच आता तर विरोध करायला कुणी नाही…! लोकशाही बसली धाब्यावर! हुकूमशाहीचा उदय की अंताकडे प्रवास?’ अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर करताना #NoDemocracy #Adhiveshan असे हॅशटॅगही वापरले आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत, त्यातील काही कमेंटवर अभिनेत्रीने सडेतोड उत्तरही दिले आहे.
लोकसभेत विरोधी पक्षांचं संख्याबळ १३३ आणि राज्यसभेत ९५ इतके आहेत. त्यापैकी लोकसभेतील ९४ खासदारांचे आणि राज्यसभेतील ४६ खासदारांचे निलंबन करण्यात आलं आहे. त्यामुळं आतापर्यंत निलंबित झालेल्या खासदारांची संख्या एकूण १४१ इतकी आहे. दरम्यान ससंदेतील विरोधी पक्षांच्या खासदारांची संख्या ही केवळ ८७ एवढी राहिली आहे. लोकसभेत विरोधी पक्षांचं संख्याबळ ३८ तर राज्यसभेत ४९ इतकं राहिलं आहे.